श्री सुहास रघुनाथ पंडित
जीवनरंग
☆ “दयासागर” – भाग – २ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(“त्याचं काय आहे साहेब, करायचं म्हटल्यावर काही अवघड नाही. माझ्या घराजवळची मोकळी जागा तुम्ही पाहिलीत ना? आमचीच आहे ती. तिथेच तर करायचं सगळं. प्रश्न आहे तो फक्त पैशाचाच. बघू केव्हा जमेल तेव्हा. ठीक आहे, येतो मी. ” – इथून पुढे – –
जॉन निघून गेला. पण त्यानं रंगवलेलं स्वप्न विवेकच्या डोक्यातून जात नव्हतं. किती सुंदर स्वप्न होतं ते. स्वतः कमी शिकलेलो आहोत म्हणून ती वेळ दुसऱ्यावर येऊ नये ही जॉनची इच्छा. त्याला अशिक्षित तरी कसं म्हणायचं? पण पैसा कसा उभारायचा? सारेजण मदत करायला तयार होतील का? निदान आपण तरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. नाही तरी आपलं असं कोण आहे या जगात? आपल्या मायदेशी आपली आई आणि आपण स्वतः. इथं मिळणारा पगार आपल्यापुरता अगदी भरपूर आहे. नाही तरी आपण इथं कोणत्या उद्देशाने आलो आहोत? केवळ पैसा मिळवायचा म्हणून तर नाहीच नाही. उलट आपल्या व्यवसायातून आपल्या देशाची, धर्माची, संस्कृतीची ओळख सर्वांना करून द्यावी हा हेतू नव्हता का आपल्या मनात? मग आता आलेली ही संधी का सोडायची? इथल्या दोन-तीन वर्षांच्या वास्तव्यात बरंच काही करता येईल.
आपला हा विचार त्यानं जॉनला बोलून दाखवला. क्षणभर काय करावे तेच जॉनला समजेना. विवेकनेही नुसते बोलून न थांबता प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी म्हणून त्याचं दिवशी त्याला काही रक्कम देऊ केली.
“साहेब, शुभ कार्याचा संकल्प आपण सोडलेला आहे. तुमच्या पद्धतीप्रमाणे आणि आमच्या पद्धतीप्रमाणे ही सर्वप्रथम आपण ईश्वराचे स्मरण करूया. मी एक छोटेसे प्रार्थना मंदिर बांधून सुरुवात करतो. त्यात एक छोटीशी मूर्ती असेल येशूची तर दुसरी असेल भगवान श्रीकृष्णाची. “
जॉनने विवेकचा निरोप घेतला. पुढचे आठ दिवस तो दवाखान्यात दिसला नाही. एके दिवशी सकाळी तो विवेकच्या क्वार्टरवर आला. घाईघाईने हातातले कागद टेबलावर पसरले.
“साहेब, हा पहा प्लॅन! हे छोटसं प्रार्थना मंदिर. त्यांच्या पलीकडे शाळेची इमारत. शिवाय या मोकळ्या जागेत बाग करता येईल. “
विवेकने प्लॅन पाहिला.
“जॉन, फार मोठे स्वप्न पाहू नकोस. तुला कोण किती मदत करेल हे सांगणं अवघड आहे. म्हणून आपल्याला झेपेल तेवढेच हाती घे. “
“होय साहेब, हा संपूर्ण प्लॅन आहे. आपण सुरुवातीला फक्त प्रार्थना मंदिरच बांधायचं आहे. “
जॉन रोज येऊ लागला. रोज काही ना काही सांगू लागला. कामाची सुरुवात विवेकच्या हस्ते व्हावी म्हणून त्याने विवेकला विनंती केली. पण कामाच्या व्यापात ते जमले शक्य नसल्यामुळे विवेकने त्याला नकार दिला. जॉन दर चार-आठ दिवसांनी गावाकडे जाऊ लागला. डॉक्टर अय्यर हे सारे पाहत होता. विवेकने जॉनशी एवढी जवळीक करावी हे त्याला पटत नव्हते. त्याने विवेकला तसे सुचवूनही पाहिले. पण विवेकचा जॉनवर विश्वास होता. जॉन आयुष्यात काहीतरी चांगलं करतोय, आपला त्याला हातभार लागतोय याचा त्याला आनंद होता. या प्रार्थना मंदिराच्या रूपाने आपल्या धर्माची, संस्कृतीची ओळख इथल्या लोकांना करून देता येईल म्हणून त्याला मनापासून आनंदाच होत होता. जॉन कडून सतत येणारा वृत्तांत त्याला सुखावत होता. आज काय जागा साफ करून झाली. उद्या काय नको असलेली झाडेझुडपे तोडून झाली. एक ना दोन. कामाची जशी जशी प्रगती झाल्याचे समजत होते तशी तशी विवेक कडून पैशाची मदत ही मिळत होती.
एके दिवशी अवेळी दारावर थाप पडलेली ऐकून विवेकला आश्चर्य वाटले. कोण आलं असेल? त्याने दार उघडले. ड्युटीवरील वॉर्ड बॉय निरोप घेऊन आला होता. विवेकची आई खूप आजारी होती. त्याला ताबडतोब भारतात परतणं जरुरीचं होतं.
विवेकने क्षणभरात सामानाची आवराआवर केली. आता परत यायचे म्हणजे एक महिना तरी सहज लागेल. त्याला एकच काळजी वाटू लागली. जॉनची! एकीकडे कधी एकदा आईला भेटतो असे झालेले, तर दुसरीकडे जॉन आता भेटू शकत नाही म्हणून काळजी. त्याने एका कागदावर त्याच्यासाठी निरोप लिहून ठेवला,
“प्रिय जॉन, मला आईच्या आजारपणामुळे अचानक जावे लागत आहे हे तुला समजले असेलच. मी लवकरात लवकर परत येईन. तू तुझे काम थांबवू नकोस. ते चालूच ठेव. मला काही कारणाने लवकर येणे शक्य झाले नाही तर मी तुला तेथूनच पैसे पाठवीन. तू ही प्रोग्रेस कळवत रहा. माझा पत्ता तुला ऑफिसमध्ये मिळेलच. “— तुझा डॉक्टर विवेक साने
*. *. *. *. *. *. *
विवेक आपल्या घरी परतला. तोपर्यंत त्याच्या आईची तब्येत फारच बिघडली होती. शेजाऱ्यांनी शेजार धर्म पाळला होता. अशक्तपणा बराच वाढला होता. आपला मुलगा आलेला पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. निस्तेज चेहऱ्यावर हास्याची एक लहर उमटली. अशा अवस्थेत दोन दिवस केले आणि तिसऱ्या दिवशी दिवस मावळतानाच तिची प्राणज्योत मालवली.
विवेकचा एकमेव आधार निखळून पडला. एवढ्या मोठ्या जगात आपण अगदी एकटे पडलो आहोत याची त्याला जाणीव झाली. या गावात, या देशात आपल्या मायेचे कोणीही नाही. मग या गावाला आपलं तरी कसं म्हणायचं? आपण कुठेही राहिलो तरी काय फरक पडणार आहे? ‘ अवघे विश्वची माझे घर ‘हेच खरं. आपण हे सर्व सोडून जायचं आणि कायमचं इंग्लंडमध्ये राहूनच आपला सेवाधर्म चालू ठेवायचा त्याने निश्चय केला. हे जुनं घर, फर्निचर सगळ्याची व्यवस्था लावायला हवी. जे काही दोन-चार नातलग आहेत त्यांचा निरोप घ्यायला हवा. दोन-चार महिने सहज लागतील. त्यानं लगेच तसे कळवून टाकलं व तो पुढच्या तयारीला लागला.
घर साफ करता करता त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याच्या आईचे पासबुक त्याला मिळाले. सहज म्हणून त्याने उघडून पाहिले. एक भली मोठी रक्कम पुस्तकात शिल्लक दिसत होती. त्याने गेल्या वर्षभरात जे काही पैसे आईला खर्चासाठी म्हणून पाठवले होते त्यातील अगदी थोडीशी रक्कमच खर्च झाली होती. बाकीचे सारे पैसे जसेच्या तसे आईने शिल्लक ठेवले होते. आईच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले. आपण आईसाठी पैसे पाठवले होते. ते तिथेच झाले. आता ते आपले नाहीत. त्यांन ठरवून टाकलं. पुढच्या दोन दिवसात त्यानं कागदपत्रांची पूर्तता केली. बँकेतून पैसे मिळताचक्षणी सगळ्या रकमेचा ड्राफ्ट जॉनच्या नावानं काढून त्याला पाठवून दिला आणि मगच तो घरी आला. बऱ्याच दिवसानंतर तो समाधानी दिसत होता. आईने साठवलेले पैसे सत्कारणी लागले याचा तो आनंद होता. मधून मधून जॉनची पत्र येत होती. त्यावरून आपण जाईपर्यंत प्रार्थना मंदिर पूर्ण झालेले असेल याची त्याला खात्री वाटत होती.
चार महिने कसे निघून गेले समजले ही नाही. आज शेवटचा दिवस. उद्यापासून या घरावर आपला हक्क नाही. काल मिळालेल्या घराच्या किमतीची रक्कम जॉनला पाठवून, सर्वांचा निरोप घेऊन विवेक घरी परतला. संध्याकाळ केव्हा होते आणि मुंबईला जाणा-या गाडीची वेळ केव्हा होते असं त्याला झालं होतं.
*. *. *. *. *. *
रूमवर डॉक्टर अय्यर त्याची वाट पाहत होताच. विवेकने त्याला सारा वृत्तांत सविस्तर सांगितला. आपण सारं आयुष्य आता इथेच काढणार आणि आपल्या संस्कृतीचा प्रसार करणार हेही सांगितलं. अय्यर अस्वस्थ झाला. त्याला कसं सांगावं हे समजेना. पण केव्हातरी सांगावं लागणारच होतं. विवेकने विषय काढताच तो म्हणाला,
“माय डियर जंटलमन, वी हॅव नॉट सीन मिस्टर जॉन फॉर लास्ट वन मंथ “.
“काय? कामावर आला नाही तो? “
“नाही ना, त्याची काही खबर ही नाही. तुला काय वाटतं? “
“मला वाटतं तो काम पूर्ण करण्यात गढून गेला असावा. गेल्या दोन महिन्यात मी त्याला बरेच पैसे पाठवलेत. त्यामुळे त्याला पैशाची अडचण भासणार नाही. सगळं काम पूर्ण करूनच कामावर यायचा त्याचा बेत असेल. “
“मला नाही वाटत तसं. तू एकदा त्याच्या गावात जाऊन आला आहेस ना? एकदा जाऊन तर पहा”
“मलाही उत्सुकता आहेच. उद्याच जातो. तुही आलास तर बरे होईल. “
“ओ. के. , मलाही बरेच दिवस चेंज मिळालेला नाही. आपण दोघेही जाऊ “
– क्रमशः भाग दुसरा
लेखक : श्री. सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






