श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ कीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
एका रविवारी मी निवांतपणे पेपर वाचत असतांना सुरेखा बाहेर येऊन मला म्हणाली
” अहो ती आपली कौस्तुभची सायकल ठेवायची आहे की विकून टाकायची? “
” का? अचानक असं का विचारतेय? ”
” अहो काही नाही पुष्पा विचारतेय की तुम्ही वापरत नसाल तर मला देता का म्हणून? “
मी विचारात पडलो. कौस्तुभ नोकरीसाठी लंडनला गेल्यापासून ती सायकल खरंतर धुळ खातच पडली होती. पण तिला घेऊन अजून एक वर्षही झालं नव्हतं. कौस्तुभ इथं असतांना त्यानं फार तर तीन महिने ती वापरली असेल. अर्थातच अजून ती नवीकोरीच वाटत होती. त्यामुळे मला ती विकाविशी वाटेना.
” राहू दे अजून. मी वापरेन तिला ”
” तुम्ही? घरात दोन बाईक आणि एक कार असतांना तुम्ही सायकल वापरणार? ”
” अगं नेहमीकरिता नाही. अधूनमधून जेव्हा वाटेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वापरत जाईन. असंही डाॅक्टरने मला सायकल वापरायला सांगितलंय ”
” मग तिला काय नाही सांगू? “
” सध्या तरी नाही सांग. कधी वाटलंच विकाविशी तर तसं सांगू तिला ”
” बरं. सांगते ”
ही पुष्पा आमच्याकडे सात वर्षांपासून धुण्याभांड्यांचं काम करत होती. सांगितल्याशिवाय ती कधी खाडे करायची नाही. त्यातून कधी जास्तीचे पाहूणे आले तरी जास्त काम पुरतं म्हणून कटकटही करायची नाही त्यामुळे सुरेखा तिच्यावर खुश होती. दिवाळी आली की बोनस म्हणून एक महिन्याचा पगार, साडी, फराळाचे पदार्थ वरुन चहा अशी तिची सरबराई केली जायची. केवळ दिवाळीच नाही तर इतरही वेळेस सुरेखा तिला प्रेमाने जेवू घालायची. मैत्रिणी किंवा शेजारच्या बायका जमल्या की हमखास घरात काम करणाऱ्या बाईचा विषय निघायचा. अशावेळी सुरेखा तोंड भरभरून पुष्पाची स्तुती करायची.
काही कामानिमित्त मी घराबाहेर पडलो तेव्हा पोर्चमध्ये भिंतीला टेकून उभी असलेली सायकल मला दिसली. नऊ हजाराची ती गिअरची सायकल चांगली देखणी होती. कौस्तुभला फिटनेसची आवड असल्यामुळे तो कायम सायकल चालवायचा. जुनी सायकल त्रास देऊ लागली तशी त्यानं जुनी सायकल भंगारमध्ये विकून ही घेतली होती. कौस्तुभसोबत त्याच्या दोन मित्रांनीही अगदी अशीच ह्याच रंगाची सायकल घेतल्यामुळे तिघांनीही आपली सायकल ओळखू यावी यासाठी त्यावर स्वतःच्या नावाचे स्टिकर लावले होते. कौस्तुभनंही K. P. अर्थात कौस्तुभ पालवे असं स्टिकर सायकलच्या मागेपुढे लावलं होतं. या के. पी. वरुन त्याचे मित्र त्याला गमतीनं खुद पसंद म्हणायचे. मात्र कौस्तुभ एकदम मनमिळावू स्वभावाचा सदैव हसतमुख रहाणारा मुलगा होता. ही सायकल पाहिली की मला कौस्तुभची तिव्रतेने आठवण यायची. त्यानं लंडन सोडून ताबडतोब इथं निघून यावं असं वाटू लागायचं. अर्थात तो जेव्हा लंडनला जायला निघाला तेव्हा मलाच आनंदासोबत त्याचा खुप अभिमान वाटला होता.
१५-२० दिवस उलटल्यानंतर परत एकदा सुरेखानं सायकलचा विषय काढला. या दिवसात मी एकदाही सायकल वापरली नव्हती. खरंतर सकाळी ऑफिसला जातांना घाई असायची म्हणून आणि परतल्यावर थकून गेल्यामुळे माझी सायकल वापरायची इच्छाच व्हायची नाही. अशीही गेल्या २०-२५वर्षांपासून मी सायकलच चालवली नव्हती. अर्थातच सायकल चालवण्याचा मुहूर्त काही निघत नव्हता. सुरेखानं विचारल्यावर मी अजून एखादा महिना गेल्यावर सायकलचा विचार करु असं तिला सांगितलं. सकाळचा माॅर्निंग वाॅक सोडून सायकल चालवावी या विचाराने एक दिवस मी निघालो. सायकल छानपैकी पुसून घेतली. पण खाली पाहतो तर सायकलचं पुढचं चाक बसलेलं. त्यातली हवा कमी झाली की ते पंक्चर झालंय हे कळायला मार्ग नव्हता. एवढ्या सकाळी पंक्चरची दुकानं उघडत नसल्याने मी सायकल पोर्चमध्येच ठेवून वाॅकला गेलो. त्या रविवारी बाहेरगावी जावं लागल्याने सायकल रिपेअर होऊ शकली नाही. एके दिवशी संध्याकाळी जेवायला बसलो असतांना सुरेखानं परत विषय काढला.
” का हो दिड महिना उलटून गेला तुम्ही सायकलला हात लावलेला नाही. मला नाही वाटत तुम्ही कधी सायकल चालवाल. मग उगीच कशाला त्या बिचाऱ्या पुष्पाला ताटकळत ठेवताय. देऊन टाका ना तिला. तिच्या मुलाला काॅलेजला जायला हवीये. बिचाऱ्याला इतक्या दूर पायी जावं लागतंय असं सांगत होती ”
मी विचारात पडलो. सुरेखाचं म्हणणं योग्यच होतं. एकतर गेल्या अनेक वर्षांपासून मी सायकल चालवलेली नव्हती. दुसरं ती चालवण्यात मला इंटरेस्टच नव्हता. पडूनपडून खराब होण्यापेक्षा ती विकून टाकलेली बरी असा मी निर्णय घेतला.
” ठिक आहे. सांगून दे तिला सात हजार देऊन घेऊन जा म्हणून “
” सात हजार? ती गरीब बाई काय देईल सात हजार “
” अगं सायकल एकदम नवीन आहे. कौस्तुभनं ती जास्तीत जास्त तीन महिने वापरली असेल. आताशी ८-९ महिने झालेत तिला घेऊन. नऊ हजाराची घेतली होती आपण. सात हजार तर मिळायलाच पाहिजे तिचे. तू तिला सांगून तर बघ. नाही म्हंटली तर सहा हजारात देऊन टाकू “
” बरं सांगून पहाते “
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर मी तिला पुष्पा काय म्हणाली ते विचारलं
” ती नाही म्हणतेय “
” मग किती देणार म्हणतेय ती? “
” ती म्हणते अशीच पैसे न घेता देऊन टाका. गरीबाला दान केलं तर काय बिघडतं? असंही म्हणे तुम्हांला काय कमी आहे? बंगला आहे, दोन फटफट्या आहे, एक चारचाकी आहे. साहेबांना दोन लाख रुपये पगार आहे. सहासात हजारांनी तुम्हांला काय फरक पडणार आहे? असं म्हणत होती “
” वा गं! भलतीच शहाणी दिसतेय तुझी पुष्पा. आणि मला दोन लाख रुपये पगार आहे असं तिला कुणी सांगितलं? “
” मी एकदा तिला म्हणाले होते. तरी तिला कमीच सांगितला. तीन लाख नाही सांगितला “
” तरीच ती इतकी वटवट करतेय. अजिबात फुकट नाही द्यायची सायकल. आपली काय दोन नंबरची कमाई आहे? आम्हीही खुप गरीबी पाहिलीये. उपाशी
पोटी दिवस काढलेत. दहा वर्षाचा होतो तेव्हापासून कष्टाची कामं करतोय. पण कधी कुणाकडे हात पसरले नाहीत की कुणाला असं तिच्यासारखं काही फुकट मागितलं नाही. स्वाभिमानाने जगलो आणि कष्ट करुन इतक्या वर पोहचलोय. पैशांची किंमत आहे म्हंटलं अजून आम्हांला. आपण विकत घ्यायचं आणि ह्यांना फुकट द्यायचं ही कोणती पद्धत? ”
मी चिडून म्हणालो तशी सुरेखा वरमली. मुकाट्यानं आपली काम करत राहिली. मीच शांत होऊन म्हणालो.
” तिला म्हणा. तुझ्यासाठी दोन हजार अजून कमी करतो. पाच हजारात घेऊन जा सायकल ”
सुरेखा काहीच बोलली नाही. माझा निर्णय तिला आवडलेला दिसला नाही पण मी त्यावर ठाम होतो.
त्या रविवारी मी पंक्चरच्या दुकानात जाऊन सायकलमध्ये हवा भरली. तिला ऑईलिंग, ग्रिसिंग करुन चकाचक केली. थोडी चालवूनही पाहिली. मस्त चालत होती. पण तेवढ्या चालवण्यानेही माझा श्वास चांगलाच फुलला. पोटऱ्यात पेटके आले. आपल्याकडून आता सायकल चालवणं होणार नाही या निष्कर्षाप्रत मी आलो. पंक्चरवाल्याला सायकल विक्रीबद्दल विचारलं तर तो म्हणाला
” साहेब सध्या फक्त ज्यांना ढेऱ्या कमी करायच्या असतात ते किंवा जे शौकीन आहे तेच सायकल विकत घेतात. तरी पण मी विचारुन बघतो. कितीपर्यंत द्याल? “
” नऊ हजाराची सायकल आहे. पाच हजारात देऊन टाकू “
तो हसला
” पाच हजारात कुणी घेणार नाही साहेब. दोन हजारांपर्यंत जाईल “
” अरे फक्त आठनऊ महिने झालेत घेऊन. कमीत कमी चार हजार तरी आले पाहिजे ना. तू तर बघतोच आहेस की सायकल अगदी नवीन आहे ”
” बरं बघतो ” म्हणून तो बाईकचं पंक्चर जोडू लागला.
मी घरी आलो तर सुरेखा म्हणाली
” ती पुष्पा तुमच्याशी बोलायचं म्हणतेय ”
” बरं पाठव “
” पण तिच्याशी चिडून बोलू नका. नाहितर काम सोडून जायची ती. तुम्हांला काय माहित नवीन बाई मिळवायला आम्हांला किती त्रास होतो ते ”
आजकाल या बायकांनी या कामवाल्यांना फारच शेफारुन ठेवलंय. कामवाली काम सोडून जाईल या भितीने त्या सदोदित त्यांची वरवर करत असतात.
” ठिक आहे. पाठव तर खरं तिला ”
पुष्पा समोरच्या दारातून आली
” नमस्कार साहेब. साहेब ती सायकल देऊन टाका ना. पोराले कालीजात जायला लई तरास होतोय बगा ”
” मी कुठे नाही म्हणतोय. पाच हजार दे आणि घेऊन जा सायकल ”
ती ओशाळवाणं हसून म्हणाली
” साहेब आम्ही गरिब माणसं. कुठून आणणार एवढे पैशे. मावशींना तर माहितेय आमचा घरचा माणूस धड कामधंदा करत नाही. वाटलं तर घेऊन जातो रिक्षा नाहीतर पत्ते खेळत बसतो. नाहितर दारु पिऊन तमाशे करतो. मीच चारपाच घरची धुणीभांडी करुन संसार चालवते ”
तिनं बोलताबोलता पदर डोळ्यांना लावला.
– क्रमशः भाग पहिला
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




