श्री कौस्तुभ केळकर नगरवाला
जीवनरंग
☆ “ऊब…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
“ते चाॅकलेटी स्वेटरवाले का ? .. रोज सकाळी काठी टेकत, नाक्यापर्यंत जातात ते ? ते तुमचे वडील काय ?”
“हो…तेच ते.” जीवावर आल्यासारखं विन्यानं उत्तर दिलं.
.. तो चाॅकलेटी स्वेटर आता, विन्याच्या डोक्यात गेलेला.
त्या जुनाट चाॅकलेटी स्वेटरवाल्या म्हाताऱ्याचा मुलगा.
हीच आपली लायकी… हीच आपली ओळख.
भर थंडीत विन्या धुसफुसू लागला.
खरं तर आपल्या वडलांवर विन्याचा भारी जीव.
फार जपायचा त्यांना तो.
आई गेल्यानंतर तर फारच.
तो ,रूही , नील आणि त्याचे बाबा.
छोटा परिवार.
सुखी परिवार.
पण या सुखालाच नजर लागली होती.
हल्ली थंडी नकोशी वाटते विन्याला.
जरा कुठे गारवा आला की झालं..!
त्याचे बाबा कपाटातून, तो चाॅकलेटी स्वेटर बाहेर काढायचे.
आठ महिने तो स्वेटर ,कपाटात अंग चोरून बसलेला.
साचलेपणाचा कुबट वास यायचा त्याला.
बाबांना त्याचं काही वाटायचं नाही.
स्वेटर आणि ते!
पुढचा चातुर्मास.
नाईलाज म्हणून, आंघोळीच्या वेळा काढला जायचा तेवढाच.
बाकी कर्णाच्या कवचकुंडलासारखा, तो आपला बाबांच्या अंगाला चिकटलेला.
सलग वापरून वीण बरीचशी विरळ झालेली. रंगही उडालेला.
पण नाही म्हणजे नाही.
एकदा ऐकायचं नाही म्हणल्यावर काय ?
म्हातारी माणसं म्हणजे हट्टी मूल… समजूत पटायची नाही.
आता तर विन्याला वाटायचं , की बाबा आपल्या वयाचा गैरफायदा घेतात, छळतात मला.
खरं तर दोन वर्षांपूर्वी विन्यानं नवीन ओसवालचा स्वेटर आणलेला.
तसाच.
चाॅकलेटी.
” बाबा जुनाट झालाय तुमचा स्वेटर.
हा नवीन वापरा
फेकून द्या तो.”
बाबांनी नवा स्वेटर फेकून दिला.
“मीही जुनाट झालोय.
मलाही फेकून द्या.”
काय बोलणार ?
विन्या नुसता आतल्या आत कुढत बसायचा.
उगाच लोकांना वाटायचं ,
“हा आपल्या म्हातार्या बापाला साधा स्वेटरही घेवून देत नाही.”
लाज वेशीवर टांगलीय या स्वेटरनं.°
रूही आपल्या म्हातार्या सासर्याला खूप सांभाळून घ्यायची.
थंडी संपली की, स्वेटर गुपचूप ड्रायक्लीन करून आणायची. नीट घडी करून कपाटात ठेवायची.
पण…,
वाढत्या वयाला इलाज नाही.
बाबांच्या .
आणि स्वेटरच्याही.
बापलेकाच्या प्रेमाला ग्रहण लागलं होतं.
नात्याची लोकर ऊसवत चाललेली.
रूहीनं ठरवलं.
सप्टेंबरपासून सुरवात केली.
चाॅकलेटी रंगाचा गुंडा.
सतत विणत बसायची.
बाबांच्या लक्षात आलं.
“कुणासाठी गं ?”
‘नीलसाठी…’
नोव्हेंबर उगवला.
हुडहुडी थंडी.
रूहीचे तीन स्वेटर तयार.
नील.
विन्या.
बाबा.
तिघांचे डिट्टो.
एक हिवाळी रात्र.
जेवणं झालेली.
हाॅलमधे मिटींग.
रूहीनं बोलावलेली.
” आज मिटींग बोलावलीय ती स्वेटरसाठी.
तुम्ही कुणीही बिलकुल बोलायचं नाही.
फक्त ऐकायचं.
“मी तीन स्वेटर विणलेत.
तुमच्या तिघांसाठी.
या थंडीत तेच वापरायचे.”
“विन्या , बाबांना त्यांच्या स्वेटरवरनं बोललेलं, मला आवडायचं नाही.”
“बाबा ,तुमच्या स्वेटरवरनं विन्याला कुणी बोललेलंही मला आवडणार नाही.”
मला माहित्येय.
बाबा , त्या स्वेटरमधे तुमचा जीव आहे.
सासूबाईंनी विणलाय तो.
म्हणूनच मीही स्वतः विणलाय हा.
तुम्हीही समजून घ्या.
आमच्या प्रेमाची ऊब तेवढीच आहे.
सासूबाईंइतकी.
तो जुना स्वेटर तुम्ही जरूर वापरा.
पाहिजे तर शर्टाच्या आतून.
पण त्यापायी आपल्या नात्याची वीण उसवता कामा नये.
त्या स्वेटरला जपूच आपण.
पण कधीतरी तो संपणारच आहे.
त्याच्या नसण्याची सवय करायलाच हवी.
पण सासूबाईंची आठवण सदैव आपल्याबरोबरच आहे.
त्या स्वेटरशिवायही, त्याची ऊब मिळणारच आहे.
तेव्हा… आता नई शुरूआत.
बस..!
मिटींग ओव्हर.
नो अर्ग्युमेंटस्.”
खरंच विषय संपला.
डबल कोटेड बाबा, गुलाबी थंडी एन्जाॅय करू लागले.
” ते चाॅक्लेटी स्वेटरवाले तिघे म्हणजे , तुमचे सासरे ,तुमचे हे आणि तुमचा मुलगा काय ?”
कुणीतरी रूहीला विचारलं.
रूही मनापासून हसली.
“हो…”
स्वेटरची ऊब तिलाही जाणवली.
नात्यांची घट्ट वीण.
थंडी वाजायचीच नाही.
© कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





