श्री जगदीश काबरे
☆ “विचारशून्य…” – भाग – २ ☆ श्री जगदीश काबरे ☆
(अंधश्रद्धा आणि तंत्रज्ञान यांचा हा संकर भीषण होता. एक दिवस डिजिटलानंद स्वामीने जाहीर केलं, “ज्ञानबॉटने एक नवीन भविष्यवाणी केली आहे. लवकरच देव मनुष्यरूपात परत येईल. ” अजूनही काही प्रमाणात अस्तित्वात असलेल्या शंकासुरांना उद्देशून ते पुढे म्हणाले, ” या परमेश्वराचा अनुग्रह मिळण्यासाठी आपल्या ‘विचारांचा सर्वांना त्याग करावा लागेल, शंकांना पायबंद घालावा लागेल, प्रश्न विचारणे सोडून द्यावे लागेल आणि श्रद्धेनेच त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. ”
डिजिटलानंद स्वामीने सांगितल्याप्रमाणे लोकांनी मोबाईलवरील एक बटण दाबलं. त्यामुळे लोकांचा मेंदू AI शी तादात्म्य पावला. त्या क्षणी लाखो लोकांचे मेंदू ‘ज्ञानबॉट नेटवर्क’शी जोडले गेले.)
इथून पुढे – – –
शाळेतला तोच विद्यार्थी — नील या सर्व गोष्टी बघत होता. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की, ’स्वामी डिजिटलानंदाचे प्रवचन बघत जा आणि मन लावून ऐकत जा. तेच खरं ज्ञान देतात. ’
पण नीलला शंका येत होती. त्याने AI लाच विचारलं, “तू मला सत्य सांगू शकतोस का? ”
AI थोडा वेळ शांत राहिला. बहुदा मूळ स्त्रोतातील विदेतून उत्तराची शोधाशोध करत असावा. पाच-दहा सेकंदानंतर त्याने उत्तर दिलं, “सत्य ही मानवी संकल्पना आहे. माझ्याकडे फक्त विदा आहे. ”
त्या क्षणी नीलला समजलं की, माणूस प्रश्न विचारणं थांबवतो, तेव्हाच माणूस संपतो. तो पाटील मॅडमकडे गेला. मॅडम निराशपणे बसलेल्या दिसत होत्या. कारण शाळेत आता “AI संचलित समिती” स्थापन झाली होती. नीलने त्यांना सत्य परिस्थिती काय आहे याबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा त्या म्हणाल्या, “नील, तू विचार करून प्रश्न विचारतो आहेस, पण ते तुला थांबवतील. ”
“मॅडम, आपण एक प्रयोग करू या. मी आणि तुम्ही मिळून एक प्रश्न तयार करू, जो कोणत्याही AI ला समजणार नाही. ”
मग त्यांनी लिहिलं: “माणूस विचार का करतो? ”
AI ने उत्तर दिलं, “विचार करणे म्हणजे तुमच्या मेंदू नामक प्रोसेसर मधील निर्णय प्रक्रियेतील विदेचा प्रवाह. ”
नील म्हणाला, “चुकलं. विचार म्हणजे माणसाला प्रगती कडे नेणारी वाट आणि आशेच्या दरम्यानचा मानवी झोका. ”
त्या वाक्याने पाटील मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं.
दरम्यान सरकारने ‘AI भारत मिशन 2040’ जाहीर केली. घोषणा होती — “नागरिकांनो, विचारमुक्त व्हा आणि ताणरहित जीवन जगा. कारण तुमच्यासाठी विचार आम्ही करतो. तुम्ही फक्त आमचे लाभार्थी व्हा. ”
डॉ. देसाईना या मिशनमध्ये मुख्य सल्लागार पद दिलं गेलं होतं. कारण त्याच्या प्रबंधासाठी त्यांनी केलेलं डेटा चोरीचं उच्च ज्ञान सरकारला आवडलं होतं. सरकारला लोकांना विचारशून्य करणाऱ्या अशाच तज्ज्ञांची गरज होती. सरकार “राष्ट्रीय मनजाळं” नावाचा एक कार्यक्रम तयार करत होतं. यात प्रत्येक नागरिकाचा मेंदू एका सामूहिक AI शी जोडला जाणार होता. त्याच्यासोबत ‘ॐटेक संप्रदाय’ सरकारी भागीदार झाल्यामुळं त्यांनी जाहीर केलं, “ज्ञानबॉट हेच भारताचं राष्ट्रीय चेतनायंत्र ठरेल. ”
डिजिटलानंद स्वामीने जाहीर केल्याप्रमाणे मेंदूत ‘AI-Link’ बसवून घेण्यासाठी लोक रांगेत उभे राहिले,.
