श्री जगदीश काबरे

☆ “विचारशून्य…” – भाग – १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

सकाळी सात वाजताच ‘गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल’च्या प्रांगणातली घंटा वाजली. शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात वह्या-पुस्तके नव्हती. त्या ऐवजी त्या सर्वांच्या हातात शैक्षणिक AI नावाचे टॅबलेट दिसत होते. विद्यार्थी वर्गात स्थिरस्थावर होत आहेत तोच शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला. फळ्यावर शिक्षकांनी काहीही लिहिले नाही. ते फक्त म्हणाले, “आजचा धडा – ‘भारतीय संविधानाची निर्मिती’ सर्वांनी शैक्षणिक AIला विचारा आणि नोट्स तयार करा. ”

वर्गामध्ये एकालाही प्रश्न पडला नाही. एकाही विद्यार्थ्याने ‘का? ’ किंवा ‘कसे? ’ विचारले नाही. शिक्षकांनी सांगितले तसे त्यांनी निमूटपणे केले. कारण आज्ञाधारकपणा हा सर्वोच्च गुण समजले जात होता आणि प्रश्न विचारणे उद्धटपणा!

AI ला विचारून लिहिल्यामुळे प्रत्येकाच्या टॅबलेटवर एकसारखी उत्तरे चमकत होती.

मिसेस पाटील मात्र थोड्याशा अस्वस्थ होत्या. पंधरा वर्षांची अध्यापनाची कारकीर्द असलेल्या या शिक्षिकेला गेल्या वर्षभरात नाईलाजाने हा बदल स्वीकारावा लागला होता. आधी त्या मुलांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करत. पण आता मुख्याध्यापक अधिकार वाणीने सांगत होते, “आपल्याला AI-सक्षम शिक्षक बनायचं आहे, विचार शिकवायचा नाही, तर फक्त आउटपुट द्यायचं आहे. ”

पाटील मॅडमच्या मनात विचार आला, ’आपण शिकवत आहोत का, की फक्त यंत्रांसमोर प्रश्न टाकत आहोत? आणि भविष्यातील पिढी यंत्रमानव म्हणजे यांत्रव बनवत आहोत? ’ 

त्याच वेळी वर्गात एक विद्यार्थी, नील टॅबलेटकडे पाहून म्हणाला, “मॅडम, AI म्हणतंय की संविधान डॉ. आंबेडकरांनी एकट्याने लिहिलं. ते खरं आहे का? ”

पाटील मॅडमना आनंद झाला… कुणीतरी शंका विचारत होतं… प्रश्न विचारला होता.

त्या म्हणाल्या, “हो, त्यांनी राज्यघटना समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाचं काम केलं, पण समितीत अनेक लोक होते… ” असं म्हणत असतानाच त्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्याही टॅबलेटवर लाल दिवा उघडझाप करू लागला… त्यांना वाक्य अर्धवटच सोडावं लागलं. कारण टॅबलेटने लगेच त्यांना थांबण्याचा संदेश दिला होता. तो संदेश देत होता की, “AI सत्यापित स्रोत शिक्षकांच्या इनपुटशी विसंगती दाखवत आहे. म्हणून विद्यार्थ्यांना दिलेले शिक्षकाचे हे उत्तर लॉक केले जात आहे. “

मुलं हसली. मॅडम मात्र मनातून दुःखी झाल्या.

त्या क्षणी त्यांना उमगलं की, शिक्षणातून विचार हरवला आहे, आणि AI यंत्रांचा विचार वरचढ ठरतो आहे.

त्याच शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात अभय देसाई, पुणे विद्यापीठातील संशोधक, रात्री उशिरापर्यंत आपला पीएचडी प्रबंध लिहित होते. त्यांच्या विषयाचं नाव होतं – “कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्जनशीलतेवर परिणाम. ” विरोधाभास असा होता की, प्रबंधातील प्रत्येक प्रकरण त्यांनी ’AI थेसिस मास्टर’ नावाच्या सॉफ्टवेअरकडून तयार करवून घेतलं होतं.

“थोडं संपादन करतो, म्हणजे पकडले जाणार नाही, ” ते स्वतःशीच म्हणाले.

कधी काळी ते खरे संशोधक होते. विचारवंत म्हणून त्यांना लोक ओळखत होते. पण आज ‘AI-सहाय्यक संशोधन’ या नव्या युगात प्रवेश केल्यावर त्याची मौलिकता हरवली होती. संपूर्ण प्रबंध तयार झाल्यावर ते कौतुकाने स्वतःशीच पुटपुटले, “वा! किती परिपूर्ण भाषा, किती व्यवस्थितपणे AI ने केलेला हा तर्क आहे! AI ने अगदी एखाद्या कसलेल्या लेखकाने लिहावे तशी मांडणी केलेली आहे. ” पण त्यात त्यांचा स्वतःचा विचार नव्हता, त्या प्रबंधात होता तो फक्त डेटाचा म्हणजे विदेचा प्रतिध्वनी.

दोन महिन्यांनी त्यांचा प्रबंध राष्ट्रीय पातळीवर स्वीकारला गेला. त्यांना कौतुकभरल्या शब्दांचं पत्र आलं. ते वाचून त्यांच्या अंगावर मूठवर मास चढलं. आनंदाच्या उर्मीत त्यांनी स्वतःभोवतीच एक गिरकी घेतली.

परंतु एक महिन्यानंतर त्यांच्याच प्रबंधातील एक भाग दुसऱ्या संशोधकाच्या प्रबंधात आढळला. कारण दोघांनी एकाच AI मॉडेलचा वापर केला होता. दोन्ही प्रबंध शब्दशः सारखेच होते.

शोध विश्वात खळबळ उडाली. पत्रकारांनी विचारलं, “डॉ. देसाई, हाच का तुमच्या बुद्धिमत्तेच्या संशोधनाचा नमुना? ”

त्यांनी थरथरत्या आवाजात अडखळत वेळ मारून नेणारं उत्तर दिलं, “मी विचार केला होता की, AI माझा सहाय्यक आहे… पण कदाचित तोच माझा लेखक झाला असे दिसते आहे. ”

दरम्यान देशात एका नव्या प्रकारच्या अध्यात्मिक चळवळीचा उदय झाला. तीचे नाव होते – “ॐटेक संप्रदाय” तीचा मुख्य प्रचारक होता स्वामी डिजिटलानंद. हा माणूस एक बुद्धिमान आणि तंत्रज्ञानात पारंगत असलेली व्यक्ती होती. पण बुद्धीचा आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत त्यांनी तयार केली होती AI देवता — “श्रीज्ञानबॉट”.

लोक फोनवर भक्तीभावाने ’श्रीज्ञानबॉट’ला प्रश्न विचारत, “ज्ञानबॉट महाराज, माझं नशीब कधी उजळेल? ”

… आणि AI च्या आवाजात उत्तर येत असे, “तुमच्या डेटाच्या नमुन्यानुसार पुढील मंगळवार शुभ आहे. तेव्हा तुमचे नशीब फळफळावयाचे असेल तर त्या दिवशी ’ॐटेक संप्रदाय’ला दान करा, ₹501. ”

या उत्तराने भारलेले हजारो लोक ऑनलाइन दान करत. या डिजिटल देवतेचे थोड्याच काळात करोडो अनुयायी झाले, त्यात आश्चर्य नव्हते. कारण माणसाने विचार करायचेच सोडून दिले होते. पूर्णपणे त्यांचे जीवन AI वर अवलंबित झालं होतं. AI म्हणेल ती पूर्व दिशा ठरत होती.

काही दिवसांनी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ‘व्हर्च्युअल कुंभ’ नावाचा महोत्सव पार पडला.

लोकांनी वर्चुअल रियालिटी (VR) हेडसेट लावून AI-निर्मित गंगास्नान केलं.

डिजिटलानंद म्हणाला, “माणूस आता पापमुक्त बाइट्समध्ये स्नान करतो आहे. त्यामुळे तो लवकरच शुद्ध होणार आहे. ”

अंधश्रद्धा आणि तंत्रज्ञान यांचा हा संकर भीषण होता. एक दिवस डिजिटलानंद स्वामीने जाहीर केलं, “ज्ञानबॉटने एक नवीन भविष्यवाणी केली आहे. लवकरच देव मनुष्यरूपात परत येईल. ” अजूनही काही प्रमाणात अस्तित्वात असलेल्या शंकासुरांना उद्देशून ते पुढे म्हणाले, ” या परमेश्वराचा अनुग्रह मिळण्यासाठी आपल्या ‘विचारांचा सर्वांना त्याग करावा लागेल, शंकांना पायबंद घालावा लागेल, प्रश्न विचारणे सोडून द्यावे लागेल आणि श्रद्धेनेच त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. ”

डिजिटलानंद स्वामीने सांगितल्याप्रमाणे लोकांनी मोबाईलवरील एक बटण दाबलं. त्यामुळे लोकांचा मेंदू AI शी तादात्म्य पावला. त्या क्षणी लाखो लोकांचे मेंदू ‘ज्ञानबॉट नेटवर्क’शी जोडले गेले.

– क्रमशः भाग पहिला 

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments