श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ कृतार्थ संध्या… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
बुडताना सूर्य कोणी
फुलवात लावली होती.
व्याकूळ काळजात जशी ही
सांज तेवली होती.
क्षितिजावर रक्तिमेच्या
काजळरेख उमटली होती.
परतल्या गायींच्या कंठी
घंटीच निनादत होती.
उडवीत धूळ थोडी
सांज डोहात उतरली होती.
कवितेतील हरवली अक्षरे
कावरीबावरी झाली होती.
गहिवरल्या प्रार्थनीय समयी
मीही पापणी मिटली होती.
आणिक एक संध्या ह्रदयी
कृतार्थ झाली होती.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





