सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

? जीवनरंग ?

☆ निरोप… भाग २ ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे

(कान्हाचे काळीज तीळतीळ तुटत होते.. हीच आपली नियती होती हे कान्हाला माहित होतं… पण भावना उचंबळून येत होत्या.

निरोपाची तयारी झाली. फुलांनी सजवलेल्या दोन डोल्या तयार झाल्या होत्या. मैय्या आणि राधेचा शेवटचा प्रवास सुरु झाला होता.) इथून पुढे —- 

कान्हा यमुनेकडे या दोघींना घेऊन निघाला होता. शेवटचा निरोप देण्यासाठी…

कान्हाच्या हृदयात मात्र कालवाकालव होत होती. यमुनेच्या काठावर दोन चिता रचल्या होत्या.

आधी मैय्याला चितेवर ठेवलं, श्रीकृष्णांने मैय्या च्या मुखात थरथरत्या हाताने तुलसीपत्र ठेवले.

शेवटचं चंदनी लाकूड मैय्याच्या चेहऱ्यावर ठेवले.

अन्

चितेभोवती प्रदक्षिणा घालायला सुरवात केली. नंदबाबा आपल्या कान्हाला असं विवश पाहून दुःखी झाले होते… त्यांना कान्हाची सतत आठवण काढणारी, त्याच्याच आठवणींत जगणारी कान्हाची मैय्या आठवत होती.

कान्हा आपला मुलगा नाही असं कळल्यावर कान्हाला घट्ट मिठी मारुन 

पदराआड दडवू पहाणारी, जन्मभर कान्हाचीच आई म्हणून जगलेली भाबडी मैय्या होती ती… तिची प्रतिक्षा संपली होती. आज कान्हा माझ्याजवळ आहे या समाधानात ती गेली होती.

नंदबाबांनी मनोमन या मातेला वंदनच केलं.

कान्हाने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मैय्याच्या अग्नि दिला. कापूर, चंदनाच्या 

मध्ये मैय्याचा अशक्त देह अग्निला स्वाहा झाला.

कान्हा हात जोडून एकटक त्या जळणा-या चितेकडे पहात होते.

…………

सुन्न उभ्या राहिलेल्या कान्हाच्या खांद्याला अनय.. राधेच्या पतीने हलकासा स्पर्श केला.

अन भरल्या गळ्याने म्हणाला,

“यशोदानंदन, राधेला निरोप देऊया ना..! “

श्रीकृष्ण राधेच्या चितेजवळ उभे राहिले. जस समजायला लागलं तशी राधा त्यांच्याबरोबर होती. राधा कान्हापेक्षा मोठी होती सतत त्याला सांभाळून घेत राहिली. जिवापाड जीव टाकत राहिली.

त्या बांसरीच्या सुरांना सूर.. संगीत देत राहिली..

चितेवर सोळा शृंगारात पहुडलेल्या त्या राधेला पहाताना तिच्या लग्नात पूर्ण शृंगार केलेली दहा वर्षांची राधा आठवली.. तिच्या डोलीमागे रडतरडत धावणारा पांच वर्षांचा कान्हा…!

‘अरे दूर कुठे गेलीय राधुली, इथेच तर दोन घर सोडून अनयाघरी तर आहे. रोज खेळशील तिच्याशी तू.. ‘

अस कान्हाला यशोदेनं समजावलं होतं…

“अनयदा, आपण देताय ना राधेला निरोप..! “

अस अनयला सांगताना तो शामसावळा गदगदला होता, मनात हुंकार येत होते. राधेला निरोप देण शक्य आहे का मला? माझ्या रोमारोमात ती आहे, माझ्या अंतरंगात ती आहे… असेल जोपर्यंत चंद्रसुर्य आहेत तोपर्यंत हे राधाकृष्णाचे नातं अमर आहे..

“नाही यशोदानंदन, राधेचा लौकीकअर्थाने मी पती असलो तरी तिची शेवटची पाठवणी करायचा हक्क फक्त तुमचाच..! “

कान्हा पुढे झाला, अन् शांत मनाने राधेला अग्नि दिला….

कंदबाला टेकून उभा राहिला या दोन्ही चितेकडे पहात… त्याबरोबरच आपला इथला कार्यभाग संपला हीही जाणिव घेत… गोकुळाला… आणि आपल्या सरलेल्या बालपणाला निरोप देत राहिला… रिक्त रिक्त झालेला…

कान्हा नंदबाबांना आग्रहाने बरोबर घेऊन द्वारकेला निघाला.

द्वारकाधीश पुन्हा राजधानीत प्रवेश करते झाले. रुक्मिणी, सत्यभामा सामो-या आल्या. रुक्मिणीने नंदबाबांना मोठ्या मायेनं त्यांच्यासाठी तयार केलेल्या महालात पोहचवलं…!

द्वारकाधीश पुन्हा राज्यकारभारात रमले. पण रुक्मिणीला वाटत होतं, मैय्या आणि राधेला निरोप देऊन आल्यापासून खूप अबोल आणि शांत झालेत….

सतत विचारमग्न असणारे द्वारकाधीश 

राज्यकारभार करत होते… पण..

…………………

द्वारकाधीशांनी अश्वमेघ यज्ञ केला. अर्जुन तिकडे इंद्रप्रस्थात थुधिष्ठराच्या आज्ञेने राज्यकारभार पहात होता.

द्रौपदी सारे पुत्र अश्वत्थामाने मारल्याने विरक्त झाली होती.

परीक्षितांला मोठ आणि युध्दनिपुण करणं हेच सुभद्रा आणि पार्थाचे आता एकमेव ध्येय होते…

रुक्मिणी, सत्यभामा कृष्णपुत्र सांब, अनिरुध्द आणि इतरांच्या बाललीलात मग्न होत्या.

महाराज उग्रसेन वयस्कर झाले असले तरी या परंतवंडाकडे त्याचं लक्ष होतच.

महर्षी दुर्वास, विश्वामित्र, नारद, वशिष्ठ यांना कांही औपचारिक बैठकीसाठी द्वारकाधीशांनी आमंत्रित केले होते. राजधानी लगतच्या वनबागेत त्यांचा निवास होता. बैठक संपल्यानंतर महर्षी दुर्वास आपल्या कुटीत विश्राम घेण्यास गेले.

इकडे कृष्णपुत्र सांब आणि त्याचे मित्रांना दुर्वासऋषींची चेष्टा करायची लहर आली. सांबाने साडी नेसली, गर्भवती असल्याचा भास करण्यासाठी छोट्याशा मुसळाला कपडे गुंडाळून ते पोटाला बांधले.

“ऋषिवर, ही द्वारकाधीशांची स्नुषा आहे. आपण ह्यांना पुत्र होईल की पुत्री हे सांगाल का? “

अस सांबाच्या मित्रमंडळीनी मुद्दामच दुर्वासांना विचारलं.

महर्षी दुर्वास म्हणजे शिघ्रकोपी..!!

त्यांनी सांबच्या देहयष्टी आणि देहबोलीवरुन ओळखले हा कोणीतरी पुरुष आहे. त्यांना या तुच्छ चेष्टेचा अतिशय संताप आला…

“मुर्खा, तू जे हे पोटाला बांधलयस ना याच्यामुळेच तुझ्या पूर्ण कुळाचा नाश होईल… “

सांब घाबरला त्याने ‘मी कृष्णपुत्र आहे, मला क्षमा करा अशी याचना केली.. आजोबा उग्रसेनना सारं सांगितले, त्यांनीही क्षमा मागितली.

दुर्वास म्हणाले, “क्षत्रिय पराक्रमी, श्रेष्ठ पित्याच्या पोटी जन्म घेऊन तू अशी हीन बुध्दी कशी घेऊन आलास, अनिरुध्दाचा परिवार वाचेल कदाचित…! “

द्वारकाधीशांच्या कानांवर हे सारं गेलं, त्यांना गांधारीचा तळतळाट आठवला. कांहीच चूक नसताना सत्याचा पाठीराखा म्हणून “तू कौरव वंश संपवलास तसाच तुझा यादववंश संपेल..! ” असं गांधारीदेवी म्हणाल्या होत्या…

महायुध्द संपून पस्तीस वर्ष झाली होती. द्वारकाधीश आता वयोवृध्द दिसत होते. रुक्मिणीनेही या इहलोकाचा निरोप घेतला होता.

ज्या काळ्याभोर कुरळ्या केसांच्या महिरपीने द्वारकाधीश मोहकच दिसत ते आता रुपेरी झाले होते…

आता त्रेतायुग संपणार होते… अन कलियुग लागणार होते… हे घडणार अटळ आहे. हे त्यांनाही माहित होतेच.

राज्यात विचित्र घटना घडू लागल्या… द्वारकाधीशांच्या महालातून सुदर्शन चक्र, द्वारकाधीशांची गदा अचानक नाहिशी झाली…

बलरामदादांचा नांगरही नाहिसा झाला.

सांब आणि दुसऱ्यां भावंडामध्ये अगदी क्षुल्लक कारणावरुन भांडणे झाली… अन् त्याचं रुपांतर मोठ्या घटनेत झालं. सांब मारला गेला…

द्वारका नदीकाठी चितांची रांग लागली…

द्वारकेवर म्लेंछ आणि डाकूंचा हल्ला झाला होता. द्वारकाधीशांनी अर्जुनाला मदतीला ये असा निरोप धाडला…

विषण्ण मनाने द्वारकाधीश वनात ध्यानधारणा करण्यास गेले… कंदबाला टेकून पाय लांब करुन शांत मुद्रेत बसले होते.

“कान्हा, आलास? मी कित्ती वाट पाहिली… पुरी पस्तीस वर्ष झाली रे मी वाट पहातेय… त्या शेवटी ऐकलेल्या बांसरीचे सूर ऐकतेय अजूनही….!

बघ तुला ऐकू येतय का? “

राधा शेजारीच बसून विचारत होती… कान्हाने तिचा हात हाती घेतला, अन् तेवढ्यात जिरु नांवाच्या शिका-याचा बाण सूं,. सूं करत 

कान्हाच्या तळपायात घुसला…

कान्हा जोरात ओरडले,

मैय्या,….. अन त्यांचे सावळेमुख लालभडक झाले… वेदना सहन करण्यासाठी त्यांनी राधेचा हात धरायचा प्रयत्न केला…. तर…

राधा सावकाश उठून द्वारका नदीच्या दिशेने जात होती…

“राधे राधे थांब… “अस कान्हा जिवांच्या आकांताने ओरडले… पण राधा क्षणार्धात त्या द्वारकेच्या पाण्यात नाहीशी झाली…

द्वारकाधीशांचे हळूहळू डोळे मिटू लागले. पृथ्वीला हात लावून आपल्या त्यांनी वंदन केलं… अन शांतपणे डोळे मिटले…. सत्य, प्रेम, करुणा यांनी पृथ्वीचा निरोप घेतला…!

……….

अर्जुन द्वारकेत आल्या आल्या श्रीकृष्णांनी इहलोकाचा निरोप घेतल्याची बातमी पार्थाला कळली…!

पार्थच्या दुःखाला पारावर राहिला नाही. बलराम आणि रेवती यांनी स्वतःला द्वारकेच्या स्वाधीन केले.

अर्जुनाने आपल्या जिवलगाचे पार्थिव द्वारकेच्या काठावर आणले.

डोळे शांत मिटलेले.. अर्जुनाला वाटले आता श्रीकृष्ण उठेल अन् म्हणेल,

“पार्था, असा पायाशी का बसलायस? बोल तुला काय मदत हवीय… चल मी येतो तुझ्याबरोबर..! “

ते रुपेरी कुरळे कुंतल, भव्य भालप्रदेश, धारदार नाक, पातळ गुलाबी जिवणी… पार्थाला कान्हाच्या चेहऱ्यावरुन नजर हटवावीशी वाटतं नव्हती… त्याच ते मनमोहक हसू… डाव्या गालावरील लाडिक खळी,

कान्हा विचारमग्न असला की माथ्यावर किंचितशी उभी आठी पडे,

द्रौपदीला शांत करण्याचं सामर्थ्य असलेला तिचा सखा..

युध्दात कर्तव्यकठोरपणे निर्णय घेणारा, द्रौपदीचे सारे पुत्र रात्री झोपेत अश्वत्थामाने मारल्यावर दुःखाने विव्हल होऊन पार्थ, द्रौपदीला पोटाशी घेणारा कान्हा…!

चितेवर श्रीकृष्णांचे पार्थिव ठेवताना अनिरुध्द आणि अर्जुन यांना गदगदून आलं… जड अंतःकरणाने त्या द्वारकाधीशाला निरोप दिला.

अर्जुनाने सत्यभामा, अनिरुध्द त्याची पत्नी उषा इतर सर्वांनाच तयार केले. सारे द्वारकेला निरोप देऊन तयार झाले… सारी द्वारका रिक्त झाली होती… इकडे द्वारका नदी उसळ्या मारु लागली होती.

अर्जुन हजारो लोकांना घेऊन आपली राजधानी इंद्रप्रस्थाकडे प्रयाण करता झाला…

अर्जुन इंद्रप्रस्थात पोहचला… राणीवश्यात श्रीकृष्ण प्रयाणाची बातमी कळली.. तिथे आक्रोश उठला…!!!

इकडे द्वारका फारच खवळली होती. समुद्र जणू द्वारकेला भेटायला आला… अन् पूर्ण द्वारकानगरी पाण्यात बुडाली… जणू तिला द्वारकाधीशांच्या शिवाय रहायचं नव्हतं चं…

आश्चर्य म्हणजे द्वारकाधीशांचा राजप्रासाद मात्र सुरक्षित होता… तिथे पाणी गेलं नव्हतं…

पराक्रमी, न्यायी, प्रेम, करुणा असलेल्या कान्हाचा वियोग आजही त्या राजप्रासादाला जाणवतं असेल का…???

– समाप्त –

(एखाद्या कथेवरून बोध घेऊन आपला दृष्टिकोन बदलून जातो किंवा आपले विचार बदलतात, सकारात्मक होतात.) 

© सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

कोल्हापूर

मो 8888033332

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments