श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३४
☆ पाखरू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
भेटायला, पाखरू आलंय दुरून
पाहू नका, शृंगार केवळ वरून
*
दिवसा ढवळ्या अंधार पडला
असा कसा हा प्रकार घडला
मळभ होतं, आलं प्रीतीचं भरून
*
मिठीत तुमच्या वाटतंय गोड
श्वास कोंडलाय करा धरसोड
हात माझा, ठेवा कायमचा धरून
*
तुमच्या नावाचं कुंकू भाळी
मळा हा पिकवा होऊन माळी
न्याहरीला, सकाळी आणते घरून
*
तुमच्या नावावर वावर सारं
नाही त्याच्यावर कसला भार
सातबारा, ठेवलाय कोरा करून
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






