श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ संस्कारांचे बीज… (अनुवादित) – भाग – २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

(किशनजी क्षणभर शांत राहिले, मग म्हणाले, “नाही. कारण मी अनेकांना भीतीने मरताना पाहिले आहे आणि अनेकांना श्रद्धेने जगताना. त्यातून मी शिकलो आहे— खरी श्रद्धा घाबरत नाही. ती सन्मानाने उभी राहते, ठाम, भीतीशिवाय. ”) 

इथून पुढे

म्होरक्याने आपला चहा संपवला. बसकडे पाहत. झोपलेली माणसं — वृद्ध, मुले, कुटुंबे.

म्होरक्या बसच्या मागच्या बाजूला गेला. लोक झोपले होते. एक मूल एका टेडी बेअरला बिलगले होते. एका वृद्ध महिलेच्या बोटात जपमाळ होती. कोणीतरी घोरत होते. सामान्य माणसे. त्याच्या गावातील लोकांसारखी, त्याच्या आईसारखी, मावशीसारखी, आजीसारखी.

तो किशनजींकडे परतला. “माझी आजी… ” तो थांबला.

“त्यांचं काय? ” किशनजींनी विचारले.

“ती दरवर्षी याच मार्गाने प्रवास करायची— खाटू, पुष्कर. ती म्हणायची की यामुळेच तिला शांती मिळते. तीन वर्षांपूर्वी तिचे निधन झाले. मी तिला शेवटच्या वेळी घेऊन जाऊ शकलो नाही. मी busy होतो. ” त्याचा आवाज दाटून आला.

किशनजींनी मान डोलावली. “तुम्हाला माहित आहे का, ” ते म्हणाले, “या मार्गाबद्दल मला सर्वात जास्त कशाचा त्रास होतो? चेकपॉइंट्सचा नाही. खराब रस्त्यांचा नाही. पण जेव्हा कोणी म्हणतं— “माझ्या अमुक अमुकला ही यात्रा करायची होती, पण ती होऊ शकली नाही. ”

म्होरक्याने डोळे मिटले.

“या बसमधील प्रत्येक व्यक्ती असा वेळ खर्च करत आहे, जो त्यांना कदाचित नंतर परत मिळणार नाही. ते असे पैसे खर्च करत आहेत, जे कदाचित अन्य काही कामासाठी वापरले जाऊ शकले असते. पण ते या प्रवासावर ते पैसे खर्च करत आहेत. का? कारण आतून काहीतरी त्यांना जाणवत आहे की त्यांनी आत्ता इथेच असायला हवे. ”

त्यांनी डॅशबोर्ड उघडला. एक जुनी, जीर्ण डायरी बाहेर काढली. “बघा, ” ते म्हणाले. “४० वर्षांहून अधिक काळातील प्रवाशांच्या सह्या. हजारो नावे. हजारो कथा. काहीजण आता या दुनियेत नाहीत, पण त्यांची श्रद्धा अजूनही इथे आहे. ”

म्होरक्याने ती डायरी हातात घेतली आणि पाने चाळू लागला. आणि तो थबकला. एक नाव वाचून. “मंजू देवी त्रिवेदी, १६ ऑगस्ट, २००३. खाटू श्याम यात्रा—नातवाच्या आरोग्यासाठी. ”

त्याचे हात थरथरू लागले. “ही… ही तर माझी आजी आहे. ”

किशनजींनी हळूच मान डोलावली. “मला माहित आहे. जेव्हा तू बसमध्ये चढलास तेव्हाच मी तुला ओळखले होते. तुझे डोळे अगदी तुझ्या आजीसारखेच आहेत. ती नेहमी म्हणायची, “माझा नातू एके दिवशी लोकांचे रक्षण करेल. ”

एक क्षणभर शांतता.

म्होरक्याने डायरी बंद केली. “तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे? ” त्याने जड आवाजात विचारले.

“काही नाही, ” किशनजी म्हणाले. “फक्त तू कोण आहेस हे ठरव. लोकांचे रक्षण करणारा मंजू देवीचा नातू की प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली हप्ता गोळा करणारा एक गुंड. ”

म्होरक्या बसमधून खाली उतरला, आपल्या माणसांमध्ये उभा राहिला.

आकाश मंदपणे उजळत होते.

“चला, ” तो म्हणाला, “रस्ता मोकळा करा. बसला जाऊ द्या. ही बस आज जाईल. प्रत्येक वेळी. “

वाहने बाजूला झाली. रस्ता मोकळा झाला. म्होरक्या परत आला.

