कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०१ – विजय साहित्य ?

☆ निघाली पालखी…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(संत तुकाराम महाराज पालखी सोहळा)

( सहाक्षरी रचना )

इनाम दाराचा

सोडूनीया वाडा

निघाली पालखी

सवे गावगाडा ..! १

*

आकुर्डी गावच्या

विठू मंदीरात

तुकोबा पालखी

थांबे गजरात ..! २

*

पुण्य नगरीत

स्वागत सन्मान

जागोजागी चाले

अन्न वस्त्र दान ..! ३

*

पालखी विठोबा

पुण्यनगरीत

निवडुंग्या विठू

रमे पालखीत..! ४

*

लोणी काळभोर

रंगलासे मेळा

सोलापूर मार्गी

हरीनाम वेळा..! ५

*

तुकोबा पालखी

यवत मुक्काम

दिंड्या पताकांत

निनादते धाम ..! ६

*

वरवंड गावी

पालखी निवास

आषाढी वारीचा

 सुखद प्रवास ..! ७

*

आनंदाचा कंद

गवळ्याचे नाव

रंगले वारीत

उंटवडी गाव…! ८

*

मंगल पवित्र

क्षेत्र बारामती

कैवल्याची वारी

सुखाच्या संगती …! ९

*

सणसर गावी

विठ्ठल जपात

रंगली पालखी

हरी कीर्तनात…! १०

*

आंथुर्णे गावात

घेताच विसावा

माय माऊलीत

विठ्ठल दिसावा…! ११

*

गोल रिंगणाचा

बेळवंडी थाट

निमगावी क्षेत्री

केतकीची वाट..! १२

*

इंदापुर येता

गण गवळण 

रिंगणाचे वेध

अभंगात मन…! १३

*

सुमनांची वृष्टी

सराटी गावात

अमृताची गोडी

विठ्ठल नामात..! १४

*

गोल रिंगणाचे

अकलूज गांव

मनामधे जागा

विठू भक्तीभाव…! १५

*

येता बोरगाव

दिंडी नाचतसे

काया वाचा मनी

विठू राहतसे…! १६

*

पिराची कुरोली

शिगेला गजर

पाहण्या पंढरी

पोचली नजर..! १७

*

वाखरी गावात

मिलनाची वेळा

रमला वारीत

वैष्णवांचा मेळा..! १८

*

कळस दर्शंनी

पाऊले अधीर

काया वाचा मनी

धरवेना धीर..! १९

*

दोहो पालख्यांचा

वाखरीत मेळ

विठू दर्शनाची

यथोचित वेळ…! २०

*

वैष्णवांची वारी

हरीनाम घोष

वारीचा सोहळा

परम संतोष…! २१

*

पोचल्या पालख्या

पंढरपुरात

आनंदला विठू

भक्तीच्या सुरात..! २२

*

निघाली पालखी

कैवल्य भरारी

विठूच्या सेवेत

पंढरीची वारी…! २३

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted