श्री सुनील देशपांडे
📚 क्षण सृजनाचा 📚
☆ जागतिक कविता दिन विशेष – मानसउत्सव… ☆ श्री सुनील देशपांडे ☆
(२१ मार्च जागतिक काव्य दिनाच्या निमित्ताने)
सध्याचा पुणेकर असलेला मी अंतर्मनाने मूळ कविता प्रेमी नाशिककर.
दरवर्षी २८ फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती हा मराठी दिन, परंतु विशेषतः ‘मराठी कविता दिन’ म्हणून माझ्या मनात कायम घर करून राहिलेला आहेच. १० मार्च हा कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन. त्यामुळे नाशिक मध्ये असताना २८ फेब्रुवारी ते १० मार्च हा मराठी उत्सव म्हणून आम्ही साजरा करत असू.
खरं म्हणजे कवितेचे प्रेम निर्माण करणारी पहिली कविता कुसुमाग्रज उर्फ आमचे लाडके तात्या यांची…
‘उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले’ तेव्हापासून वेगवेगळ्या वयामध्ये पाठ्यपुस्तकातून तसेच कवी संमेलनातून त्यांच्या अनेक कवितांनी वेड लावले. अगदी ‘स्वातंत्र्यदेवतेच्या विनवणी’ पर्यंतच्या लोकप्रिय कवितांना रोजच वंदन करावेसे वाटते.
सध्या शारीरिक कारणामुळे फारसे बाहेर पडू शकत नसलो तरी २८ फेब्रुवारी ते १० मार्च या दिवसात मनातून हा ‘मानसउत्सव’ मी साजरा करतच असतो. आणि काव्य प्रेमामुळे त्यानंतरही वेगवेगळ्या विविध दिवशी कवितेचे ‘मानसउत्सव’ साजरे करण्याची माझी प्रथा खालील दिवशी मनापासून चालूच असते. रसिकांच्या माहितीसाठी हे दिवस सादर करीत आहे.
१) २१ मार्च : आंतरराष्ट्रीय कविता दिन किंवा जागतिक कविता दिन :
१९४५ मध्ये स्थापन झालेल्या युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन अर्थात युनेस्को या संस्थेने काव्य अभिव्यक्तीद्वारे भाषिक विविधतेला पाठिंबा देण्याच्या आणि लुप्त होत असलेल्या भाषांना ऐकण्याची संधी वाढवण्याच्या उद्देशाने २१ मार्च हा जागतिक काव्य दिन म्हणून १९९९ मध्ये प्रथम स्वीकारला आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये विविध भाषांमध्ये २१ मार्च हा दिवस जागतिक काव्य दिन म्हणून साजरा केला जातो.
२) २८ एप्रिल: राष्ट्रीय महान कविता दिन.
भूतकाळात होऊन गेलेल्या खूप मोठ्या आणि महान कवींच्या कविता आठवणे त्यांचे पठण करणे मनन करणे आणि अशा कवींच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम करणे यासाठी राष्ट्रीय महान कविता दिन साजरा केला जातो.
३) ३० एप्रिल
अमेरिकेमध्ये ‘पोएम इन युअर पॉकेट डे’ म्हणजेच तुमच्या खिशातली कविता. असा एक अभिनव दिवस साजरा केला जातो. लघु कविता, छोट्या कविता, चारोळ्या, पाचोळ्या, रुबाई, शायरी वगैरे पद्धतीच्या कविता अशा प्रकारच्या कवितांना उठाव येण्यासाठी आणि अशा प्रकारच्या कविता सध्या अमेरिकेमध्ये खूपच लोकप्रिय असून भारतात सुद्धा सध्या अशा प्रकारच्या कविता अत्यंत लोकप्रिय होत आहेत. अशा कवितांसाठी अनेक लोकप्रिय कवीं मार्फत हा दिवस साजरा केला जातो.
४) ७ मे : कविवर्य रवींद्रनाथ टागोर जयंती
हा दिवस सहसा संगीतकविता किंवा उत्तम अशा वृत्तबद्ध कविता किंवा संगीतिका अशा पद्धतीच्या काव्य अविष्काराने साजरा करण्याची पद्धत आहे. विशेषतः बंगाली साहित्यिकांमध्ये हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतातही काव्यप्रेमी व्यक्ती या दिवशी विविध प्रकारचे उत्तम संगीतमय काव्याचे व संगीतीय कविता अथवा काव्यगायन, संगीत नृत्य गायन अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनाने हा दिवस साजरा केला जातो.
