श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ बेचैनी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
जानेवारीत मालती लग्न करून अजयच्या घरी आली आणि चार महिन्यात अजयला तीन महिन्यासाठी सिंगापूरला जावे लागले. अजय आणि मालती दोघेही कष्टी झाले पण तीन महिन्यात तो परत मुंबईला येणार होता. मालती नोकरी करत नव्हती पण या मोठया फ्लॅटमध्ये तिची सासू विदयाताई, दीर विराज आणि त्याची पत्नी लक्ष्मी.. त्त्यांचा मुलगा अनिकेत एकत्र राहत होती. प्रभादेवीसारख्या उच्चभू वस्तीत तीनबेडरूमचा प्लॅट.. प्रत्येक बेडरूमला ग्यालरी.. उंची फार्निचर, उत्तम किचन.. पार्किंगलॉट मध्ये दोन मोठया गाड्या.. ड्रायव्हर इत्यादी. अजित एका मल्टिनॅशनल औषध कंपनीत प्रॉडक्टमॅनेजर आणि त्याचा मोठा भाऊ विराज चार्टर अकाटंट.. त्यान्च्या वडिलांची पण CA फर्म होती.. तीच विराज सांभाळत होता. त्याची पत्नी लक्ष्मी पण श्रीमंत कुटुंबातील आणि मालती पण एका इनकमटॅक्स ऑफसरची मुलगी.
लक्ष्मी आणि मालती जरी नोकरी करत नव्हत्या तरी त्यान्च्या माहेरहून भरपूर दागिने घालून आणि सासरच्या मंडळींना मोठया गिफ्ट देऊन या घरात आल्या होत्या. दोघींच्या माहेरहून भरपूर दागिने घातले होते.
असे असले तरी मालतीच्या अंगावर एक ग्रॅमपण सोने नसे.. त्याची तिला आवडच नव्हती पण तिची जाऊ आणि सासू मात्र कायम अंगावर दागिने घालून मिरवत. मात्र मालतीला हे आवडत नव्हते.. तिला साधे आयुष्य आवडे.. त्यान्च्या गाड्या होत्या.. ड्रायव्हर होते पण ती बाहेर जाताना चालत जाई किंवा बस ट्रेनने जाई. तिची खरेदी पण साधी असे. एकदा नात्यात लग्न होते म्हणूंन तिच्या सासूबाईंनी दोन्ही सुनेना खरेदीसाठी मुंबईतील मोठया दुकानात नेले. गाडीतून उतरून दुकानाकडे जाताना तिला अचानक तिची वर्गमैत्रीण अनुजा समोर आली. तिला अनेकवर्षांनी पहाताच ती थांबली आणि तिने मागून तिला मिठी मारली.. अनुजा भांबवली.. मालतीला पहाताच तिला आनंद झाला.
“माले.. किती वर्षांनी.. कुठे असतेस?
‘अग लग्न झाल माझं यावर्षी.. नवरा सिंगापूरला गेलाय चार महिन्यासाठी.. या काय सासूबाई आणि ही जाऊ लक्ष्मी…
‘बर बर.. तू नोकरी करतेस ना?
‘नाही ग.. करायची इच्छा होती पण.. घरच्याच म्हणणं काही गरजच नाही तर.. तू नोकरी करतेस ना?
‘हो तर.. नोकरी न करून भागेल कस आमचं? मी फोर्ट मधील खादी भंडारात सेल्सगर्ल आहे आणि नवरा एका खाजगी लायब्ररी मध्ये आहे… तू राहतेस कुठे मालती?
“प्रभादेवी.. गणपतीमंदिर आहे ना.. त्याच्या समोर टॉवर आहे.. राजव्हिला.. सतराव्या मजल्यावर रहातो आम्ही.. आणि तू ग अनुजा?
“नालासोपारा. नालासोपारा स्टेशन च्या बाहेर st असते.. तिथून अंदाजे अर्धा तास.. मग दहा मिनिटे चालायचं..
मालतीने पटकन अनुजाचा हात पकडला.. ‘, खुप त्रास होत असणारं तुला अनु..
त्रास होतोच.. पण काय करू.. आमची दोघांची मिळून मिळकत ती किती? इकडे फोर्ट मध्ये कुठे तुम्ही तिघीजणी?
‘अग नात्यात एक लग्न आहे म्हणून खरेदी.. सासूने मला इकडं आणलं.. पण यात फार इंटरेस्ट नसतो..
“बापरे.. असल्या दुकानात खरेदी करायचे आम्ही स्वप्नात पण आणू शकत नाही… आमची खरेदी रस्त्यावर.. मस्त आणि स्वस्त.. विशादाने अनुजा हसली आणि चालू लागली.
मालती तिला पाठमोळी पहात राहिली आणि जडपायानी त्या श्रीमंत आणि महागड्या दुकानात शिरली.
