डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ धोक्याचे वळण… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(उद्या दुपारी तू काय करणार आहेस? उद्या आमच्या घरी येशील का? निरंजन दोन दिवस दौऱ्यावर चाललाय. कोण जाणे, मला नंतर तुझ्याशी बोलायला सवड मिळेल न मिळेल” नक्की ये ग मी वाट बघते. ” बिल देऊन त्या देवांगीबरोबर बाहेर पडल्या.) इथून पुढे —–
तेवढ्यात स्वरा आली. झालं बाई माझं काम. म्हणाली आणि तो विषय तिथंच राहिला.
सध्या आईला यातलं काहीच सांगायला नको असं ठरवून देवांगी दुसऱ्या दिवशी दुपारी अमला बाईंच्या घरी गेली.
शांत दुपार, झळा नसलेलं सौम्य ऊन आणि बंगल्यातली हवीहवीशी झाडांची शीतल सावली.
देवांगी घरात शिरली. अमला बाईनी हसून तिचं स्वागत केलं. ”आलीस? ये बस. तिला सरबताचा ग्लास देत त्या म्हणाल्या. निरंजन गेलाय नाटकाच्या दौऱ्यावर. म्हणून मी एकटीच निवांत आहे घरी. युनिव्हर्सिटीला टाकली आज सुट्टी. ”
इकडचं तिकडचं बोलून अमलाबाई म्हणाल्या, ”हे बघ. मी आत्ता बोलतेय ते नीट ऐकून मग तुझा काय तो निर्णय घे. इतकी शिकलेली डॉक्टर मुलगी तू, तुझ्याबद्दल फार वाटतं म्हणून सांगते. तुझ्यात मला हळवी भाबडी अमलाच दिसते. ”
अमलाबाई म्हणाल्या, ” मीही तेव्हा लहानच होते ग. फक्त अठरा वर्षाची. दिसायला सुंदर आणि खूप हुशार. त्या दिवशी कॉलेजमध्ये भय्यासाहेब आले. कॉलेज गॅदरिंगचे नाटक बसवायला. किती रुबाबदार, छान त्यांची पर्सनॅलिटी ग. कोणीही भाळून जावे अशीच. मी नाटकात नायिका होते आणि देवेश हिरो. किती हुशार होता देवेश. आमची जोडी लोकांनी डोक्यावर घेतली. त्या वर्षी नाटयोत्सवातली सगळी बक्षिसं आमच्या नाटकाला मिळाली. देवेशचे पाय जमिनीवर होते. त्याला पुढे खूप शिकून परदेशात जायचे होते. नाटकाचे वारे संपले आणि देवेश झटून अभ्यासाला लागला. मी मात्र अजून त्याच धुंदीत होते. दरम्यान भय्यासाहेब मला सतत भेटत, सांगत, ‘तुझा जन्म फक्त नटी, उत्तम स्टेज आर्टिस्ट म्हणून झालाय अमला. हे लौकिक शिक्षण कसलं घेऊन बसलीस? मला तुझ्यात खूप मोठी भावी नटी दिसते. मी घडवीन तुला ‘लहान कोवळं वय ग ते. कोणी स्तुती केली की हुरळून जाण्याचं. त्यातून मला बाहेर काढलं ते माझ्या वडिलांनी…. ‘ हे बघ अमला. तू अतिशय हुशार जिनिअस मुलगी आहेस. त्या भय्यासाहेबांच्या नादाला लागू नकोस. माझ्या कानावर गोष्टी येत नाहीत असं वाटलं का तुला? आज चलच त्या नाटक्याच्या घरी. ‘…. मला ते भय्यासाहेबांच्या घरी अचानक त्यांना न सांगता घेऊन गेले.
दोन खोल्यातलं चाळीतलं घर. त्यांची अगदी साधीसुधी खेडवळ बायको आणि खेळत असलेली दोन मुलं. फाटका बनियन घालून बसलेले भय्यासाहेब आणि डाय उडल्यामुळे दिसणारे पांढरे केस. आणि त्या घरात जागोजागी दिसणारं दारिद्र्य. आम्हाला अचानक बघून ते हादरलेच आणि विलक्षण खजील झाले.
एक अक्षर न बोलता माझे वडील मला घरी घेऊन आले. मला म्हणाले. ”बघितलंस? बघितलास तो संसार? सांगितलं होतं का त्यांनी की त्यांचं लग्न झालंय दोन पोरं आहेत त्याला. हे? मूर्ख मुली. भानावर ये. “
मी हे सगळं बघून घाबरून गेले. त्याक्षणी मी शपथ घेतली, मी कधीही भय्यासाहेब, ते नाटक यांच्या नादाला लागणार नाही. किती उपकारच केले बाबांनी माझ्यावर.
मी झटून अभ्यासात लक्ष घातले. सतत पहिली येत गेले आणि माझ्या आवडीच्या गणित विषयात पीएचडी केलं. बाबांनी माझं लग्न सरदार नाईकांशी लावून दिलं. अतिशय सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर असलेल्या हेमंत नाईकांशी. अतिशय सुंदर संसार केला आम्ही. हा निरंजन आमचा एकुलता एक मुलगा. लहानपणी खूप हुशार गुणी मुलगा ग. पण पुढे त्याचं अभ्यासातून लक्षच उडलं. एका नाटकात यश मिळतं काय आणि हा वेडा त्यातच करिअर करायचं म्हणतो काय. आम्ही दोघेही त्याला सांगून थकलो पण त्याने ऐकले नाहीये अजूनही.
दोनच वर्षांपूर्वी नाईकसाहेब अचानक कॅन्सरने गेले. सुदैवाने आम्हाला भरपूर पैसा आहे, चार घरं आहेत. पण हा मुलगा नीट शिकला नाही याची खंत होतीच त्यांनाही.
“हा माझा मुलगा बुद्धीने आमच्या दोघांसारखा हुशार नाही. अगदी बेताचा आहे ग. नुसतं रूप उपयोगाचं नसतं ग देवांगी. त्याला हे सांगून कधीही समजलं नाही. तू त्याच्यापेक्षा फार सुपिरिअर आहेस बाळा. नुसत्या त्याच्या देखण्या रूपावर आणि हवेत इमले बांधण्याच्या स्वभावावर जाऊ नकोस. नुसतीच मोठी स्वप्ने बघून आणि चार नाटकात किरकोळ कामे करून, या मुलाचा जगात निभाव लागणार नाही हे स्पष्ट दिसतंय मला.. तू त्याच्याशी लग्न केलंस तर चारच महिन्यात तुला तुमच्या बुद्धीतली तफावत जाणवेल आणि मग तो कायम तुझा अपमान करत राहील. तुला हीन लेखत जाईल. तो हे माझ्याशी करतोच ना. माझा हेवा वाटतो त्याला. मी लक्ष देत नाही ते सोड. देवांगी, मला त्या मोहाच्या क्षणी माझ्या वडिलांनी वाचवलं, म्हणून मी आज आहे अशी सन्मानाने जगताना दिसतेय जगाला. माझ्याच मुलाच्या उणिवा तुला सांगताना मलाआनंद होत नाहीये ग. पण देवांगी, मला तुझ्यात भाबडी अमला दिसली म्हणून मी हे तुला सांगितलं. तुझ्या बुद्धीच्या तोलामोलाचा सुरेख साथीदार तू शोध. या नाटकाच्या दुनियेत पाऊल टाकू नको मुली. ” अमलाबाईनी डोळे पुसले.
देवांगी हे ऐकून हेलावून गेली. तिचे डोळे भरून आले.
“काकू, मी आततायीपणे कोणताही निर्णय घेणार नाही. खूप खूप आभारी आहे मी तुमची. मी नक्की पाऊल पुढे टाकलं असतं आणि जन्मभर नशिबी आली असती ती होरपळ.
देवांगी अमलाबाईंच्या पायाशी वाकली. त्यांनी तिला मिठीत घेतलं.
आज विमानात बसल्याबसल्या देवांगीला हे सगळं आठवलं. किती वर्षे झाली या गोष्टीला.
देवांगी स्कॉलरशिप घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. पेडिएट्रिक डेंटल सर्जरीत मास्टर्स करून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या पदावर होती देवांगी.
तिच्याही आयुष्यात किती घटना घडल्या. तिचाच बॉस असलेल्या हर्ष मराठेने तिला मागणी घातली आणि त्यांचे भारतात येऊन लग्नही झाले. तेव्हा अमलाबाईना भेटणं जमलं नाही पण या भेटीत मात्र आपण अमला बाईना भेटायचेच असं देवांगीने ठरवलं आणि तसं हर्षला बजावून सांगितलं सुद्धा.
हर्षच्या आईवडिलांना भेटून झाल्यावर अचानकच देवांगी हर्षला घेऊन अमला बाईंच्या बंगल्यावर गेली.
बंगला होता तसाच होता. थोडा आणखी वृद्ध झालेला.
बेल वाजवून बाहेर थांबली देवांगी. दार उघडायला आला तो निरंजन. हिला बघून तर धक्का बसलेला स्पष्ट दिसला त्याच्या चेहऱ्यावर. सुंदर, अजूनही तरुण असणारी, दिसणारी, बुद्धीचं तेज आणि संपन्न देशातली संपन्न रहाणी अंगोपांगी दर्शवणारी देवांगी. आणि तिच्या मागे सुंदर, उत्तम पोशाखात उभा असलेला हसतमुख देखणा रुबाबदार पुरुष.
— निरंजनने स्वतःकडे बघितलं. विरळ झालेले केस, सुटलेले पोट डोळ्याखाली वर्तुळं आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या. गबाळा घरी घातलेला पायजमा. या या ना म्हणत निरंजन मागे झाला.
देवांगीने विचारलं, ” कसा आहेस निरंजन? अमलाबाई कुठे आहेत? “
चाहूल ऐकून अमलाबाई बाहेरआल्या. क्षणभर त्यांनी देवांगीला ओळखलेच नाही.
मग मात्र, ” देवांगी, तू? ” म्हणत त्यांनी तिला मिठी मारली.
“अमला काकू, आहात तशाच आहात तुम्ही. “
” बस ग बस त्या म्हणाल्या. ” संकोचून निरांजन शेजारी उभा होता.
” निरंजन, अमला काकू, हे माझे मिस्टर डॉक्टर हर्ष मराठे. अमेरिकेला असतो आम्ही. “
अमला काकूंना देवांगीने आणि हर्षने वाकून नमस्कार केला. त्यांच्या हातात सुंदर स्वेटर, तिकडची चॉकलेट्स आणि निरंजनला एक छान टी शर्ट दिला.
” काकू, तुम्ही म्हणाला होतात तसा हा मिस्टर राईट मला तिकडे मिळाला. माझ्यापेक्षा काकणभर सरसच आहे हा. तुमचे आभार कसे मानू हे समजत नाही मला.
एखाद्या क्षणी देवदूत यावा तशा माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य बदलून गेलं. फक्त तुमच्यामुळे काकू. नाहीतर मी भलता निर्णय घेतलाच असता. “
अमला काकू हसल्या. ” छान आहे ग तुझा जोडीदार. जावईबापू, आवडलात तुम्ही मला खूप.
निरंजन आत गेल्यावर त्या हळूच म्हणाल्या, “बघ देवांगी. तू घेतलेला निर्णय योग्य ठरला. निरंजनचे काहीही होऊ शकलं नाही ग. घुसमट झाली त्याची आणि आता तर घरीच असतो. उशिरा समजलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागतेच ग. तेव्हा आमचं ऐकलं नाही आणि नाटकात सिनेमात काहीही करिअर होऊ शकलं नाही, की नाही लग्न होऊ शकलं. मला आनंद आहे, तू यातून वाचलीस मुली. ” अमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. “वाईट वाटतं ग त्याचं मला, पण हाताने केलेल्या चुका या. ”
अमला बाईंचा निरोप घेऊन देवांगी आणि हर्ष बाहेर आले.
“हर्ष, तुला मी पूर्वीच हे सगळं सांगितलं आहे रे. आज मी निरंजनशी लग्न करायची घोडचूक केली असती तर माझी अशीच वाईट अवस्था झाली असती. मला वाचवलं ते मोठ्या मनाच्या अमला काकूंनी. किती मोठं मन असेल त्यांचं, की आपल्या मुलाशी तू लग्न करू नकोस हे मला सांगणारं? “
काही न बोलता देवांगीला जवळ घेऊन ती आणि हर्ष बंगल्याच्या पायऱ्या उतरू लागले.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





