श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ अस्वस्थ अंधार – भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – “पूर्वी रजा मागितली की आधी जोशी साहेबांचे चाबकाच्या फटकाऱ्यासारखे शब्द मुकाट ऐकावे लागायचे.. ” आवाज भरून आला तसं देशपांडे बोलायचे थांबले.
“देशपांडे.. जस्ट रिलॅक्स.. अहो अशा साध्या साध्या गोष्टींचं इतकं दडपण घेऊन कसं चालेल? “
ऐकलं आणि देशपांडेंचे भरून आलेले डोळे एकाएकी वाहू लागले.
“काय झालं देशपांडे? घरी काही प्रॉब्लेम?
“मुलाला बरं नाहीय. “
संदीपच्या नजरेसमोर एकदम त्याची गोऱ्या गोबऱ्या गालांची तेजूच झेपावू लागली.
“किती वर्षाचा आहे तुमच्या मुलगा? “
“सहा वर्षांचा.. “
“रहातो तुमच्याशिवाय? आठवण नाही काढत? ” संदीपने विचारले
देशपांडे आपलं हरवलेल़ं सुख शोधत राहिले..)
इथून पुढे – – –
“मला ओळखतच नाही तो. म्हणजे इथं आजारी पडला तेव्हा वर्षाचाही नव्हता. रिकेटस् चा अॅटॅक होता. इथं धड दवाखान्याची सोयही नाही. मग खूप धावपळ करून तिकडे नेला, पण बराच उशीर होऊन गेला होता हो. तेव्हापासून अंथरूण सोडलंच नाहीयन्. चालणं नाही, बोलणं नाही, नजरेत ओळखीचं हसू नाही, मांसाचा एक लोळागोळा.. लाळ गाळत पडून असतो… “
“ओह.. आय फील व्हेरी सॉरी देशपांडे. मला हे सगळं माहित नव्हतं. जोशी बोलले नव्हते कधी. “
” त्यांना तरी इतकं सगळं कुठं माहित होतं? “
” कां? तुम्ही बोलला नव्हतात कधी? “
देशपांडे मानेनेच नाही म्हणाले. ” बोलावसं वाटलंच नाही हो. एकदा असंच पत्र आलं होतं घरचं. लगेच जाणं आवश्यक होतं. तेव्हा ते मला.. ‘तुमचा मुलगा खरंच आजारी आहे कां ते एकदा तुमच्या घरी येऊन बघायला हवं’ असं म्हणाले होते. ते ऐकलं त्या क्षणापासून माझा संवादच तुटला. “
” यापुढे असं होणार नाही देशपांडे. मुलाच्या काळजीचं दडपण मनातून काढून टाका तुम्ही”
देशपांडे एवढंसं हसले.
” मला मुलाची काळजी फारशी वाटत नाही साहेब. कारण ती करायला माझी बायको तिथं आहे. पण तिची काळजी करायलाच कुणी नाही हो. सगळं ओझं एकटी ओढत असते. दोन्ही घरच्यांच्या मनाविरुद्ध आम्ही लग्न केलेलं. त्यामुळे सगळ्या मायेच्या माणसांनी आमच्याकडे पाठ फिरवलीय. वाटत होतं या आमच्या दयनीय अवस्थेत तरी सर्वजण आम्हाला जवळ घेतील, मागचं सगळं विसरतील. पण… “
देशपांडेंचं बोलणं सुरू असतानाच पोस्टमन दारात उभा होता. त्याने पुढे केलेला टेलिग्राम संदीपने शांतपणे स्वीकारला.
“कुणाचा… कुणाचा आहे टेलिग्राम? ” देशपांडेंनी थरथरत्या आवाजात विचारलं. टेलिग्राम वाचून संदीपने शांतपणे त्याची घडी घालून तो खिशात ठेवून दिला. देशपांडेंचा स्वतःवरचा ताबा हळूहळू सुटत चालला. त्यांचं उभं अंग थरथरू लागलं. ते श्वास रोखून पहात राहिले. मुलाच्या काळजीने आतून व्याकुळ होऊ लागले. तोल सावरता येईना तसे हेलपाटत समोरच्या खुर्चीत टेकले. थोडंसं पुढं होऊन त्यांना अलगद थोपटत संदीप ते शांत व्हायची वाट पहात राहिला.
“देशपांडे, टेलिग्राम तुमचा नाहीये.. “
खोल दरीत कोसळत असताना अगदी अनपेक्षितपणे कुणीतरी अलगद झेलावं तशी देशपांडेंची अवस्था झाली.
” मग.. मग कुणाचा आहे टेलिग्राम? “
संदीपने कांही न बोलता खिशातली टेलिग्रामची घडी काढून त्यांच्यापुढे केली.
‘तेजू नीडस् यू. स्टार्ट इमिजिएटली.. ‘
” ही तेजू कोण? “
“मुलगी माझी. ” मनातली काळजी शक्यतो लपवत संदीप म्हणाला.
“काय होतंय तिला? आजारी आहे कां ती? “
” नो.. नो.. नाॅट अॅट आॅल.. ” संदीपने ते विचार तत्परतेने झटकून टाकले. ” शी.. शी मस्ट बी आॅल राईट.. ” तो स्वतःच्याच मनाला समजावल्यासारखा बोलून गेला. आता मात्र त्याला आपल्या काळजातली व्याकुळता लपवता येईना. त्याच्या चेहऱ्यावरचे हे बदलत जाणारे भाव देशपांडेंच्या नजरेतून सुटूच शकले नाहीत…
” साहेब, तुम्ही माझ्याकडे चार्ज घेऊन दोन दिवस जाऊन या.. ” ते मनापासून म्हणाले.
” नाही नाही देशपांडे… अहो, भलतंच काय? माझ्यापेक्षा तुमचं जाणं जास्त महत्त्वाचं आहे. “
” साहेब, आय कॅन वेट. मला सवय आहे त्याची. शिवाय मी आधी गेलो तर यावेळी कदाचित चारदोन दिवस जास्त रहावं लागेल. तिथं माझ्यासाठी काय वाढून ठेवलं असेल कुणास ठाऊक? त्यामुळे माझं परत येणं कदाचित लांबलंच तर तुम्ही विनाकारण इथे अडकून पडाल. ऐका माझं. त्यापेक्षा तुम्हीच आधी जाऊन या. तेजूला भेटून आलात कीं तुम्हालाही बरं वाटेल. ” देशपांडे मनापासून म्हणाले.
वरून ओबडधोबड, मळकट, निस्तेज दिसणाऱ्या देशपांडेंच्या अंतर्मनात भरून राहिलेल्या माणुसकीने संदीप आतून हलला. पण.. पण देशपांडे करत होते तो त्याग स्वीकारायला त्याचं मन मात्र तयार होईना. तो काही बोलणार एवढ्यात मघाशी देशपांडेंनी वाचून टेबलवर ठेवलेला तो टेलिग्राम फडफडून संदीपचं लक्ष स्वतःकडे वेधून घेऊ लागला. त्या टेलिग्रामच्या कागदातून तेजूचा म्लान केविलवाणा चेहरा संदीपकडे झेप होता. त्या कोवळ्या जीवाच्या आर्त हाकेला त्याला नाही म्हणवेना. भावनातिरेकाने थरथरत त्याने उत्कटतेने देशपांडेंचे हात आपल्या हातात घेऊन हळूच दाबले. या क्षणी मनातल्या भावना नेमकेपणाने व्यक्त करायला दुसरे शब्दच त्याच्याजवळ नव्हते!
… संदीपचं मन घराकडे धाव घेत राहिलं पण एस्. टी तो वेग घेईना. तेजूच्या काळजीचं मणामणाचं ओझं मनावर घेऊन त्याने दारावरची बेल वाजवली तेव्हा रात्र बरीच उलटून गेली होती. तो भुकेला, गलितगात्र, पूर्णत: थकलेला.. पण या कशाचा स्पर्श त्याच्या मनाला होत नव्हताच. मनात काळजी होती फक्त तेजूची!!
” काय झालंय तेजूला? ” दार उघडताच त्याने अधीरतेने विचारलं.
“श्शू.. हळू बोला. आत्ताच झोपलीय ती.. ” त्याच्या हातातली बँग घेत प्रिया म्हणाली. संदीपला बूट काढायचंही भान नव्हतं. तो तसाच बेडरूमकडे झेपावला. तिथे तेजू शांत पहुडली होती.
” आणि हे काय? आई कुठे आहे? ” बाहेर येत त्यांने प्रियाला विचारलं.
” अहो, भाऊजींचं पत्र आलं होतं. जाऊबाईंना बरं नाहीये. चार दिवस जाऊ येते म्हणाल्या. मग रजाच घेतली मी. दिवसभर घरी नुसतं बसून तुमची आठवण छळायला लागली, मग मीच केला टेलिग्राम.. ‘तेजू नीडस् यू.. ‘ म्हणून. खरंतर ‘आय नीड यू व्हेरी मच” प्रिया त्याच्याकडे पाहून सूचक हसली. पण तो..? तो शून्य… विमनस्क…!!
