कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # ३०३ – विजय साहित्य
☆ नातं मैत्रीचं…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
शब्द पडतात फिके
मैत्री काळजाची सर
तिच्या वर्णनात जाई
भरूनीया प्रेम घर…! १
*
भेट असो रोज तरी
नाही भागत तहान
नातं मैत्रीचे देतसे
सुख दुःख वरदान…! २
*
मैत्री कर्तृत्वाचा झरा
मैत्री राग लोभ मोह
काळजात दडलेला
मैत्री भावनांचा डोह…! ३
*
मैत्री मंदिराचा पाया
“मैत्र” प्रासादिक नाते
असो नर किंवा नारी
दळी गुणदोष जाते…! ४
*
मान अपमाना नसे
मनी तिळमात्र जागा
नातं मैत्रीचे आगळे
एक स्नेहांकित धागा…! ५
*
अर्धा कप चहासाठी
मैत्री भांडणाचा पूर
दिठी आणि मिठीतून
लावी जीवा हुर हुर..! ६
*
मनातलं बोलताना
जपे गुपितांचा ठेवा
“मैत्री” शब्दातीत नाते
नाही ईर्षा नाही हेवा…! ७
*
“मित्र” आधाराचा हात
“मैत्री” आयुष्याचे रूप
बंधनांच्या पलीकडे
जळे जीवनाचा धूप…! ८
*
हवी मैत्री पदोपदी
आयुष्याच्या प्रवासात
कधी “ओवी” कधी “शिवी”
अंतरीच्या आरश्यात…! ९
*
मैत्री कधी मोबाईल
कधी फेसबुक नोट
नातं मैत्रीचं लाघवी
नको अंतरात खोट…! १०
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






