डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ अलोपेशिया (Alopecia) — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
प्रियाचा जन्म झाल्यावर घरात सगळ्यांना खूप आनंद झाला. तशाही साठ्यांच्या घरात मुली कमीच. सुधाच्या जावेला, नणंदेला दोन दोन मुलगेच. म्हणून सुधाला पहिली मुलगी झाल्यावर सगळे खूष झाले. मोठ्या थाटामाटात मुलीचं बारसं केलं आणि आत्याने नाव ठेवलं प्रिया. होतीच प्रिया सुंदर गोरी आणि कुरळे केस तिच्या चेहऱ्यावर महिरप करत. दोन वर्षानी सुधाला आणखी एक मुलगी झाली ती रिया.. दोघी मुली अगदी गोड आणि खूप सारख्या दिसायच्या.
मुली चार वर्षाच्या झाल्या. अचानक प्रियाचे केस गळायला लागले. डॉक्टरांनी सांगितले, ही तुम्ही म्हणता तशी चाई आहे. या भागातल्या केसांच्या मुळातल्या पेशी नष्ट होतात आणि केस उगवणे बंद होते. तिथे केस येत नाहीत. हे का होते याला उत्तर नाही. हे आपण थांबवू शकत नाही. डॉक्टरांनाही वाईट वाटले सांगताना…
“पण डॉक्टर, याला काहीतरी औषध असेल ना? कितीही महाग असू दे, आम्ही करू शकतो कितीही खर्च. ”
.. डॉक्टरांनी साठ्यांना शहरातील त्वचारोग तज्ञांची चिठ्ठी दिली.
डॉक्टरांनी प्रियाची सगळी नीट तपासणी केली. स्कॅन केले. त्यात असं दिसलं की तिच्या हेअर फॉलिकल्सवरच अँटॅक झालाय आणि ती नष्ट होत आहेत. हळूहळू सम्पूर्ण स्काल्पच असा होणार हे सत्य डॉक्टरांनी प्रियाच्या आईवडिलांना सांगितले…
“ हा ऑटोइम्युन रोग आहे आणि त्यावर औषध नाही. काही इंजेक्शन दिली तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. आता हे कठोर सत्य तुम्हाला स्वीकारायला हवं. तुम्ही धीर धरा आणि प्रियालाही धीर द्या.
ती अजून खूप लहान आहे आणि शाळेत किंवा कुठेही बाहेरच्या जगात तिला खूप काही सोसावे लागणार आहे. अजूनही आपला समाज हे समजून घेत नाही आणि अशा मुलांच्या वाट्याला कुचेष्टाच येते. ”
.. डॉक्टरांनाही हे सांगताना वाईट वाटत होते. ” अशा केसेस दुर्मिळ असतात पण असतात.
ती मोठी झाली की विगचा पर्याय आहे पण आत्ता तिला त्याचा त्रासच होईल. म्हणून तिला तिचे नॉर्मल आयुष्य जगू दे. ”
हताश होऊन साठे दाम्पत्य प्रियाला घेऊन घरी आले. प्रियाचे सुंदर कुरळे केस रोज उशीवर गळताना दिसू लागले. काही दिवसांनी प्रियाचे पूर्ण टक्कल झाले. डोक्यावर एकही केस उरला नाही तिच्या.
सुंदर गोजिरवाणी प्रिया आता विद्रूप दिसायला लागली.
रोज शाळेत जाताना प्रिया रडायची. “आई मी नाही शाळेत जाणार. सगळी मुलं मुली मला चिडवतात. टकली टकली म्हणतात. मला खूप रडू येतं ग. मला नको शाळा. ”
प्रियाची आई तिची समजूत घालायची.
“असं नको म्हणू बाळा. देवाने तुला किती छान बुद्धी दिलीय ना? मग केस नसले तर नसले.
रोज हा स्कार्फ बांधून शाळेत जायचं. मुलांकडे लक्ष देऊ नको बाळा. ”
हे सांगताना आईच्याही डोळ्यांना धारा लागलेल्या असत.
एकदा प्रियाची आई शाळेत जाऊन प्रिंसिपल बाईना भेटली. ” मॅडम, तुमच्या शाळेतल्या प्रियाची मी आई. तिला असा असा दुर्मिळ आजार आहे आणि तिचे केस गळून गेलेत. ते पुन्हा येणार नाहीत. लहान आहे ती अजून. तुम्ही मुलांना सांगाल का की तिला चिडवू नका? यंदा बघा सहा तुकड्यात ती पहिली आलीय. पण तिला अतिइन्फीरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे. फार वाईट वाटतं हो आम्हाला तिचं. ”.. डोळ्यात पाणी आणून साठेबाई बोलत होत्या.
“हो मिसेस साठे. मी समजू शकते. अनेकवेळा मी स्वतः मुलांना वॉर्निंग दिली आहे. पण शेवटीआम्ही तरी किती लक्ष ठेवणार? शेवटी मुलंच ती. पण तरीही मी पुन्हा सांगते वर्गशिक्षकांना. ”
फारसा काही याचा उपयोग होणार नाही हे समजून साठेबाई घरी आल्या.
रोज प्रिया काळा स्कार्फ बांधून शाळेत जाई. तिची जवळची मैत्रीण निशा मात्र सदैव तिच्याजवळ
असे. कोणी तिची चेष्टा केली तर निशा धावून जाई त्या मुलाच्या अंगावर.
प्रिया खिन्नपणे म्हणायची, ” निशा, तू किती जणांशी अशी भांडणार माझ्यासाठी? मलाच हे सहन करायचे आहे. तेही जन्मभर. बघ ना. इतकं सुंदर रूप असून मला कोणत्याही कार्यक्रमात घेत नाहीत. मी उत्तम पळते तरी मला सगळ्या स्पर्धांपासून लांब ठेवतात. मला किती वाईट वाटत असेल? ”
निशाने प्रियाचे डोळे पुसले. ” प्रिया देवाने तुला तीव्र बुद्धी दिलीय. तू सगळ्यात वर जाऊन दाखव बघ. नुसते सुंदर रूप काय कामाचे? तू पहिली येशील बघ दहावीला. मग बघ कसे हेच लोक सत्कार करतील तुझा. ” निशाने प्रियाला समजावले.
– – सगळी कुचेष्टा आणि अवहेलना सहन करत प्रिया दहावीला बोर्डात पहिली आली. शाळेने तिचा सत्कार केला.
सत्कार स्वीकारताना प्रिया म्हणाली, “मी आभारी आहे माझ्या सगळ्या वर्गबंधू भगिनींची. मला लोकांनी विचारलं ‘तुझे केस का गेले? तुला कॅन्सर झालाय का? ’ पण त्यांना हा आजार माहीत नाही. पण मला त्याची आता खंत वाटत नाही. पण मित्रांनो, यापुढे असे कोणी भेटले तर टिंगल नका करू. सोसणारा काय सोसतो ते फक्त आणि फक्त त्यालाच ठाऊक असते. ” सगळा ऑडियन्स स्तब्ध झाला.
— प्रियाने कॉलेजला ऍडमिशन घेतली. आता मात्र आईबाबांनी प्रियाला चांगल्या नावाजलेल्या हेअर स्पेशालिस्ट कडून अगदी नॅचरल दिसणारा विग करून आणला. तिच्या चेहऱ्याला कोणत्या कटचा विग छान दिसेल हे त्यांनी अनेकवेळा फोटो सेशन करून ठरवले.
आता प्रिया सुंदर शॉर्ट स्टेपकट असलेल्या केसांचा विग घालून कॉलेजला जायला लागली. तिला फार शोभून दिसे तो. एकदमच तिच्या पर्सनॅलिटीत आमूलाग्र बदल झाला. सदैव मागे मागे असणारी प्रिया आता आत्मविश्वासाने वावरू लागली. अगदी जवळून बघितल्याशिवाय तो विग आहे हे समजत नसे. खूपच किंमत द्यावी लागली होती त्यासाठी. पण आपल्या लाडक्या गुणी लेकीसाठी साठे काका काकूंनी मागेपुढे बघितलं नाही. ,
… आपली गुणी सुंदर लेक स्कूटीवरून जाताना निघाली की धन्य धन्य वाटे आईबाबांना. दिवस उलटत होते. प्रिया बघता बघता इंजिनीअर झाली. तिला इतके सुंदर मार्क्स होते की तिला एका अतिशय नावाजलेल्या आय टी कंपनीत लगेच जॉब मिळाला. प्रिया कामावर रुजू झाली. तिला हा जॉब अतिशय चॅलेंजिंग वाटला… प्रियाला लवकरच टेक लीड चे प्रमोशन मिळाले.
एक दिवस ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये कॉफी पीत असताना तिच्या टीम मधला पराग तिला म्हणाला,
“प्रिया एक विचारू? तुझं कोणाशी लग्न ठरलं आहे का? कुठे कमिट केलं आहेस का? ”
“ नाही रे बाबा ”.. प्रिया गंभीरपणेम्हणाली. माझ्याबाबतीत गोष्टी इतक्या सोप्या नाहीत पराग. पण तू हे का विचारतो आहेस? ”
“ मला आवडतेस तू. मला लग्न करायचं आहे तुझ्याशी. ”
“ आज माझ्या घरी ये. मग बोलू आपण. ” प्रिया शांतपणे म्हणाली.
बुचकळ्यात पडलेला पराग संध्याकाळी प्रियाने पाठवलेल्या पत्त्यावर तिच्या घरी गेला.
घरी प्रिया तिची बहीण रिया आणि आईबाबा होते. प्रिया आईजवळ बसली.
“ पराग, तुला माझ्याशी लग्न करायचे आहे ना? मग हे बघ. ”.. शांतपणे प्रियाने आपला विग काढला.
हे बघ आता. मलाअँलोपेशिया हा आजार आहे. आजार नाही पण हा ऑटो इम्युन डिसीज आहे. मला लहानपणा पासून केस नाहीत. मला हेअर ट्रान्सप्लांट करता येणार नाही कारण मला हेअर रूटसच नाहीत.
आता नीट विचार कर आणि सावकाश सांग. ”,
पराग हे बघून हादरून गेल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. चहा संपवून तो घाईघाईने निघूनच गेला.
रिया म्हणाली, ”दीदी, कशाला ग सांगत बसतेस? अशाने जन्मात तुझं लग्न होणार नाही. ”
“ हे बघ रिया, मला कोणालाही फसवायचं नाही. आधीच मी खरं काय ते सांगणार. मग मी जन्मभर अशीच बिनलग्नाची राहिले तरी चालेल ”.
दुसऱ्या दिवशी पराग ऑफिस मध्ये आलाच नाही. प्रियाला त्याचा मेल आला.
“सॉरी प्रिया. मला शॉकच बसला तुला अशी बघून. मला हे सहनच होणार नाही. मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी. मी राजीनामा देऊन जातोय. बेस्टलक तुला. आणि मी हे कोणालाही सांगणार नाही प्रिया.
इतका दुष्ट तर मी मुळीच नाही. ”
प्रियाने शांतपणे मेल डिलीट केला.
तिला कंपनी दोन वर्षासाठी यूएस ला पाठवणार होती.
“ आई, मी कंपनीला होकार कळवलाय. मी निदान दोन वर्षे तरी पुन्हा भारतात येऊ शकणार नाही ग. आणि हो. रियाच्या लग्नाचंआता बघायला लागा आणि करून टाका ”.
प्रिया पुढच्याच महिन्यात यूएसए. ला रवाना झाली. तिच्या कंपनीमध्ये फारच कमी इंडियन लोक होते. बाकी सगळे गोरे किंवा ऍफ्रो अमेरिकन.
प्रिया कंपनीत चांगलीच रुळली. तिची काळी मैत्रीण लारा तिची फार चांगली मैत्रीण झाली. लारा अफ्रो अमेरिकन होती. शिसवीच्या बाहुलीसारखी काळी आणि राठ कुरळे केस. कधीकधी लारा निरनिराळे रंगीत विग घालून यायची. तर कधी पूर्ण गोटा करून मिरवत यायची. अगदी बिनधास्त होती लारा.
.. त्या दिवशी लाराने प्रियाला घरी बोलावले. प्रिया छानशी फुले आणि परफ्यूम घेऊन लाराच्या घरी गेली.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





