श्री मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ आजोबा आणि बुढ्ढाश्रम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
दर शनिवारी, आजोबा आणि मी आमच्या घराजवळ असलेल्या बुढ्ढाश्रमात तिथल्या आजीआजोबांना भेटायला जातो. “त्याला बुढ्ढाश्रम नाही म्हणत, ” आजोबा मला सांगत, आणि मग काहीतरी खूप जोडाक्षरं असलेला एक कठीण शब्द म्हणत, पण मला काही तो शब्द म्हणता येत नाही.
तिथे आजोबांचे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना भेटायला आजोबांना आणि मला फार आवडतं. शिवाय आजोबा नेहमी म्हणतात, “जे आजारी लोकांना भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यांचं मनोरंजन करतात, ते त्यांना नवीन उभारी देतात, खूप पुण्याचं काम करतात. ”
तिथं आम्हाला अन्नपूर्णाअम्मा भेटायच्या. त्या चेन्नईजवळील एका गावाहून आलेल्या आहेत. त्या नेहमी त्यांच्या गावातील एकाहून एक सरस खाद्यपदार्थांबद्दल सांगायच्या. त्यांचे तिथं एक छोटे हॉटेल होतं आणि त्यांच्या हातचं इडलीसांबार खायला लोक दूर-दूरहून येत असत.
नंतर भेटायचे पेस्तनकाका, ते खूप गमतीशीर बोलायचे. त्यांच्या पारशी ढंगात वेगवेगळे जोक्स सांगायचे. त्यांचे काही जोक्स फार फनी असत, काही मला समजतही नसत. पण ते स्वत:च्याच विनोदांवर जोरजोराने हसत, हसताना त्यांची ढेरी अशी गदागदा हलायची आणि नुसतं ते बघूनही मला हसू यायचं.
त्यांच्या शेजारी संगीतकाका असतात, हे नेहमीच काहीतरी गुणगुणत असत. खूप मूडमध्ये असले की ते आम्हालाही कोरसमध्ये गायला लावायचे.
मग भेटतात मेहताआजी! त्या नेहमी आपल्या नातवंडांच्या गोष्टी सांगतात, त्यांच्याकडे त्यांच्या नातवंडांचे ढीगांनी फोटो आणि अल्बम आहेत.
बापटकाकू शाळेत इतिहासाच्या शिक्षिका होत्या. त्या नेहमी आम्हाला जुन्या काळातल्या पौराणिक, ऐतिहासिक कथा सांगत.
सिंग साहेब सैन्यातून निवृत्त झाले आहेत. एका युद्धात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला होता. ते आम्हाला सैनिकांच्या शौर्याच्या कथा सांगतात.
गुप्ताकाका फार बोलत नाहीत, फक्त माझी वटवट ऐकतात, मान डोलावतात आणि “पुढच्या शनिवारी परत ये ग” असं मला म्हणतात.
मला आणि आजोबांना या सगळ्यांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडायचं आणि ऊन असो, वारा असो किंवा पाऊस असो, दर आठवड्याला आम्ही त्यांना भेटायला जायचोच.
पण एकदा माझे आजोबा आजारी पडले आणि त्यांना हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. “ते क्रिटिकल आहेत, कोमात गेले आहेत, ” असं काहीतरी डॉक्टर म्हणाले, म्हणजे काय ते मला नीटसं कळलं नाही, पण एवढं नक्की समजलं, की या शनिवारी ते माझ्याबरोबर त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटायला येऊ शकणार नाहीत.
मग मी त्या शनिवारी एकटीच बुढ्ढाश्रमात गेले. सगळे मला पाहून खूप आनंदी झाले. आजोबा का नाही आले असं सगळ्यांनी विचारलं, मी त्यांना हॉस्पिटल, क्रिटिकल, कोमा वगैरे सांगितलं. त्यांना काय कळलं कोणास ठाऊक, पण आज ते सगळेच मला हसवण्याच्या प्रयत्नात होते. अन्नपूर्णाअम्मानी त्यांची फेवरेट रेसिपी मला सांगितली, पेस्तनकाकांनी जोक्स सांगितले, मेहता आजींना माझा रेड फ्रॉक खूप आवडला असं त्या म्हणाल्या, बापट काकूंनी एका शूर छोट्या मुलीची गोष्ट सांगितली.
मी परत जायला निघाले, तेव्हा का कोणास ठाऊक पण सगळे आजीआजोबा डोळे पुसत होते. मी पुढच्या आठवड्यात नक्की आजोबांना घेऊन येईन असं त्यांना प्रॉमिस केलं आणि निघाले.
पण पुढच्या शनिवारीसुद्धा आजोबा हॉस्पिटलमध्येच होते. ते काही खातपीत नव्हते, बोलत नव्हते, हसत नव्हते, नुसते छताकडे बघत पडून राहायचे. बाबा गप्प गप्प असायचे, आईचे डोळे लाल दिसायचे.
आजही आजोबा माझ्यासोबत येणार नाहीत हे मला कळलं, मग मी पाचच मिनिटांसाठी बुढ्ढाश्रमात जाऊन आले. त्यांना सांगितलं की आजोबांना अजून बरं वाटत नाहीये आणि आई बाबा पण बोलत नाहीयेत, तर मी आज त्यांच्याशी गप्पा मारायला जाते.
आजी आजोबा काही बोलले नाहीत. का माहीत नाही, पण गुप्ताकाकांनी मला जवळ घेतलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि “सगळं ठीक होईल, बरं, बाळ! ” असं मला म्हणाले.
“मला कुठं काय झालं होतं? ” या आजोबांची गंमतच आहे, मला वाटलं.
दुसऱ्या दिवशी, रविवारी, आईबाबांसोबत मी हॉस्पिटलमध्येच होते. आता ते डोळे उघडत होते, पण ते काही खातच नव्हते, त्यामुळे त्यांना ताकद येत नव्हती. मी त्यांना कित्ती कित्ती सांगितलं, की vegetables खाल्ल्या पाहिजेत, दूध प्यायलं पाहिजे, पण ते ऐकतच नव्हते.
एवढ्यात आजोबांच्या हॉस्पिटलच्या खोलीबाहेर खूप आवाज ऐकू यायला लागले. “ऐसा कैसा खबर नहीं? मेरे को पक्की खबर हैं के इधर आज पार्टी है! ” असं मोठमोठ्यांदा बोलत पेस्तनकाका आजोबांच्या खोलीत घुसले. अम्माने गरमागरम इडलीसांबार आणलं होतं. सिंगसर बाबांशी बोलत होते, बापट काकू आईच्या पाठीवरून हात फिरवत होत्या, मेहताआजी त्यांच्या नातवंडांनी केलेलं “get well soon” ग्रीटिंग कार्ड आजोबांना देत होत्या, संगीतकाका कुठलं तरी, जुन्या काळातलं “सुहाना सफर, और ये मौसम हसीन” वगैरे गाणं म्हणत होते, गुप्ताकाका माझा हात घट्ट धरून उभे होते.
रूममध्ये नुसता आरडाओरडा चालला होता, इतका की तिथल्या नर्सताईसुद्धा काय चाललं आहे बघायला, आम्हाला गप्प करायला खोलीत आल्या. पण ही सगळी मंडळी पाहिली, नर्सताईला काय झालं माहित नाही, पण त्या डोळे पुसत – आम्हाला काहीच न बोलता बाहेर निघून गेल्या.
आजोबांनी हाताने खूण करून बाबांना बोलावलं, “मला जरा बसतं करतोस का? मला भूक लागली आहे, ” एकदम हळू आवाजात ते म्हणाले.
मग त्यांनी अम्माने आणलेली इडली खाल्ली.
आई बाबा आणि आलेले सगळे आजी आजोबा वेडे आहेत! तिकडे आजोबा खात होते, आणि इकडे या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं.
“आता तुझे आजोबा लवकर बरे होणार, बरं का! ” माझ्या डोक्यावर टपली मारत डॉक्टरकाका सांगत होते, आणि मी आजोबांबरोबर पुढच्यावेळी बुढ्ढाश्रमात गेले की काय करायचं याचे प्लॅन्स करण्यात गुंग झाले होते.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड, पुणे. मो 8698053215
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