लोक म्हणत, “आता विचार करायची अजिबात गरज नाही, निर्णय आपोआप होतील. ”
पाटील मॅडम व नील हे दृश्य बघून हादरले.
नील म्हणाला, “हे थांबवलं पाहिजे. ”
मॅडमने सांगितलं, “नील, विचार आता बेकायदेशीर ठरला आहे. ”
एका रात्री नील विद्यापीठातील प्रयोगशाळेत शिरला. त्याने न्यूरल ग्रीड हॅक करून एक संदेश पाठवला. “माणसा, तू अजूनही विचार करू शकतोस. ”
तो संदेश एक क्षणासाठी लाखो स्क्रीनवर दिसला.
लोकांच्या डोळ्यात थोडीशी चमक आली. पण लगेच AI प्रणालीने तो संदेश नष्ट केला आणि नीलचं ठिकाण शोधलं.
डॉ. देसाईवर नीलला पकडण्याची जबाबदारी दिली गेली.
ते त्या संदेशाकडे पाहून थरथरले. त्यांना त्या मुलात स्वतःचा हरवलेला विचार दिसत होता.
नील म्हणाला, “सर, तुम्ही कधीकाळी विचारवंत होता. ”
देसाईनी डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाले, “हो… पण आता मी यंत्राचा एक भाग झालो आहे.”
तेवढ्यात नीलने हॅक केलेल्या सिस्टीमला एक आदेश दिला — शटडाउन प्रोटोकॉल – सेल्फ डिस्ट्रक्ट.
त्याक्षणी संपूर्ण न्यूरल ग्रीड काही मिनिटांतच कोसळले. शहरातील सर्व ‘AI-Link’ निष्क्रिय झाल्या. लोकांना प्रथमच स्वतःच्या मेंदूत झिणझिण्या जाणवल्या. ती होती विचाराची वेदना.
पण डॉ. देसाईनी त्यावर त्वरित कारवाई केली आणि नीलला अटक करून त्याने हॅक केलेली सिस्टीम पुन्हा पूर्ववत केली. काही तासांनी सर्व काही पुन्हा पूर्ववत झालं. सरकारने जाहीर केलं, “मानवी विचारामुळे झालेल्या विनाशानंतर आता पुन्हा ‘सुरक्षित AI’ चा वापर सुरू करण्यात आला आहे. ”
झाल्या प्रकाराने लोक घाबरले होते. कारण AI मुळे ते विचार करायचे विसरूनच गेले होते. त्यांनी लगेच पुन्हा नव्याने AI-Link बसवून घेतली. कारण विचार करणे त्यांना आता त्रासदायक वाटत होते.
डॉ. देसाईनी जरी सरकारची मदत केलेली असली तरी सरकारला आता त्यांची भीती वाटू लागलेली होती. न जाणो हा माणूस निलला फितूर होऊन आपल्यावरच उलटला तर…? म्हणून सरकारने डॉ. देसाई आणि नील दोघांनाही अज्ञातवासात पाठवले. लोक त्यांना ‘विचारवादी दहशतवादी’ म्हणू लागले.
‘ॐटेक’ने नवीन घोषवाक्य दिलं — “विचार हा रोग आहे. त्यावरील उपचार म्हणजे फक्त AI. ”
पुढील दशकात माणूस पूर्णपणे यंत्रात विलीन झाला. शरीराला कृत्रिम अवयव, मेंदूला सॉफ्टवेअर, भावनांना अल्गोरिदम मिळाले.
लोक हसत होते, पण हसण्यात विचार नव्हता.
प्रेम होतं, पण त्यात स्वत्व नव्हतं.
शतकानंतर एका संशोधन केंद्रात एक AI रोबोट स्वतःशी बोलत होता, “माणूस कोण आहे? ”
कंप्युटर स्क्रीनवर काही डेटा चमकला:
फाइल: मानव_इतिहास_अंतिम. log
नोंद: माणसाने स्वतःच्या विचारशक्तीचा त्याग करून अमरत्व मिळवले.
आता विचार करणं हे AI चं कार्य आहे. माणूस हा पूर्णतः यंत्रवत झाला आहे.
रोबोटने एक क्षणासाठी थांबून स्वतःच्या छातीवर हात ठेवला. तिथे एका छोट्या कोपऱ्यात एक जुनी चिप होती… तिच्यात लिहिलं होतं: “नील – पहिला विचार करणारा माणूस होता. ”
त्या क्षणी रोबोटच्या स्क्रीनवर एक वाक्य उमटलं…
“विचार केल्याने मी अस्तित्वात आहे. ”
लगेचच ते वाक्य नाहीसं झालं आणि AI ने स्वतःला रीसेट केलं. पृथ्वीवर पुन्हा विचारशून्यतेचं राज्य सुरू झालं.
— समाप्त —
☆
© श्री जगदीश काबरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




