डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ वाट चुकलेलं वासरू… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
काल सगळ्या मैत्रिणींनी बागेत जमायचं ठरवलं होतं. त्यांच्या ग्रुपमधली जया आता चार महिने सुनेकडे चालली होतीजपानला. मग त्यांची भेट होणार नाही म्हणून सगळ्या बागेत जमणार होत्या. मग गप्पागोष्टी झाल्यावर समोरच्या हॉटेलमध्ये खाऊन मग घरी जायचं अस ठरवलं होतं त्यांनी.
या सगळ्या मैत्रिणी जवळ रहाणाऱ्या, तरुणपणीच शेजारी शेजारी फ्लॅट असल्याने आता पक्क्या मैत्रिणी झालेल्या. सगळ्यांची मुलं मोठी झाली, कोणी इथेच छान सेटल झाली. काहींची परदेशी गेली. मग आईवडिलांच्या परदेश वाऱ्या सुरू झाल्या.
आज अजून वीणा कशी आली नाही म्हणून तिची वाट बघत सगळ्या थांबल्या होत्या. इतक्यात धापा टाकत वीणा आलीच.
“ सॉरी ग बायानो. मला घरातून निघायलाच उशीर झाला आणि मग रिक्षाच मिळेना. ” घाम पुसत वीणा म्हणाली. वीणा रूपाच्या शेजारी बसली. रूपा आणि वीणाची फार घट्ट मैत्री होती. दोघीनीही एकाच बँकेत नोकरी केली. दोघींचे नवरेही बँकेतच होते. रुपाला एकच मुलगा. छान शिकून तो परदेशी स्थायिक झाला. वीणाला एकच मुलगी… मंजिरी.
या सगळ्याजणी वीणा आल्यावर समोरच्या हॉटेलमध्ये गेल्या. जयाने आज सगळ्याना पार्टी दिली.
“ आता मी चार महिने जपानला असणार. संपर्कात रहा ग. टेक्स्ट फोन करत रहा. नाहीतर जाल विसरून मला. ” हसत हसत जया म्हणाली. भरपूर खाऊन झाल्यावर सगळ्या निघाल्या.
वीणा म्हणाली “ रूपा, घाई आहे का ग तुला घरी जायची? नसेल तर चल ना जरा बागेतच बसूया. ” सगळ्या गेल्यावर वीणा आणि रूपा बागेतल्या बाकावर बसल्या. वीणा खिन्न होऊन समोर बघत होती. मनात दुसरेच विचार चालले होते तिच्या. रूपा म्हणाली, “आता सांगून टाक बघू काय झालंय ते. ”
वीणा खिन्नपणे म्हणाली, “ काय सांगू ग रोजचीच रडकथा. आपलेच दात आपलेच ओठ. आजही माझं आणि मंजिरीचं वाजलं. अग कशी वागते ग ही मुलगी.. माझी एकुलती एक सख्खी मुलगी ना ही? कोणाला सांगितलं तर विश्वास तरी बसेल का? नुसता छळ झालाय हिच्यामुळे आमचा. चांगलं छान स्थळ बघून थाटामाटात लग्न करून दिलं. देवमाणसं आहेत बरं सासरची माणसं. जेमतेम चार वर्षे नांदली आणि पटत नाही म्हणून कायमची आली माघारी. नोकरी तर कधी केलीच नाही आणि करायचीही नाहीये. कठीण आहे ग बाई सगळं. काल बाहेरून आली आणि म्हणाली, ’आई माझ्या अकाउंटला वीस हजार रुपये ट्रान्सफर कर. मला हवे आहेत लगेच. ’ अग, काय हा त्रास मला? हे तर काहीही बोलत नाहीत. मला फार त्रास होतो ग. माझी सगळी मनःशांती बिघडून गेलीय हिच्या असल्या वागण्याने. ” वीणाच्या डोळ्यात पाणी आलं.
रूपा हे सगळं ऐकत होती. “ काय ग वीणा, हिने घटस्फोट घेतला तेव्हा नवऱ्याने अँलिमनी नाही का दिला? ”
“ नाही ना. चालली आहेत कोर्टात भांडणं. ती म्हणते मी नोकरी केली तर मला तो देणार नाही पैसे म्हणून ही काहीही करत नाही. मला नको जीव झालाय बघ. आलीय परत ते ठीक आहे, माझीच मुलगी आहे ग ती. तिला सपोर्ट करणं आमचं कामच आहे, पण तिला त्याची अजिबात जाणीव नाही. आज तीन वर्षे झाली, हे सहन करतोय आम्ही. किती पैसे पुरवू मी हिला? वर म्हणते, ’नाहीतरी हे सगळं तुम्ही मलाच देणार ना? मग आत्ताच दिलंत तर काय बिघडलं? ‘ बिनदिक्कत म्हणते, ‘ मला पैसे हवेत. ’ आज दहा.. उद्या पंधरा करत आता मीच खंक होईन बघ रूपा. परवा म्हणाली, ‘ हा फ्लॅट माझ्या नावावर करून द्या. मी काय तुम्हाला टाकणार नाहीये, मलाच करायचं आहे ना तुमचं शेवटी? ’ ”
रुपाला हे ऐकून फार वाईट वाटलं. आपली लाडकी मैत्रीण विनाकारण अशी कात्रीत सापडलेली पाहून तिला फार वाईट वाटलं. न बोलता वीणा घरी निघून गेली. रूपाने घरी येऊन खूप विचार केला. आपल्याच मुली अशा वागतात? हक्काने आईवडिलांच्या घरी परत यायचं आणि त्यांना ओरबाडून घ्यायचं? कोणत्या हक्काने? वर ही अरेरावी?
रूपा हे तिच्या नवऱ्याशीही बोलली. त्याला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, “ तुझ्या मैत्रिणीनेच या बाबतीत फर्म स्टॅण्ड घेतला पाहिजे. जितके हे लोक सहन करत रहातील ना रूपा, तितकी ही मुलगी अरेरावी करत राहील. एकदाच तिला सुनवायला नको का? आपण सगळे गेल्यावर आपल्या संपत्तीवर हक्क सांगणं वेगळं आणि असं आईवडिलांना ब्लॅकमेल करणं तर फार वाईट. हे काय ग मंजिरीचं बोलणं, की नंतर तरी मलाच देणार तर आत्ताच द्या. अत्यंत चुकीचं आहे हे. तुझी वीणा हे का सहन करत राहिली आहे? ” रूपा गप्प बसली. नक्की काय आहे हे तिला तरी कुठं ठाऊक होतं?
त्यानंतर बरेच दिवस झाले. रूपाची वीणाशी गाठभेटच झाली नाही. नंतर अचानक वीणा रुपाला भाजी मार्केट मध्ये भेटली.
रूपाने विचारलं “ कशी आहेस वीणा? काय म्हणते मंजिरी? ”
वीणा म्हणाली, “ जैसे थे. काहीही बदल नाही. मला आता कंटाळा आलाय ग या सगळ्या न बदलणाऱ्या परिस्थितीचा. काय करावं काही सुचत नाहीये. परवा तर हद्द झाली. म्हणाली, ‘ आई, तुम्ही दोघे वृद्धाश्रमात का जात नाही? मी इथे एकटी राहीन. तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला आणि माझं मला. कशाला आपण रोज वाद विवाद करत रहायचं? ‘ रूपा, आता हेच शिल्लक राहिलं होतं बघ ऐकायचं. असुनी खास मालक घरचा… ”
वीणाला रूपाने घरी बोलावलं. “ वीणा, आज संध्याकाळी माझ्या घरी ये. आपण बोलूया आणि यावर आता आपण उपाय शोधूच या ग. तुझा नवरा काहीही बोलत नाही. पण तू असं उगीच सहन नको करत बसू. मी माझ्या नवऱ्याशी.. सुधीरशी बोललेय. निघेल निघेल मार्ग. ”
त्या दिवशी संध्याकाळी वीणा रुपाकडे गेली. सुधीर आणि रूपा हॉलमध्ये बसले होते. चहा खाणे झाल्यावर सुधीर म्हणाला, “ वीणा, हे बघ. मला रूपाने सगळं सांगितलं आहे. तुम्ही आत्तापर्यंत मंजिरीला खूप टॉलरेट केलंत. तिला असं वाटतंय की तुम्ही तिला घाबरता. ती म्हणेल ते ऐकता. असं सहन करू नका वीणा. तुम्हाला असं वाटतंय का, तिने म्हातारपणी आपल्याला विचारलं नाही तर आपलं कसं होईल? असं काही नसतं. मुलं असूनही ती इथे नसलेल्या लोकांना तरी काय उपयोग असतो त्यांचा? तुम्ही आता कठोर पावलं उचलायची वेळ आलीय. माझं ऐकणार असलात तर सांगतो. “ सुधीर बोलायचा थांबला.
वीणा म्हणाली “ सांगा तुम्ही. मी ऐकेन तुमचं. त्यासाठीच तर आलेय ना? ”
सुधीर म्हणाला, “ हे बघ वीणा, मान्य आहे मंजिरी तुमची एकुलती एक मुलगी आहे. दुर्दैवाने ती सासरी नाही राहू शकली. कारणे काही का असेनात पण तुम्हाला तिच्या वागण्याने त्रासच होतोय आणि तिला त्याची जाणीव नाहीये म्हणा किंवा ती मुद्दाम करते म्हणा. तुम्ही तिला याची जाणीव करून द्यायची वेळ आलीय आता. तुम्ही या आठवड्यात तिघेजण एकत्र बसा. तू स्वतः स्पष्ट शब्दात तिला सांग. ‘ मी यापुढे तुझे हे वागणे बोलणे सहन करणार नाही. अति झालं आता. एक तर तुला नोकरी करावी लागेल आणि आमच्याशी नीट वागावे लागेल. नाहीतर काय करायचं ते तू ठरव. मला हा खर्चही परवडेनासा झालाय तुझा. मी फक्त तुला दोनच महिने पैसे देईन. तेवढ्यात तू नोकरी शोध. आणि मला असे हुकूम केलेले चालणारच नाहीत. माझ्या खात्यात पैसे भर आणि काय काय. तुझ्या केसचा माझ्याशी काहीही संबंध नाही. आमचा विचार कधीही करावासा का ग वाटत नाही मंजिरी तुला? किती शोषण करशील आमचं? नीट विचार कर. एवढी शिकलेली मुलगी तू, गेली तीन वर्षे खुशाल आईवडिलांच्या जीवावर मजा मारतेस? वडील काहीही बोलत नाहीत पण मला त्रास होतोय या तुझ्या उन्मत्त वागण्याचा. अशाच वागतात का तुझ्या मैत्रिणी आईवडिलांशी? लवकरात लवकर नोकरी बघायची आणि शक्यतो लवकर वेगळा फ्लॅट भाड्याने बघ. ’ वीणा, हे असं आणि एवढं बोलशील का? “ सुधीर म्हणाला.
“ आणि हे बघ वीणा, रोग जालीम असेल तर उपायही जालीमच करावा लागतो. किती दिवस सहन कराल हे मूर्खांसारखे तिचे वागणे ग? बघ तरी काय करते ती ते. वीणा, तुझ्या म्हातारपणाची काळजी करू नकोस. असंही, ही काय ग तुम्हाला आधार देणार? पुढचं पुढं बघता येईल. ”
वीणा सुधीरकडून नवं बळ घेऊन घरी आली. घरी मंजिरीने पिझा मागवला होता.
”आई त्या डिलिव्हरीचे आठशे रुपये देऊन टाक ग ”.. बसल्याबसल्या मंजिरीने फर्मावले. वीणा सरळ आत निघून गेली. वाट बघून फणफण करत मंजिरीने पैसे दिले.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




