सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ ती… भाग – २ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(सासूबाईंनी अलगद ते घर तिच्या ताब्यात दिलं होतं, याचं फार अप्रूप वाटायचं तिला. तिचं आवर्जून कौतुक केलं नाही, तरी कशाबद्दल तक्रारही नसायची त्यांची. तिने घर छान सजवलं होतं… घरकामाबद्दल प्रश्नच नव्हता. तिचं वैवाहिक आयुष्य सुरळीत चालू झालं.) इथून पुढे —
तारांबळ उडवणारा प्रश्न एकच होता… नवऱ्याच्या सात-आठ हजार रुपये पगारात मनासारखं जगणं कसं जमवायचं हा. यथाकाल नव्या पाहुण्याची चाहूल लागली. दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नव्हता. तो जमेल तसं तिचं कोडकौतुक करत होता. एका शुभदिवशी तिला मुलगी झाली. आयुष्याने एक नवं वळण घेतलं. तिचं काम वाढलं. खर्चही वाढला. पण ती मनापासून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत होती. चाळीतल्या समवयस्क मैत्रिणींसोबत विचारांची, समस्यांची देवाण-घेवाण करतांना स्वत:च्या प्रश्नांची उत्तरं स्वत:च शोधायची असतात ही खूणगाठ नकळतच बांधली गेली होती. सव्वा वर्षाने पुन्हा नवी चाहूल लागली. योग्य वेळी प्रसूती होऊन, दुसरी मुलगी झाली. मुलगा व्हायला हवा होता, असं अभावितपणे वाटून गेलं खरं क्षणभरच. मुलगा होवो किंवा मुलगी… आईला प्रेमाचा पान्हा फुटतोच… आणि तसाच खर्चालाही पाझर फुटला… कसरत वाढली.
एक दिवस नवऱ्याने नोकरीसाठीची जाहिरात वाचली. आणि मनावर दगड ठेवत, तिला अनपेक्षितपणे सुचवलं की ती नोकरी तिला करण्यासारखी होती. १२ वी पास असणं, एवढीच शिक्षणाची अट होती. वयाच्या अटीत तर ती बसत होतीच. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात जावं लागेल, ही एक अट मात्र अटकाव करणारी होती. मुंबईत ती चांगलीच रुळली होती. पण एकटीने लोकलच काय, बसने प्रवास करणं तरी तिला जमेल का, हाच मोठा प्रश्न होता. आजपर्यंत घर हेच तिचं विश्व होतं. त्या पलिकडेही जग असतं, हे ती जणू विसरलीच होती. पण घरातला पैशाचा ओघ वाढणं अत्यावश्यक होतं. आई-वडलांच्या औषधपाण्याचा, मुलींच्या शाळेचा खर्च दिवसेंदिवस वाढतच होता. आणि त्याचे दोन हात कमी पडायला लागले होते. त्याने नाईलाजाने तिला नोकरीसाठी अर्ज करायची गळ घातली. तिलाही परिस्थिती कळत होती. पैशांची वाढती गरज कळत होती. एकीकडे स्वत: पैसे कमवण्याचा विचार भुरळ घालत होता. पण मनात प्रचंड भीतीही दाटून आली होती. रोज एकटीने इतक्या लांबचा प्रवास करायचा, त्या प्रचंड गर्दीत तग धरून रहायचं, अनोळखी लोकांमध्ये दिवसभर वावरायचं… आणि काम? कित्येक महिन्यात पेन हातात घेतलं नव्हतं… ते सरकारी काम… समजणार होतं का? जमणार होतं का? … आणि मुलींचं, सासू-सासऱ्यांचं काय? त्यांना कोण बघेल? … असंख्य प्रश्न मनाला घेरून, आणखीच घाबरवत होते. ‘‘अगं, अर्ज करून पहायला काय हरकत आहे? लगेच नोकरी मिळेलच असं नाही”… हे त्याचं म्हणणं तिने पटवून घेतलं… अर्ज केला. मुलाखतीला बोलावलं गेलं… प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत तिने कशीतरी मुलाखत दिली… आणि आश्चर्य म्हणजे, महिनाभरात नेमणुकीचं पत्र मिळालं… तिची खरी सत्त्वपरिक्षा सुरू झाली.
चाळीतल्या एक काकू माफक पैशात मुलींना सांभाळायला तयार झाल्या. पण तिला नोकरी मिळाली तरीही घरकामाला बाई ठेवणं अशक्यच होतं. कारण नोकरी ‘लोअर डिव्हिजन क्लार्क’ची… पगारही त्यामुळे त्याच बेताचा. सासू-सासऱ्यांना वेळेवर जेवायला द्यायला एक मोलकरीण तयार झाली. तिचा पगार हा अपरिहार्य खर्च होता. एक एक करत सगळ्याची सोय झाली. हा खर्च वजा जाता तिच्या हातात चार-पाच हजार तरी उरू शकतील, असा तिचा हिशोब होता. आता स्वत:च्या मनाला घोड्यावर बसवणं, हे सगळ्यात अवघड काम राहिलं होतं.
नवऱ्याच्या विश्वासाचा हात घट्ट धरून तेही काम मार्गी लागलं… आणि तिची नोकरी सुरू झाली. आयुष्य खूप वेगाने पुढे पळू लागलं आणि आठवणींची झाडंही त्याच वेगाने मागे पळायला लागली… एक एक करत, मागे जात, दिसेनाशी व्हायला लागली… लोकलच्या खिडकीतून व्हायची तशीच… मुंबईत पहिल्यांदा पाय ठेवला, तेव्हा बरोबर एक स्वप्नांचं गाठोडंही आणलं होतं तिने. त्यामानाने लहान असलेल्या त्या गाठोड्यातली स्वप्नंही खरंतर लहान-लहानच होती… राणीचा बाग पहायचा… म्हातारीच्या बुटात चढून बघायचं… रस्तोरस्ती कितीतरी विविध वस्तूंचा बाजार भरतो म्हणे… मनात आलं की तिथे चक्कर मारून, हवी ती छोटी-छोटी खरेदी करायची… मिठागरं बघायची उत्सुकता तर खूप होती… शिवाय डबल-डेकर बस म्हणजे नेमकी कशी बस ते पहायचं होतं… त्यातून फिरायचं होतं… आणि सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते मुंबईचा समुद्र बघायचं… जन्मापासून त्या सुंदर समुद्राशी जोडली गेलेली नाळ अजिबात तुटू द्यायची नाही, हे मुंबईलाही समुद्र आहे असं कळल्याकळल्या तिने पक्कं ठरवलं होतं… पण आयुष्य त्या चाळीच्या विश्वात गुरफटून गेलं, तशी ही इवलीशी स्वप्नंही मनाच्या गाठोड्यात गुरफटली गेली… गुदमरून गेली… हळूहळू विस्मरणातही गेली.
काळ धावत होता. मुली मोठ्या झाल्या. कसंही करून पदवीपर्यंत त्यांना शिकवायचंच् हा तिचा निर्धार स्वत:च्या बाबतीत काटकसर करत ती तडीला नेत होती. ती आणि नवरा दोघेही फक्त बारावी पास. त्यामुळे स्टोअर कीपर आणि एल्. डी. सी. या दोन्ही पदांच्या उन्नतीचा प्रश्नच नव्हता… लोकलमधल्या आणि ऑफिसमधल्या भिशीत नियमित भाग घेऊन, पगार वाढला तरी त्या वाढीला हातही न लावता, काही रक्कम, थोडे फार सोने, बाजूला टाकले होते. पाठोपाठच्या मुलींची लग्नेही पाठोपाठ करावी लागणार होती म्हणून खूप आधीच, स्वत:च्या लग्नात आई-वडलांनी घातलेल्या चार बांगड्या आणि एक छोटं नेकलेस फार न वापरता तिने तसंच ठेवलं होतं. मुली दिसायला नीटस होत्या. समजूतदार-सुस्वभावी होत्या. पदवी परीक्षा झाल्याझाल्याच दोघींनाही खात्या-पित्या घरातली स्थळं सांगून आली. स्वत:चे हात रिकामे असतांना समोरच्याचे हात गच्च भरलेले नाहीत म्हणून तक्रार का करायची, हा तिचा साधा-सरळ विचार होता. आणि दोन्ही भावी जावईही निर्व्यसनी, दिसायला तरतरीत होते. फारशा जबाबदाऱ्याही नव्हत्या त्यांच्यावर. पगारही समाधानकारक होते. आणि याहून अधिक विचार करायला तिला वाव तरी कुठे होता? एका वर्षाच्या अंतराने दोघीही सासरी गेल्या. पण पैशाचे अपुरेपण मात्र घरात कायमचे ठाण मांडून बसले होते. दोघींच्याही लग्नासाठी काही कर्ज घ्यावे लागले होते. मुलींवरच्या खर्चाची जागा मग कर्जाच्या हप्त्यांनी घेतली; इतकाच काय तो फरक.
… इतक्या वर्षांच्या धावपळीने तिचं फक्त शरीरच नाही, तर मनही पार थकून गेलं होतं… पण आता ते अतिशय तटस्थ, शांत आणि कमालीचं कणखरही झालं होतं. इतकी वर्षं आटोकाट प्रयत्न करून, न थकता सांभाळलेलं जबाबदाऱ्यांचं ओझं थोडं कमी झालं होतं खरं. पण म्हणून लगेच नोकरी सोडण्याचा विचार करणं अशक्य होतं. एखाद्या वर्षात नवऱ्याची नोकरी संपणार होती, तरी तिची ४-५ वर्षं शिल्लक होती. त्याच्या खाजगी नोकरीत पेन्शन हा प्रकार नव्हताच. थोडा फार फंड मिळणार असला, तरी दोघांच्या म्हातारपणाची सोय त्यातूनच करायची होती. शिवाय निवृत्तीचं वय होण्याआधीच तिने नोकरी सोडली असती तर तिला मिळू शकणाऱ्या पेन्शनचा आकडा कमी झाला असता. त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. कितीही दमली-थकली असली, प्रकृती त्रास द्यायला लागली असली, तरी मध्येच नोकरी सोडून देण्याचा विचारही ती करू शकत नव्हती. आता पाय झपझप चालत नव्हते… ओढावे लागत होते. पण सगळं काही सहन करत, सकाळची ९ वाजून सात मिनिटांनी सुटणारी लोकल पकडणं अनिवार्यच होतं…
…. पण अलिकडे या रहाटगाडग्यासारख्या फिरणाऱ्या आयुष्यात, आता एक स्वप्न मात्र नव्याने तिला साद घालत होतं…पूर्वीसारखंच अगदी छोटंसं….. निवृत्त होण्याआधी निदान एका महिन्यापुरता तरी त्या ९-०७ च्या लोकलच्या फर्स्टक्लासचा पास काढायचा, आणि जरा चांगल्या साड्यांचे, ड्रेसचे धक्के खात, मधूनच दरवळणारा परफ्यूमचा वास घेत ऑफिसला पोहोचायचं… आणि मगच रिटायर व्हायचं… बस्… एवढंच एक छोटंसं स्वप्न.. तसं खरं तर शेवटचंच…… पण हे तरी पूर्ण होईल ना? –
…. ती पुन्हा शांतपणे त्या गर्दीत मिसळून जायची.
– समाप्त –
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