मालती त्या महागडया कपड्याच्या दुकानात शिरली, तेंव्हा तिची सासू आणि जाऊ नवीननवीन शालू घेण्याच्या घाईत होत्या.. बरेच शालू पारखून शेवटी त्यानी प्रत्येकी दोनदोन शालू खरेदी केले. मालतीने काहीच खरेदी केली नाही.. तिच्या सासूला आश्चर्य वाटले..
‘का ग,? निवडलेस नाहीस अजून?
‘नकोच मला… लग्नातील आहेत चार.. तेच नेसणे होत नाही आणि नवीन घेउंन काय करू?
‘अग पण लग्न आहे माझ्या भाच्याच.. त्याला तू लग्नातील शालू नेसून जाणार?
हो.. मला आवड नाही नटण्याची.. उगाच वायफळं खर्च.. त्यातीलच शालू नेसीन मी..
‘बर बाई.. तुझी मर्जी. पण अजयला म्हणशील.. आईनी आणि लक्ष्मीने आपल्याला शालू घेतले.. मला विचारले नाही..
‘मी मुळीच म्हणायची नाही.. त्याना पण कळले आहे मी कशी आहे ती..
लक्ष्मीने नाक मुरडलं आणि गाडीच्या दिशेने निघाली.
मालती गाडीत बसली.. तिची सासू आणि जाऊ लक्ष्मी नवीन शालच्या किमती आणि रंग तिला सांगत होत्या पण ते तिच्या डोक्यपर्यत पोहोचत नव्हते. तिच्या डोळ्यसमोर येत होती.. अनुजा. अनुजा काळे.. वर्गातील सर्वात हुशार मुलगी पण गरीब. तिच्या बुद्धिपुढे आपण कुठेच नव्हतो. पण आज आपण अजयसारख्या देखण्या आणि कर्तबदार पुरुषाची पत्नी आहोत.. प्रभादेवी सारख्या श्रीमंत वस्तीत राहतोय.. पैसा, दागिने.. गाड्या सर्व आहे आणि वर्गातील सर्वात हुशार अनुजा… खाडिभंडारात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करते आहे आणि नालासोपाराहुन रोज फोर्ट मध्ये लटकत लटकत नोकरीसाठी येते आहे. असे का? का असा विरोधाभास? कारण तिची गरिबी हे कारण.. आपले वडील इनकमटॅक्स ऑफिसर.. म्हणजे भरपूर पैसे खाल्ले असणारं.. त्यातून पालीहील सारख्या भागात अलिशान घर.. त्याना शोभेल असा त्यानी जावई शोधला अजयसारखा.. दोन्ही बाजू श्रीमंत.. भरपूर दागिने.. सोन्याचे. हिऱ्याचे.. पण यात माझे क्रेडिट कोणते? मग का मी पैसे खर्च करू? गरज नसताना उंची शालू नेसू..
चार दिवसांनी विदयाताईच्या भाच्याचे लग्न. विदयाताई आणि लक्ष्मीची जोरात तयारी सुरु होती पण मालती शांत होती.. लग्नाला जाताना दोघीनी नवीन शालू आणि भरपूर दागिने अंगावर घातले तर मालतीने एकही दागिना घातला नाही.. तिला अशी पाहून विदयाबाई कडाडल्या
‘काय हे लंकेच्या पार्वतीसारखे.. एकही दागिना नाही अंगावर..
मला दागिन्याची हौसच नाही.
‘अग पण माझ्या माहेरचं लग्न.. सर्वजण तयारी करून येणार आणि माझी सून.. अशी?
‘लक्ष्मी आहे ना दागिने घालून.. एका सुनेने नाही घातले तर काय होते?
विदयाताईचा नाईलाज झाला.. रागारागाने त्या गाडीत बसल्या. त्यान्च्या बाजूलाच मालती दागिने न घालता बसली.
रात्री अजयचा फोन आला..
‘मालू.. तू कसला त्रास होतो आहे का?
‘नाही..
‘मग आजच्या लग्नात साधी साडी.. दागिने घातले नाहीस..
तिच्या लक्षात आले सासूने मुलाला फोन करून सांगितले असणारं.
‘नाही रे.. खरं तर मला नटणे आवडत नाही.. दागिन्याची हौस नाही..
‘कमाल आहे.. कुठल्या स्त्रीला दागिन्याची हौस नसते.. हे मी प्रथमच पहातो आहे..
“तुझे असे विचार पहिल्यापासून आहेत काय?
“काहीप्रमाणात होते.. पण त्या दिवशी अचानक माझी वर्गमैत्रीण अनुजा भेटली आणि तिची परिस्थिती पाहून मी अस्वस्थ झाले.. मी उंची साडया नेसाव्या, दागिने घालावे असा काय मोठा पराक्रम केला आहे? मी श्रीमंत बापाची लेक आणि श्रीमंत घरातली सून.. एवढाच माझा पराक्रम..
‘खरे आहे.. जगात अशी विषमता आहे खरी.. पण त्याला आपण काय करणार?
‘काय तरी करावे असे वाटते.
अजयने फोन ठेवला.
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