५) आषाढ शुद्ध प्रतिपदा
(हा दिवस साधारणपणे जुलै महिन्यात येतो)
आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा संस्कृत भाषेतील महान कवी व नाटककार कवी कुलगुरू कालिदास यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा होतो. याला ‘महाकवी कालिदास दिन’ किंवा ‘कवि कुलगुरू कालिदास दिन’ म्हणतात. महान कवि कालिदास यांच्या मेघदूत या महान काव्याचा निर्मिती दिवस मानला जातो. हा दिवस कालिदास जयंती दिन म्हणूनही समजला जातो. या दिवशी विविध कवी संमेलने व कवितांचे उत्सव साजरे करण्याचा प्रघात आहे. वर्षा ऋतू मधील हा काव्योत्सव. पाऊस अर्थात वर्षा ऋतू हा काव्य भावना जागृत करणारा काव्यात्मक वातावरण निर्माण करणारा ऋतू म्हणून समजला जातो. यामुळेच कवी मंडळींचा सगळ्यात आवडता दिवस त्यांच्या सगळ्यात आवडत्या ऋतूमध्ये म्हणजेच सिझनमध्ये येणारा हा स्फूर्तीदायक दिवस.
६) २१ ऑगस्ट : राष्ट्रीय कवी दिवस
हा दिवस कवींच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. कवितांमधून सामाजिक जागृती आणि सामाजिक संस्कार करणाऱ्या प्रसिद्ध कवींचा त्यादिवशी सन्मान केला जातो. त्यांच्या कवितांचे कार्यक्रम. विविध काव्य स्पर्धा व उत्कृष्ट कविता पारितोषिके देऊन अशा विविध पद्धतीने राष्ट्रीय कवी दिवस साजरा केला जातो. हा दिवस कवींचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
७) ऑक्टोबर महिन्याचा पहिला गुरुवार: राष्ट्रीय कविता दिन
एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की ८ ते १६ वर्षा दरम्यान शिक्षण घेणारी पिढी कवितेवर मनापासून प्रेम करते. सर्वसाधारणपणे या वयोगटातील ४८.८% विद्यार्थी कविता प्रेमी असतात. अशा नव्या पिढीतील उदयोन्मुख कवींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील कवी गुणांना उजाळा देण्यासाठी राष्ट्रीय कविता दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. प्रथमत: हा दिवस इंग्लंडमध्ये राष्ट्रीय कविता दिन म्हणून साजरा होत असे. त्यावेळी अनेक देश ब्रिटिश राजसत्ते खाली असल्यामुळे त्या देशांमध्ये हा दिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. विशेषतः प्रसिद्ध कवींनी नवीन पिढीतील कवींचे काव्यविश्वात स्वागत करून त्यांच्या मनात कवितेविषयी प्रेम जिव्हाळा व नवीन पिढीच्या काव्य कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट या दिवसाचे असते. नव्या पिढीतील काव्य कल्पनांना जुन्या पिढीतील कवींनी केलेला सलाम म्हणजे राष्ट्रीय कविता दिन.
८) अश्विन पौर्णिमा (कोजागिरी पौर्णिमा) : महर्षी वाल्मिकी जयंती
(हा दिवस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो)
महर्षी वाल्मिकी यांना आद्यकवी मानले जाते. या विश्वातील पहिली कविता ज्यांना स्फुरली ते महर्षी वाल्मिकी. म्हणून त्यांना कवितेचे जन्मदाते संबोधले जाते. महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनी कवितेच्या निर्मात्याचा जन्मदिवस म्हणून अनेक ठिकाणी कवितांचे कार्यक्रम आणि कवींचा सन्मान अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी स्वच्छ चांदण्यामध्ये सहसा रात्रीच्या वेळी काव्य रंगात रंगून जाणे आणि केशरी दुधा बरोबर काव्याचा आस्वाद घेणे हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सगळीकडे भारत देशामध्ये साजरा केला जातो. सर्व अबालवृद्ध स्त्री पुरुष मध्यरात्री नंतर पर्यंत सुद्धा या कार्यक्रमामध्ये रंगून जातात.
असे हे मला ज्ञात असणारे वर्षातील विविध पद्धतीने साजरे होणारे कवितांचे दिवस. या दिवसांच्या आठवाच्या निमित्ताने माझी एक कागदावर न उठलेली कविता .. कल्पनेमध्येच लपून असलेली कविता.. त्या कवितेबद्दलची ही कविता रसिकांच्या चरणी अर्पण…
****
☆ नवीन कविता… ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
सुचते आहे मनात का ही नविन कविता,
रुजते आहे बीज घेउनी नवीन कविता.
*
या बीजातुन नवीन कांही फुटते आहे,
या बीजातुन खरेच येईल नवीन कविता ?
*
मनात माझ्या जे जे आहे व्यक्त व्हायचे,
घेऊन येईल का ते सारे नवीन कविता ?
*
नाविन्याचे कपडे लेऊन जुनीच येईल, किंवा
दिव्य देहिनी असेल का ती नवीन कविता ?
*
संचित प्रश्नांचे जे जाळे मनात माझ्या,
सोडवील का गुंता थोडा नवीन कविता ?
*
गुंता माझ्या मनातला ती सोडवील जर,
मुक्ती देईल मलाच माझी नवीन कविता.
*
ज्या मुक्तीची वाट आजवर पहातो आहे,
त्या मुक्तीची वाट दाखविल नवीन कविता.
☆
— श्री सुनील देशपांडे
© श्री सुनील देशपांडे
पुणे, मो – 9657709640 ईमेल : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






