श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ नाण्याची दुसरी बाजू… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(“सासूबाईंच्या नांवाने बॅंकेत कसलेच डिपॉझिट नाहीये तर त्यांच्या नावाने त्या स्वत: एक रिकरिंग खाते उघडायचे म्हणत होत्या आणि त्यासाठी कुठली स्कीम चांगली आहे, हे त्या मला विचारत होत्या.”) इथून पुढे – –
राघवसाठी हे सगळं नवीनच होतं. “मग तू काय सांगितलंस?” राघवनं अधीरतेनं विचारलं.
“पाच वर्षासाठी खाते उघडा. त्यात व्याजही जास्त मिळेल, असं मी सरळपणे सांगताच नम्रता वन्संनी लगेच फोन कट करून टाकला. तुम्ही कशाला त्यांचं रिकरिंग खाते उघडताय, आम्हीच सुरू करू की असं मी म्हणावं अशी त्यांची अपेक्षा असणार. आपणही शेवटी नोकरदारच. घराचे हप्ते, फर्निचर लोनचे, कार लोनचे हप्ते, कुकचा पगार, मोलकरणींचा पगार, फ्लॅटसचे जबरदस्त मेन्टेनन्स, असे एक ना अनेक खर्च आहेत. झालंच तर वर्षातून एखादी दुसरी लांबची सहल आणि लग्नमुंजीसाठी प्रवास असतोच.
आपण सगळ्याच सहलींना आईबाबांना घेऊन जातोच. त्यांना केरळला जायचं होतं. वर्षाखेरमुळे आपल्याला सुटी मिळत नव्हती तेव्हा ट्रॅव्हल कंपनीतर्फे तुम्ही त्यांना पाठवलं होतं. आपण दोघंही त्यांचा प्रत्येक शब्द झेलत असतो. त्यांचं औषधपाणी आणि अथर्वच्या पुढच्या शिक्षणाची चिंता डोक्यावर आहेच. बाबांना किती पेन्शन मिळते हे आपण कधी विचारलं नाही.
आता सासूबाईंच्या नावाने डिपॉझिट कशाला हवे आहे? थोडक्यात काय, अजूनही त्या दोघांना आपल्याकडे असुरक्षित वाटतं. हेच माझ्या मनाला खूप लागलं. जाऊ दे कुणाला काय वाटायचं ते वाटो. म्हणतात ना, अपेक्षांचं शेपूट कधी संपतच नाही म्हणून. दिवसागणिक अपेक्षा वाढतच जातात. ” बोलता बोलता जानकीनं वळून पाहिलं, राघव कधीच झोपेच्या आधीन झाला होता.
दुसऱ्याच दिवशी राघवनं बाबांचे मित्र विष्णु प्रभाकर यांना भेटायचं ठरवलं. फोन करून संध्याकाळी राघव आणि जानकी त्यांच्या घरी पोहोचले. सुदैवाने त्यावेळी ते एकटेच होते. राघवने आपल्या घरी झालेल्या पार्टीनंतर उमटलेले पडसाद ह्यासंबंधी त्यांना थोडक्यात सांगितलं. मग राघवच पुढे म्हणाला, “काका, तुम्हाला एक सांगू? कडक सोवळं ओवळं असणाऱ्या माझ्या आजीला मांसाहार केलेलं अजिबात खपायचं नाही. ‘काय शिजवायचं, खायचं असेल तर ते बाहेरच्या बाहेर करून खा, ’ असं म्हणायची. घरांत काहीच चालायचं नाही. तिने ती भांडी देखील मागच्या पडवीत ठेवून दिली होती. त्यावेळी मी बाबांना कधी रागावल्याचं पाहिलं नाही. कारण ते माझ्या आजीच्या साधनशुचितेचा, भावनेचा मान राखत होते. तसंच त्यांनी आता स्वत:च्या सुनेच्या भावनेचाही विचार करायला काय हरकत होती?”
विष्णु प्रभाकर लक्षपूर्वक ऐकत होते.
“काका, मला अजूनही आठवतं. मी त्यावेळी नऊ दहा वर्षाचा असेन. एक चित्र रंगवायचं होतं. चित्रातले रंग बदलताना ब्रशला असलेला आधीचा रंग दुसऱ्या रंगात बुडवायच्या अगोदर ब्रश स्वच्छ करावा लागतो. स्वयंपाकघरातली वाटी कशाला घ्या म्हणून बाबा दाढी करताना वापरायचे ती वाटी घेतली. चित्र रंगवून झाल्यावर ती वाटी स्वच्छ धुवून ठेवणार होतो. बाबांनी ते पाहिलं. ती वाटी कशाला घेतलीस म्हणून त्यांनी माझ्या गालावर मारलेली थप्पड मी अजूनही विसरलेलो नाही. दाढीच्या पाण्यासाठी असलेली वापरलेली वाटी अधून मधून ब्रश साफ करण्यासाठी वापरली तर म्हणून त्यांना एवढा राग आला होता, मग मांसाहार करण्यासाठी वापरलेली प्लेट जानकीने बदलली असेल तर तिने अशी काय मोठी चूक केली होती सांगा. ”
“होय, राघवा सदाशिवाचं चुकलंच. ” विष्णु प्रभाकर म्हणाले.
“काका, कोण चूक, कोण बरोबर आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. वरिष्ठांनी तरूणांच्या भावना समजून घ्याव्यात एवढंच मला वाटतं. लहानसहान गोष्टीवरून दर दोन तीन महिन्यांनी ‘आम्हाला इथं राहायचं नाही. आम्ही गावी परत निघालो’ असे ‘मानापमान’ नाटकाचे प्रयोग चालू असतात ना ते थांबवावेत. आम्ही दोघेही नोकरी करतो. शाळेतून आल्यावर अथर्वला कोण सांभाळणार, अशी आम्हाला सतत धास्ती वाटत राहते. मला आजीआजोबांच्या सहवासाचे सुख फार काळ मिळालं नाही. निदान माझ्या मुलाला तरी त्या प्रेमापासून कशाला वंचित करा म्हणून आम्ही त्यांची मनधरणी करत असतो. दुसऱ्या अपत्याचा विचार तर आम्ही कधीच सोडून दिला आहे. असो. ”
विष्णु प्रभाकर यांनी राघवचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, “राघवा, एक गोष्ट लक्षात घे. आजवर कार्यालयात वर्चस्व गाजवायची सवय असलेल्या ह्या निवृत्त मंडळींची स्थिती हवा गेलेल्या फुग्यांच्यासारखी असते. ही मंडळी आपल्या अहंकाराचा फुगा फुगवण्यासाठी घरच्या मंडळींवर डाफरायला लागतात. त्या अहंकाराला प्रतिरोध झाला की ते आक्रस्ताळेपणा करतात. मी पाहिलं आहे, बहुतेक वृद्ध मंडळी चिमूटभर दु:खाला कुरवाळत बसतात. किरकोळ अशा जखमांना स्वत:च्या नखांनी ओरबाडून घेतात आणि त्याच जखमा दाखवत सगळ्यांच्याकडून सहानुभूतिच्या मलमपट्ट्या मागत हिंडत असतात. राघवा, माझ्यावर विश्वास ठेव.
तसं पाहायला गेलो तर, ह्या परक्या राज्यात आम्ही सुदैवाने एकत्र आलो आहोत. तुझ्या बाबांनी ही घटना सांगणे तर लांबच. त्यांनी आजवर तुमच्याविषयी तक्रारीचा चकार शब्दही काढला नाही. आम्हाला सदानकदा त्यांच्याकडून तुम्हा दोघांचं कौतुकच ऐकायची सवय झालीय. खरं सांगू, सदाशिवरावांना असा मुलगा आणि सून लाभली ह्याचा इतरांना हेवा वाटत असतो. ”
राघव नम्रपणे म्हणाला, “काका, बाहेरच्या लोकांत आमच्यावर कौतुकाची फुलं उधळण्यापेक्षा त्या फुलांतली एखादी पाकळी जरी बाबांच्याकडून आमच्या वाट्याला आली असती तरी आम्ही कृतार्थ झालो असतो. काका, ह्या तक्रारी करणाऱ्या वृद्धांनी एकदा ज्यांची मुलं परदेशात कायमची स्थायिक झाली आहेत अशा वृद्धांचे केविलवाणे चेहरे पाहावेत. कित्येक उच्चभ्रू मुलांच्या आपल्या चौकोनी कुटुंबात आई वडिलांना जागा नसते. हे आजूबाजूला असलेले विदारक सत्य पाहिले म्हणजे आपण स्वत: किती सुखी आहोत हे तुम्हा लोकांना कळेल. वृद्धांनी हट्ट सोडून थोडी तडजोडही स्वीकारावी.
दूर असलेल्या लेकीला जसा जीव लावता तसाच थोडा जीव सदैव सोबत राहणाऱ्या आपल्या सुनेवरही लावा. तिलाही थोडे प्रेमाने वागवा म्हणावं. मग बघा सगळ्याच घरातले निम्मे प्रश्न आपोआपच सुटतील.
काका, सगळीच मुलं नतद्रष्ट नसतात हो. त्यात एखादा श्रावणबाळ देखील असतो. खरं तर अनुभवातून तुम्हाला माणसं कळतात. मग तुम्हाला तुमची मुलंच कळत नाहीत, असं कसं म्हणता येईल? काका राग मानू नका. सगळेच लेखक आम्हा मुलांना नतद्रष्ट ठरवत, वृद्धांच्या व्यथांना आपल्या कथालेखनात गडदपणे रंगवून वाहवाही मिळवतात. काका, तुम्ही माझ्या बाबांच्या जागी आहात. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, मनात होतं ते बोलून गेलो. तुम्ही लेखक आहात, माझी तुम्हाला एक विनंती आहे. ही नाण्याची दुसरी बाजू मांडत तुम्ही एखादी कथा जरूर लिहा. माझ्या बाबांच्या वयाची वयोवृद्ध मंडळी तुमच्या लिखाणाने निदान विचारप्रवृत्त तरी होतील. येतो आम्ही. ” उभयतांनी निरोप घेतला.
काय जादू झाली कुणास ठाऊक, राघवने बेल वाजवताच दार उघडायला बाबा चक्क हसतमुखाने सामोरे आले. आज अथर्व आजीजवळ बसून चक्क गृहपाठ करत होता. असं वाटत होतं, जणू आकाश पूर्ण चांदण्यांनी भरून गेले होते !
– समाप्त –
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