“संदीप, का रे? काय झालं? “
” तू त्यासाठी असा टेलिग्राम केलास? “
टेलिग्राम केला त्या क्षणापासून त्याची आतुरतेने वाट पहाणारी प्रिया संदीपच्या या प्रश्नाने ढासळलीच.
” कां? नको होता करायला? टेलिग्राम ऐवजी खरं कारण लिहिलेलं दोन ओळींचं पत्र पाठवलं असतं तर आला असतात कां असे धावत? तुम्हाला काय माहित गेले पंधरा दिवस आणि पंधरा रात्री मी कशा काढल्यात ते? दिवसभर जीवघेणी धावपळ आणि रात्री… सगळं सांगायलाच हवं का हो तुम्हाला? “
” नाही प्रिया. आय कॅन अंडरस्टॅंड यू. पण तुझ्या या अनवधानाने केलेल्या कृतीचे तीक्ष्ण घाव तुला कल्पनाही करता येणार नाही इतके जीवघेणे आहेत गं… “
” म्हणजे? काय झालंय संदीप? “
“तिथे ब्रॅंचमधे देशपांडे म्हणून हेडकॅशिअर आहेत आमचे. तिकडे गावी त्यांचा एकुलता एक मुलगा अंथरुणाला खिळून आहे प्रिया… त्यांना लगेच निघणं आवश्यक होतं. पण तुझा टेलिग्राम आला आणि तो पाहून ते थांबले. आधी मला जा म्हणाले. केवळ त्यांच्या आग्रहाने आणि तेजूच्या काळजीने मी हा असा धावत येऊ शकलोय. येताना त्यांच्या उपकारांचं ओझं माझ्या मनावर होतं आणि आता परत जाईन तेव्हा त्या ओझ्यापेक्षा कणभर जास्त अपराधीपणाचं ओझं मला बरोबर घेऊन जावं लागणाराय. “
“संदीप, चुकलं माझं. माझ्या भावनांचा आवेग मी झोपवू शकले नव्हते. पण ही चूक पुन्हा होणार नाही. तुम्ही हातपाय धुऊन दोन घास खाऊन घ्या. तोवर मी बेड तयार करते. खूप दमला आहात तुम्ही. थोडा आराम करा. आणि.. ” संदीप तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात राहिला. “आणि एक विनंती करते. रागावू नका प्लीज. पहाटे थोडं लवकरच उठू आपण दोघेही. तेजू जागी होण्यापूर्वीच तुम्ही… निघून जा. “
” नाही प्रिया.. प्रिया, कां म्हणून ही शिक्षा? तू.. तू रागावलीयस माझ्यावर. अशी निष्ठूर नको ना गं होऊस.. “
” नाही अरे. मी रागावलेली नाहीये संदीप. अगदी मनापासून सांगतेय. आणि शिक्षा फक्त तुम्हालाच कशी? तिलाही आहेच कीं. तुम्हाला माहित नाहीये संदीप, तुम्ही प्रथम गेलात तेव्हा ओळीनं चार रात्री तुमची आठवण काढून ती आक्रोश करत रडत झोपायची. खूप त्रास दिलाय तिनं मला आणि आईना. तिला पुन्हा बिथरवू नका प्लीज. अहो विरह आणि वनवास पत्करायचाच जर आहे तर तो फक्त तुम्ही आणि मीच कां म्हणून? त्यातला तेजूचा वाटा तिलाही उचलू दे.. “
संदीपला काही बोलता येईना. ट्रान्सफर ऑर्डर आली तेव्हा संदीपला वाटलं होतं, प्रियाला हे सगळं स्वीकारणं जड जाईल. आज? आज प्रियानं अतिशय निर्धारपूर्वक सर्व कांही मनापासून स्वीकारलं होतं पण.. संदीपलाच ते स्वीकारणं अवघड जात होतं!
त्याचं मन भरून राहिलेला अस्वस्थ अंधार त्याला उध्वस्त करू पहात होता. त्याच अंधारात अंथरुणाला खिळून राहिलेला, देशपांडेंचा कधीही न पाहिलेला तो एकुलता एक मुलगा शेवटचे आचके देत असल्याचा भयंकर भास त्याला झाला… आणि.. तो धडपडत त्या अंधारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला..!
भानावर येऊन त्याने पाहिलं, तेव्हा प्रिया शांतपणे त्याची बॅग भरत होती!!
– समाप्त –
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




