श्री नितीन सुभाष चंदनशिवे

?जीवनरंग ?

☆ उतरंड…  ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे  

कॉलेजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण एकमेकांना मिठ्या मारून निरोप घेत होते. मैदानावर तर त्यादिवशी जत्रा भरलेली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी दाटून आलेलं दिसत होतं. आणि मी वैशालीला आणि विनयला शोधत होतो. जवळपास अर्धा तास होऊन गेला तरी दोघेजण माझ्या नजरेला दिसत नव्हते. शेवटी मी त्यांना शोधायचा नाद सोडला आणि जायला निघालो. तर कॉलेजच्या गेटजवळ दोघेजण दिसले.

दोघेही एकमेकांच्या समोर जवळपास दहा फुटांवर उभे होते. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात टक लावून पाहत होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. आणि एकमेकांच्या जवळही जात नव्हतं. त्यांना त्या अवस्थेत मी बघितलं आणि माझ्याच काळजाचं पाणी झालं. मी विनय जवळ गेलो. त्याचा हात धरला आणि त्याला ओढून वैशाली जवळ आणून उभं केलं. तसा विनयचा हुंदका बाहेर पडला त्याच्या डोळ्यातून पाण्याची धार वाहायला लागली. त्याने खिशातला रुमाल काढला आणि डोळे पुसणार तोच वैशालीने त्याच्या दोन्ही डोळ्यातलं पाणी तिच्या दोन्ही हाताने पुसायला सुरवात केली.

मी मात्र हा खेळ शांतपणे बघत उभा राहिलो. दोघांच्याही डोळ्यातलं पाणी संपल्यावर मग दोघांना मी तिथं असल्याची जाणीव झाली. आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्या दोघांचा एकमेव आधार मी होतो. दोघांचाही मितवा मीच होतो. त्या दोघांच्यात काही भांडण झालं किंवा वाद झाले तर कायम मीच मिटवायला हजर असायचो. दोघेही जीवापाड प्रेम करायचे. त्या दोघांचा हा सिनेमा तीन वर्षे सुरू होता आणि मी एकटाच हा सिनेमा पाहत आलो होतो. काहीवेळा तर या सिनेमाचा लेखक मीच झालो होतो. कारण बऱ्याचवेळा त्या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यात माझा वाटा मोठा होता.

आज आम्ही तिघेही वेगळे होणार होतो. पुन्हा भेट होईल न होईल माहित नव्हतं. पण या दोघांनी मात्र आयुष्यभर सोबत राहायचं लग्न करून संसार करायचा ही स्वप्ने बघितली होती. पण उद्यापासून भेट होणार नव्हती. एकमेकांना बोलता येणार नव्हतं. त्यावेळी मोबाईल नव्हते. वैशालीच्या घरी फोन होता. पण तो तिला वापरायला बंदी होती. एकमेकांचा निरोप एकमेकांना पोचवायचा कसा? हा त्यादिवशी मोठा प्रश्न दोघांनाही पडलेला होता. आणि याचं उत्तर फक्त माझ्याजवळ मिळेल असा त्यांना विश्वास होता.

आम्ही तिघेही चालत एस. टी स्टँड वर आलो. तिघांची तीन गावे तिन्ही दिशेला होती. त्यामुळे आता जशा गाड्या येतील तसे आम्ही वेगळे होणार होतो. दोघेही माझ्याकडे केविलवाणे पाहू लागले. आणि मला मार्ग सुचला. ठरलं असं ज्या गाड्या आमच्या गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी येतात आणि जातात त्या एस. टी. च्या मागे खडूने कोड मध्ये आपला मेसेज लिहायचा. मग ते कोड ही मी ठरवले. हळूहळू तिघांच्या गाड्या आल्या आणि आम्ही वेगळे झालो.

मी आणि विनय मात्र दुसऱ्या दिवसापासून भेटू लागलो. स्टँडवर विनय सकाळीच हजर असायचा. दुसऱ्या दिवशी वैशालीच्या गावची गाडी समोर उभी होती. विनयने खिशात खडू आणलेच होते. आम्ही गाडीच्या मागे गेलो आणि तिथं 8.. 1.. एवढच लिहिलं. त्याचा अर्थ होता आठवण येतेय.. म्हणून… दोघेही हसलो. गाडी गेली. ती गाडी जाऊन पुन्हा यायला तीन तास लागायचे. आम्ही वाट पाहत थांबलो. तीन तासाने ती गाडी पुन्हा आली. आम्ही धावत गाडीच्या मागे जाऊन बघितलं. तर वैशालीने तिथं चौकोन काढून त्यात खाडाखोड केली होती. आणि तिथं बारीक अक्षरात तीन शब्द लिहिले होते. ते असे.. त… रा… स..

याचा अर्थ तिला खूप त्रास होतोय..

दुसऱ्या दिवशी आम्ही गाडीवर लिहिलं.. एक प्रश्नचिन्ह काढलं. त्याच्या पुढे मराठीत त्रेसष्ठ लिहिलं. याचा अर्थ होता कधी भेटायचं? . गाडी गेली. पुन्हा तीन तास वाट बघत बसलो. पुन्हा गाडी आली. आम्ही तिथं जाऊन बघितलं पण तिथं काहीच नव्हतं. विनय नाराज झाला. आम्ही तिथून निघणार तेवढ्यात बाजूला चिकटवलेलं पत्रक दिसलं. ते पत्रक होतं तिच्या गावच्या जत्रेचं. आणि त्या पत्रकावर खाली तिने व्ही हे अक्षर इंग्रजी मध्ये दोनवेळा लिहिलेलं होतं. विनय आणि वैशाली. म्हणजे जत्रेत या तिथं भेट होईल. विनयला लै आनंद झाला. आम्ही गाडीवर पुन्हा लिहिलं. ओके.. आणि पुन्हा प्रश्नचिन्ह.. म्हणजे जत्रेत कुठं आणि किती वाजता.??  गाडी गेली.. आता पुन्हा वाट पाहणे गरजेचे होते. पुन्हा गाडी आली आणि उत्तर ही आलं. तिने एक गोल काढून त्यावर बारीक बारीक चौकोन काढलेले होते. आणि मध्ये दहा हा आकडा लिहिलेला होता. आम्ही डोकं खाजवून खाजवून अंदाज लावला आणि माझ्या लक्षात आलं. जत्रेत पाळणे येतात. त्या पाळण्या जवळ दहा वाजता भेट होईल. मी हा शोध लावल्यावर विनय माझ्याकडे फार कौतुकाने बघू लागला.

मी आणि विनय तिच्या गावच्या जत्रेत हजर झालो. जिथे पाळणे होते तिथं तिची वाट पाहत थांबलो. आणि काही वेळाने घामाने भिजलेली वैशाली तिथं आली. विनय आणि वैशाली दोघेही बराच वेळ तिथं थांबले. मी तोपर्यंत जत्रा फिरून आलो. विनयने तिच्या हातात गुलाबी फुगा दिला आणि मी तिथून निघालो.

सहा महिने हा खेळ सुरू राहिला. मला एका ठिकाणी नोकरी मिळाली होती. मी माझ्या कामाला जात होतो. विनय मात्र दररोज एस. टी स्टँडवर पडून असायचा. आणि रात्री एका ठिकाणी कामाला जायचा. काम संपवून सकाळी स्टँडवर हजर व्हायचा आणि प्रेमाच्या त्या अक्षरांचा खेळ रंगवत बसायचा. आता बऱ्यापैकी दोघानाही कोड ची भाषा जमायला लागलेली होती. अर्थात या शाळेचा आणि या दोघांचा मास्तर मी होतो. त्यामुळे मला समाधान होतं. मी माझ्या नव्या नोकरीत रमून गेलो होतो. विनय ही बरेच दिवस झाले मला भेटायला आला नव्हता. एस. टी दोघांच्या भावना एकमेकांच्या पर्यंत फुकट पोहचवत होती.

दोन महिन्यांनी आज विनय माझ्याकडे धावत पळत आला. मी कामावर होतो. स्टँड पासून माझं काम फार लांब नव्हतं. विनय काहीच बोलला नाही. गोंधळला होता. माझा हात धरून तो मला स्टँडवर घेऊन गेला. वैशालीच्या गावावरून आलेली एस. टी. नेहमीच्या जागेवर थांबून होती. विनयने

माझा हात धरून गाडीच्या मागे नेलं. वैशालीने पाठवलेला निरोप म्हणजे कोड त्याला आज समजला नव्हता. म्हणून तो मला घेऊन आला होता.

गाडीच्या मागे आज वैशालीने चित्र काढलेलं होतं. मडक्यावर मडके अशी पाच मडकी काढलेली होती. सगळ्यात खालचं मडकं मोठं. त्यावर त्याच्यापेक्षा लहान. त्यावर अजून लहान. अशी पाच मडकी एका रेषेत काढून बाजूला तिने एक मोठं वर्तुळ काढून ते ठळक केलं होतं. ते बघितलं आणि मला त्याचा अर्थ कळला. विनय तसाच गोंधळून माझ्याकडे पाहत होता. मला हुंदका दाटून आला. आणि मी त्याला गच्च मिठी मारली. आणि त्याला मिठीत घेत म्हणालो, ”विनय वैशाली आता कधीच तुला भेटू शकणार नाही. तू तिला विसरून जा. तुझ्या नव्या आयुष्याला सुरवात कर.. ” 

विनय चिडला. त्याने मला विचारलं याचा अर्थ काय ते नीट सांग. मी विनयला पुन्हा त्या चित्राजवळ नेलं. आणि समजावून सांगितलं.. ही एकावर एक उभी असलेली मडकी म्हणजे जातीयतेची उतरंड आहे भावा.. ही उतरंड फोडून तिला तुझ्याकडे यायला परवानगी नाही. म्हणून बाजूला मोठं वर्तुळ काढून तिने तिची वेदना यात भरून पूर्णविराम दिला आहे. म्हणजे तिला थांबण्याशिवाय आता पर्याय नाही.

विनय एकदम शांत होऊन त्या चित्राकडे पाहत उभा होता आणि मी विनयकडे एकटक नजर लावून उभा होतो. तेवढ्यात गाडी सुरू झाली. विनयने ते चित्र हाताने पुसून टाकलं आणि जोरात हंबरडा फोडून रडायला लागला. त्याने जातीयतेचे वैशालीने काढलेले चित्र हाताने पुसले खरे पण ती जातीयतेची उतरंड मात्र आम्हाला फोडता आलीच नाही.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments