सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ १ लघुकथा आणि ३ अलक (भावानुवाद) – “ मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(१) लघुकथा –  रस्त्याच्या छातीवर पसरलेलं डांबर”

रस्त्याच्या छातीवर डांबर पसरलेलं आहे. त्यावरून मजूर जातांनाचे त्यांच्या पावलांचे आवाज तेवढे ऐकू येताहेत… पण या दृश्याच्या अगदीच पलिकडे आहे त्यांचे दु:ख… वेदना… त्यांची निराश हताश मन:स्थिती…

रस्त्यावर सायकलच्या घंटांचे, गाड्यांच्या कर्कश्श हॉर्नचे आवाज आहेत. कचरा चघळत उभ्या असलेल्या गायींच्या हंबरण्याचा आवाज मध्येमध्ये ऐकू येतोय्. टांगे चाललेत, त्यांच्या घोड्यांच्या टापा ऐकू येताहेत. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या निरागस हसण्या-खिदळण्याचा गोड आवाज ऐकू येतो आहे.

मास्क घातलेले लोक भीतभीतच रस्त्यावर ये-जा करताहेत. त्यांच्या मनात करोना व्हायरसची भीती आहे… आणि त्या भीतीतून जणू मरण डोकावतंय्.

बिचारा मुका रस्ता… जिथे आहे तिथेच आहे… तो उठून कुठेच जाऊ शकत नाही. कुणीतरी फेकलेलं पेटत्या सिगरेटचं थोटूक त्या रस्त्याला कणाकणाने शोषून घेतंय्.

रस्त्यावरचा कचरा गोळा करणारा एक मुलगा… सारखं वहाणारं नाक पुसत.. रडत रडत चाललाय्… 

—- हे सगळं पाहून हवा वाहता वाहता जराशी थांबलीये… सूर्यही थोडा मंदावला आहे… आकाशाची निळाईही थोडी कमी झाली आहे.

रस्त्याच्या कितीतरी वर आकाश आहे… आकाशात पक्षी आहेत… आणि त्यांची सावली जमिनीवर पडली आहे… त्यांच्या पंखांमध्ये उडण्याची आस आहे… मनात आकाश मोजण्याची इच्छा आहे… श्वासांच्या शाईने ते त्यांचा आनंद रेखाटताहेत.

रस्त्याच्या एका बाजूला आलिशान घरं आहेत. पण त्यांना लाकडी कुंपणाने जणू काही बांधून टाकलंय्… कारण तिथे रहाणारे सगळे करोनाने ग्रासलेले आहेत.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मैदान आहे. तिथे हिरवंशार गवत उगवलंय्… ज्यात खूप किडे आहेत… एक चिमणी मन लावून ते किडे खाते आहे. एकीकडे तिची चिवचिव चालूच आहे. तिचा आनंद पाहून रस्ता हळवा होऊ लागलाय्…

दुधाच्या मोठाल्या कासंड्या सायकलला अडकवून काही दूधवाले चालले आहेत. हिंदकाळणाऱ्या त्या कासंड्यातल्या दुधाचा अभिषेक रस्त्यावर होतोय्… आणि रस्ता जरासा तृप्त होतो आहे.

काही माणसं एका तरूणाचा मृतदेह घेऊन रस्त्यावरून चालली आहेत. त्या दृश्याच्या आडून, बेरोजगारीमुळे केलेली एक आत्महत्याच चालली आहे जणू! काही धार्मिक माणसं त्या प्रेताला नमस्कार करताहेत… आणि ते पाहून ते प्रेत उपहासाने हसतंय्…

त्याच रस्त्याने एक शेतकरी त्याचा जवळजवळ रिकामाच असलेला ट्रॅक्टर घेऊन चाललाय्. त्यात अगदी नावालाच थोडंसं धान्य आहे. गावाकडे असणाऱ्या त्याच्या बायकोचा फोन आला आहे. त्याचा भाऊही शेतकरीच होता… आणि त्याने आत्महत्या केल्याचं बायको सांगते आहे. ट्रॅक्टरवर बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर आता दाट अंधार पसरलेला आहे. डोळ्यासमोर पसरलेला अंधार आणि रस्त्यावर पसरलेलं डांबर एकमेकांत मिसळून जणू एक काळाकुट्ट कोलाज बनवताहेत.

रस्त्यावरून शाळेत जाणारी निष्पाप मुलं बघतांना रस्त्याला नेहेमीच खूप छान वाटतं. त्यांच्या एका हातात जणू पृथ्वी असते आणि खिशात असतो सूर्य. त्यांच्या शांत आणि भाबडेपणाने सगळीकडे बघणाऱ्या डोळ्यात बुडून जातांना रस्ताही बाकी सगळं क्षणभर विसरून जातो.

गाणी गात गात रस्त्याकडेचं गवत कापत असणाऱ्या स्त्रिया रस्त्याला आवडतात. त्या रस्त्याने कॉलेजला जाणाऱ्या अल्लड-चंचल मुलींचं हसणं-खिदळणं रस्त्याला फार छान वाटतं. दिवसा असे हे मृदू, गोड आणि सुखद क्षण अनुभवतांना रस्ता खूप खूश होऊन जातो.

… आत्ता रात्रीची वेळ आहे. रस्त्यावरच काही अंतरावर एक दुर्घटना घडली आहे. दारू पिऊन बेधुंद अवस्थेत चाललेल्या एका ड्रायव्हरने त्याच्या गाडीने एका दुर्दैवी सायकलवाल्याला चिरडून टाकलंय्. रस्त्याच्या छातीवर डांबर पसरलेलं आहे. त्यावर मृत व्यक्तीचा छिन्न-विच्छिन्न झालेला देह पडलेला आहे. त्या मृत व्यक्तीचं रक्त त्या डांबरावर सगळीकडे पसरलंय्. तिथली भयाण शांतता जणू काही शोक-गीत गातेय् असं वाटतंय्. नशेत बेधुंद झालेल्या त्या गाडीचा ड्रायव्हर तिथून पळून जाऊन लांब कुठेतरी उभा आहे. हे सगळं दारूण दृश्य पाहून रस्ता शोक करतो आहे. त्याच्या जुन्या आठवणी जाग्या होताहेत…

… कसंही करून पुन्हा एकदा पूर्वीसारखी पायवाट व्हावं आणि पूर्वीसारखंच आमराईत हरवून जावं असं आता अगदी अधीरतेने त्याला वाटतंय्…

… आणि त्या रस्त्याच्या छातीवर पसरलेलं डांबर… 

… हे सगळं त्रासदायक भयंकर दृश्य पाहून घाबरलंय्. त्या डांबराला मनापासून असं वाटायला लागलंय् की… त्याला पंख फुटावेत आणि त्या त्रासदायक दृश्यापासून खूप खूप लांब… त्या निळ्याशार आकाशापर्यंत उडत जाऊन, तिथेच कुठेतरी त्याने दडून बसावं… हरवून गेल्यासारखं……

मूळ हिन्दी कथा : ‘सडक की छाती पर कोलतार’

– – – 

(२) कोवळं ऊन… (अलक) 

आज मन कमालीचं उदास झालं होतं … काहीच सुचत नव्हतं. म्हणून मी घराबाहेर पडलो, आणि इंडिया गेटशेजारी असलेल्या मैदानात येऊन बसलो होतो. तिथल्या हिरवळीवर काही जोडपी गप्पा मारत बसली होती. मुलं क्रिकेट खेळत होती. पण एकूणच वातावरण मात्र फार धूसर धूसर वाटत होतं. आकाश ढगांनी व्यापून गेलं होतं. मी नुसताच बसून राहिलो होतो. इतक्यात समोरून अडीच-तीन वर्षांची एक गोड मुलगी आपल्या आईचा हात धरून उड्या मारत येतांना दिसली.

ती माझ्याजवळून जात असतांना मी प्रेमाने तिला.. ’ हॅलो बेटा.. ‘ म्हटलं. आधी जराशी लाजली ती.. आणि मग माझ्याकडे बघून हात हलवत गोड हसली… आणि ते निष्पाप हसू पाहून मला वाटलं की माझ्या आसपास अचानक अगदी कोवळं ऊन पडलंय …. फक्त आसपासच नाही … तर माझ्या मनातही ….

– हिंदी कथा : धूप.

– – – 

(३) स्वप्न… (अलक) 

एखादं वादळ आल्यासारखा वारा खूप जोराने वहात होता. समोरच असणाऱ्या समुद्रात पाठोपाठ येणाऱ्या लाटाही अगदी अक्राळ विक्राळ दिसत होत्या. तिथे असलेले सगळे लोक घाबरून किनाऱ्यापासून लांब पळत होते. पण एक तरुणी.. जी पाठीमागून पहातांना मला ओळखीची वाटत होती.. ती मात्र किनाऱ्यावर वेगाने आपटणाऱ्या त्या लाटांच्या दिशेने चालली होती.

“ अगं तिकडे का चालली आहेस तू? “.. मी मोठ्याने ओरडत तिला विचारलं.

तिने उत्तरादाखल मला सांगितलं … “ तू त्या दुसऱ्या बाजूला राहतोस ना.. म्हणून मी तुझ्यापासून दूर.. उलट्या दिशेने चालले आहे.. “ 

… तिचं हे उत्तर ऐकलं आणि माझे डोळे खाडकन उघडले…. कायम माझ्या स्वप्नात राहणाऱ्या त्या तरुणीला मी ओळखलं …. नुकतीच मला सोडून गेलेली माझी प्रेयसी होती ती … मी भानावर आलो.. म्हणजे मला झालेला भास होता हा …. आणि तो मला सांगत होता की.. याआधी इतके दिवस माझ्याबद्दल तिच्या मनात जे प्रेम होतं ते प्रेम.. ती भावना आता पूर्णपणे मिटून गेली होती… कायमची संपून गेली होती….

– हिंदी कथा : सपना.

– – – 

(४) नोकरी …. (अलक) 

थोड्या वेळापूर्वीच मला ही नोकरी मिळाल्याचं पत्र आलं होतं. आणि अर्थातच घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. भाऊ अक्षरशः पळत जाऊन पेढे घेऊन आला होता. आईने प्रेमाने माझ्या कपाळावर ओठ टेकवून मला तोंडभरून आशीर्वाद दिला. वडलांनी अतिशय मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला…. ते काहीच बोलले नाहीत पण त्यांचे डोळे बोलत होते …. ‘ माझ्या हुशार मुलाला ही नोकरी तर मिळणारच होती.. ‘.. “ पार्टी पाहिजे … दादा पार्टी द्यायचीच आहेस तू.. “ असा बहिणीचा हट्टही चाललाच होता. पण ….

… पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात दडलेली एक शंका मात्र सारखी मला खुणावत होती …. म्हणजे …. कसं सांगावं … मी ही नोकरी मिळवली होती.. का या नोकरीने मला मिळवलं होतं … एक नवा ‘बकरा’ म्हणून..????

– हिंदी कथा : नौकरी.

चारही हिंदी कथांचे मूळ कथाकार : श्री. सुशांत सुप्रिय, इंदिरापुरम्

मराठी अनुवाद : सुश्री  मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments