श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “बालिशपणा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
रविवारची निवांत संध्याकाळ, हवेत गारठा होता. मस्त आलं घातलेल्या चहाचा आस्वाद घेत मी खिडकीत उभी होते. सोसायटीतल्या मंदिराजवळ काहीजण गप्पा मारत बसलेले. बाजूला मुलांचा आरडाओरडा चाललेला…
“मार, मार”
“सोडू नकोस. ”
“ए तिकडं नको. इकडे बघ”
“क्या कर रहा है. उडा दे”
“इडियट”
“अक्कल है के नही”
“अबे xxxxx”
“मेलो, मेलो”
“संपलं, फिनिश”
“ए xxx खेळता येत नाही तर येतो कशाला? ”
शाळकरी वयातली मुलं मोबाइलवर गेम खेळत होती. खरं सांगायचं तर त्यांचं बोलणं इतकं भयानक होतं की ते सगळं लिहिणं शक्य नाही. आश्चर्य म्हणजे तिथल्या मोठ्या लोकांना याबद्दल काहीच वाटत नव्हतं किवा जाणीवपूर्वक ते दुर्लक्ष करत होते.
… सध्या हे दृश्य बऱ्याच ठिकाणी दिसतं. तसंही मारधाडीच्या गेम खेळताना भान राहत नाही. सर्रास शिवीगाळ केली जाते त्यात लहान-मोठे सगळेच आले. फोन स्मार्ट झाला पण वापरणाऱ्यांचा बावळटपणा वाढतोय. एवढं मात्र खरं…
पूर्वीचं आणि आत्ताचं ‘बालपण’ याबद्दल विचार डोक्यात असताना तिथंच बाजूला असलेल्या छोट्या मुलीनं लक्ष वेधलं. मान खाली घालून ती हातातला थर्माकोलचा तुकडा कठड्यावर घासत होती. बारीक बारीक भुसा खाली पडत होता. प्रचंड एकाग्रतेनं काम चाललेलं. बाजूला अजून दोन चार थर्माकोलचे तुकडे पडलेले. एक झालं की दुसरं असा उद्योग चाललेला. तल्लीन झालेल्या छोटीला आजूबाजूच्या जगाशी देणं घेणं नव्हतं. गुंग झालेल्या छोटीचं फार कौतुक आणि हेवा वाटला. मोबाइलनं जग व्यापलं असताना छोटीचं ‘बालपण’ अजूनही शिल्लक होतं.
– – त्या तिच्यासारखेच बिनकामी उद्योग मी, तुम्ही, सर्वांनीच केलेत. उदाहरण द्यायचं झालं तर पुस्तकं, पेपरमधल्या फोटोंना दाढी-मिशा काढणं, धूळ बसलेल्या गाडीवर चित्र काढणं, अभ्यास करता करता पेनानं वहीमध्ये गोल गोल काढत राहणं. गोष्ट ऐकून कल्पनेत हरवणं हे सर्व डोळ्यासमोर आलं. त्या रम्य आठवणीत हरवले असताना लेकीची हाक आली.
“ममा एवढं काय बघतेस” सोनूनं विचारलं.
“इकडे ये. गंमत बघ” खेळणाऱ्या मुलांकडे बोट दाखवत मी म्हणाले.
“ईsssss, मोबाइल गेम तर खेळतायेत. सो कॉमन”
“ती बाजूची मुलगी बघ. ” छोटी अजूनही त्याच कामात हरवलेली.
“ए, ती काय करतीये ” सोनू आश्चर्यांनं म्हणाली.
“खेळतीये”
“हे असं”
“भारी ना”
“त्यात काय भारी”
“तुला त्यातली मजा कळणार नाही. ”
“मजा??? .. व्हॉट फन इन टू धिस. काहीही काय? मी असलं काही कधी केलं नाही. ”
“कारण प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायची तुझी सवय. बुद्धिबळ सोडून तर दुसरं काही खेळली नाहीस. लहानपणापासून सोफिस्टीकेटेड. ”
“येस्स. त्यात काहीच चुकीचं नाही. ”
“गप बस. ही कौतुकाची गोष्ट नाहीये. प्रत्येक ठिकाणी लॉजिक लावायचं नसतं. काही गोष्टी आनंदासाठी करायच्या. ’
“व्हॉट डू यू मीन”
“फक्त बालपणीच मनाला वाटेल ते करता येतं. वागता येतं. जबाबदारी नसते की बंधनं नसतात आणि लोक काय म्हणतील याचीही चिंता नसते. व्यवहार या शब्दाबरोबर ओळख व्हायच्या आधीचा सुवर्णकाळ. फक्त एंजॉयमेंट!! ”
“आणि एकदम हॅप्पी!! नो टेंशन, नो वरी. ”
“बरोब्बर, आताच्या मुलांविषयी वाईट वाटतं. फार लवकर मोठी होतायेत. नको ती आणि नको इतकी माहिती सहज मिळत असल्यानं समज वाढतेय आणि निरागसता मात्र कमी होतेय. तसंही अनेक निखळ आनंद मोबाईलच्या राक्षसानं खाऊन टाकलेत. ”
“चांगलं आहे की… नाहीतरी असल्या खेळण्याचा गोष्टींचा पुढच्या लाईफमध्ये उपयोग नाही. ” सोनू.
“बाळा, बालपण फार थोड्या काळासाठी आणि मोठेपण मात्र आयुष्यभर सोबत असते. ”
“ममा, पसंद अपनी अपनी. ती मुलगी जे करतीये. दॅट इज वेस्ट ऑफ टाइम. “
‘बालिशपणा’. ”
“करेक्ट, माय डियर!! हाच ‘बालिशपणा’ आपण विसरलोय. फायदा-तोट्याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे हरवणं दुर्मिळ झालंय. एकाग्रता कमी होऊन बेचैनी वाढलीये. ”
“नो चॉइस!! आजची लाईफस्टाइलच तशीये. ” सोनू
“म्हणूनच सदासर्वकाळ दिखाऊपणाची झूल पांघरून फिरतो. वागणं-बोलणं सगळंच नाटकी. आपसातला संवाद आणि विश्वास कमी झालाय. त्यातही एखादा मोकळं ढाकळं वागणारा, बोलणारा, खळखळून हसणारा भेटला तर ऑकवर्ड वाटतं. स्वतःचे छंद, आवड हेच तर केव्हाच विसरले. माणसांची यंत्र झालीत. ” मी भान हरपून बोलत होते तेव्हा सोनू एकटक पाहत होती.
“असं काय पाहतेस”
“ममा, खूप छान बोलतेयेस. मी यावर विचार करीन. आपण पत्ते खेळायचे”
“हो, चालेल की, काय खेळायचं”
“रमी” सोनू.
“त्यापेक्षा भिकार-सावकार खेळू. ”
“मला येत नाही”
“सोप्पंयं, मी शिकवते. जाम मजा येते. ”
– – मग काय मायलेकीत पत्त्यांचा डाव बेफाम रंगला. हसणं खिदळणं, धमाल चाललेली. तेव्हा आमचा आवाज ऐकून नवरोबा कडाडले… “काय ‘बालिशपणा’ चाललाय”
“अय्या!! खरंच!! , ” मोठ्यानं म्हणत सोनू आणि मी हसलो.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




