कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २९४ – विजय साहित्य
☆ नको देऊ मजला…! ☆
(अक्षरछंद , १२ अक्षरी)
☆
नको देऊ मजला,पेरुची फोड
पिंजऱ्याच्या बाहेर,मला तू सोड…||धृ.||
*
उडे स्वच्छंदी थवा,एक विचारी
उडती हिरवळ, उंच भरारी
शिरले अलगद, संशय वारे
मिठू मिठू पोपट,झालो विजोड
नको देऊ मजला… ||१||
*
काच कवडश्यांनी,केली शिकार
सगे सोयरे तेव्हा, झाले पसार
मोह लालसा नडे,चुकली वारी
झगमग पिंजरा,वाटला गोड
नको देऊ मजला… ||२||
*
आभासी दुनियेचा,नको पसारा
पिंजरा कनकाचा, तुरूंग प्यारा
काढीत आठवण, झुरे एकटा
किती पुरवशील,फाजील कोड
नको देऊ मजला… ||३||
*
शोधत फिरतील, आई नी बाबा
मनावर राहिला, नाहीच ताबा
विसरत चाललो, घरपण मी
पुरतीच जिरली, स्वभाव खोड..
नको देऊ मजला… ||४||
*
उसने अलगूज,पाळीव पक्षी,
करी पोपटपंची ,कदान्न भक्षी
हा सजीव बाहुला,दावीवाकुल्या
विनवीतो तुजला,कवाड तोड
नको देऊ मजला… ||५||
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