“धन्यवाद, ” किशनजी म्हणाले, “तुम्हाला नाही, तुमच्या आजीला. तिने तुमच्यावर केलेल्या संस्कारांना. “

बस पुढे सरकली. प्रवासी जागे होत होते पण पहाटे काय झाले होते, हे किशनजींनी कोणाला कधीच सांगितले नाही.

पण पुढच्या शनिवारी, जेव्हा ते त्याच मार्गाने पुन्हा जात होते— ४७ व्या किलोमीटरवर, वाहने तिथे रस्ता अडवून होती. पण यावेळी, जेव्हा बस जवळ आली, ते फक्त बाजूला झाले. कोणताही इशारा नाही. कोणतेही प्रश्न नाहीत. थांबवणे नाही. आणि त्या वाहनांपैकी एकाच्या खिडकीवर, कोणीतरी खाटूश्यामजींचे एक छोटे चित्र चिकटवले होते.

किशनजींच्या ते लक्षात आलं, ते हलकेच हसले. त्यांनी हॉर्न वाजवला आणि बस पुढे काढली.

त्या सकाळच्या सहा महिन्यांनंतर, त्यांच्या घरी, दारात एक पाकीट पडलेलं त्यांना दिसलं. कोणताही पत्ता नाही. पाठवणाऱ्याचे नाव नाही. फक्त हाताने लिहिलेले होते— किशन यादव. आत दोन गोष्टी होत्या. पहिली— एक ५०० रुपयांची नोट, त्यासोबत एक छोटा कागदाचा तुकडा— “बसच्या आणि भक्तांच्या देखभालीच्या निधीसाठी. ” — एक हितचिंतक आणि दुसरी गोष्ट— एक जुना फोटो. त्या फोटोमध्ये, मंजू देवी त्रिवेदी किशनजींच्या बससमोर उभ्या होत्या. वर्ष २००३ होते. त्या हसत होत्या. त्यांच्या मागे, सुमारे १० वर्षांचा एक मुलगा उभा होता, बसकडे पाहत होता.

फोटोच्या मागे, थरथरत्या अक्षरात लिहिलेले होते— “आजीचे म्हणणे खरे होते. तिचा नातू आता खरंच लोकांचं रक्षण करतो. धन्यवाद. ” मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. —मंजू देवीचा नातू”

किशनजींनी तो फोटो आपल्या जुन्या डायरीत ठेवला— अगदी त्याच पानावर जिथे मंजू देवीची सही होती.

नंतर जेव्हा जेव्हा ते तो किलोमीटर ४७ वरून जायचे तेव्हा तेव्हा तिथे, त्या मैलाच्या दगडाशी ते बसचा हॉर्न वाजवायचे.

लोकांनाही ४७ किलोमीटरच्या मैलाच्या दगडाशी घडलेली घटना आता ठाऊक झाली होती.

किशनजी आणखी सात वर्षे त्याच मार्गावरून चालले. मग डोळे आणि हात साथ द्यायला कमी पडू लागल्यावर ते थांबले. त्यांच्या शेवटच्या प्रवासाच्या दिवशी, किलोमीटर ४७ वर, काहीतरी वेगळे होते. तिथे कोणतीही वाहने नव्हती. तिथे फुले होती— शेकडो फुले, रस्त्याच्या कडेला.

आणि एक फलक— “श्रद्धेचे रक्षण करणाऱ्याचे आभार. “

किशनजींनी बस थांबवली. त्यातले एक फूल सोबत घेतले – खाटूश्यामला वाहण्यासाठी.

काळ वहात राहिला. किशनजी राहिले नाहीत. ते खाटूश्यामजींच्या चरणी विलीन झाले.

पण तो मार्ग तसाच आहे. नवीन चालक त्यावर गाडी चालवतात. नवीन यात्रेकरू त्यावरून चालतात.

आणि प्रत्येक वेळी जेव्हा बस ४७ व्या किलोमीटरवरून जाते— तेव्हा चालक तीनदा हॉर्न वाजवतो. यात्रेकरू हात जोडतात. आणि प्रत्येकजण एक मिनिट मौन पाळतो.

त्या चालकासाठी – जो घाबरला नाही.

त्या माणसासाठी – ज्याला आठवले की तो कोण आहे.

आणि त्या आजीसाठी – जिने श्रद्धेचे आणि संस्कारांचे बीज पेरले.

– समाप्त –  

© श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments