श्री दिवाकर बुरसे
कवितेचा उत्सव
☆ ‘राग वसंत… राग बहार…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
आज वसंत पंचमी आहे. त्या निमित्त दोन कविता
१. राग वसंत व २. राग बहार
🌼राग वसंत 🌼
ऋतूंचा राजा’वसंत’ तर रसांचा राजा शृंगार! वसंतात आधिष्ठान असतं रसराज शृंगाराचं! स्वतः भगवंतानेही विभूतियोगात स्वतःचा उल्लेख ” ऋतुनां कुसुमाकरः” असा केलाय.
असा हा वसंत येतो बहुरंगी, शतगंधी फुलांच्या पायघड्यांवरून. मग काय विचारता, अनंगरंगात विश्व रंगून जात!
राग वसंत
तोड़ा
*
मुरलीचे स्वर ऐकुन राधा झाली की बावरी
यमुनातटि हा रंग खेळतो राधा कुंजविहारी
धुंद बसंतातून बहरती रंग रंग फुलपंखी
भिजली राधा, भिजला माधव, भिजली सुरासुरांनी।।
*
या कुंजावर, त्या कुंजावर।।धृ।।
भ्रमरांचे गुंजारव सुंदर
वसंत फुलला अंगांगावर
जैशी सुमने वृक्षलतांवर
या कुंजावर, त्या कुंजावर।। १।।
*
कोकिळ बोले आम्रतरूवर
मधुबन नाचे त्या तालावर
रस शृंगारा, येई बहरा
तू तर राणा नऊ रसांवर!
या कुंजावर, त्या कुंजावर।।२।
*
दिवाकर बुरसे, पुणे
९५५२ ६ २९ २ ४ ५
🌼🌼🌼🌼
🌼 राग बहार 🌼
वसंत ऋतुत गाईला, वाजवला जाणारा महत्वाचा दुसरा राग म्हणजे “बहार” हा ही शृंगार रसप्रधान राग, फार लोकप्रिय आहे.
🌼 राग बहार 🌼
*
तव सहवासा आसुसले रे, कर माझा स्वीकार
श्यामला, जुईस आला बहार! ।।धृ।।
*
फुलल्या वेली, फुले नाचरी
विमल चंद्रिका नभी हासरी
एकांती मज मिठीत घेउनि
घाल गळा कर हार
श्यामला, जुईस आला बहार।।१।।
*
अधरावरती अधर टेकुनी
करपाशी घे तनू बांधुनी
गात्रागात्रातून घुमू दे
अमृतमय झंकार!
राजसा, जुईस आला बहार।।२।।
*
रतिमंची ही तनू शिणू दे
उठता किंचित तोल ढळू दे
विशाल वक्षावरी झेलुनी
दे मजला आधार!
राजसा, जुईस आला बहार।।३।।
*
अर्धोन्मीलित नेत्र होउ दे
भाळावरले दव ओघळु दे
अन् ओठातुन पुन्हा फुटू दे
अस्फुटसा सीत्कार!
राजसा, जुईस आला बहार।।४।।
*
श्वासामध्ये श्वास विरू दे
धुंदीमध्ये रात्र जागु दे
रेंगाळू दे मुक्त कुंतली
उगाच मृदु गंधार!
राजसा, जुईस आला बहार।।५।।
🙏🏽🙏🏽🙏🏽
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





