श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ जाणीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

विनायक घरी आला तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. माधवी त्याची वाटच बघत होती.

“आज बराच उशीर केलात यायला “

माधवीनं विचारलं

“हो. सध्या मंथ एंड आहे ना! त्यामुळे मिटिंगवर मिटिंग

सुरु आहेत “

“बरं तुम्ही फ्रेश व्हा. तोपर्यंत मी जेवायला वाढते “

तो फ्रेश होऊन येईपर्यंत माधवीनं टेबलवर जेवणाची तयारी घेतली. विनायक खुर्चीवर येऊन बसला. समोर दोनच ताटं पाहून त्यानं आश्चर्याने विचारलं

“दोनच ताटं?  नयना जेवणार नाहीये का? ” 

“अहो ती बाहेर गेलीये. तिची ती साक्षी नावाची मैत्रीण बंगलोरहून आलीये आज. तिला भेटायला गेलीये. दोघी बाहेरच पावभाजी वगैरे खाऊन येणार आहेत “

” साक्षी बंगलोरला असते? जाॅब लागलाय की लग्न झाल्यामुळे? “

“नाही. लग्न नाही झालं तिचं. मागच्या दिड वर्षापासून ती जाॅबला तिथंच आहे “

” किती पॅकेज आहे? “

” सध्या सहा लाखाचं आहे‌. पुढच्या वर्षीपासून नऊ लाख होणार आहे म्हणे “

विनायकनं एक सुस्कारा सोडला

” एकेक करुन नयनाच्या सगळ्या मैत्रीणी जाॅबला लागल्या म्हणायच्या तर? “

माधवीनं मान डोलावली

“आणि आपली बया बसलीये पाच वर्षांपासून घरी. किती अपेक्षा होत्या मला तिच्याकडून. कंप्युटर इंजीनियर झाल्याझाल्या तिला चांगल्या कंपनीत नोकरी लागेल, चांगला पगार मिळेल, चारचौघात अभिमानाने सांगता येईल की माझी मुलगी या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करतेय. तिला एवढं पॅकेज आहे. पण नाही, एकही अपेक्षा पोरीनं पुर्ण केली नाही ” विनायक उद्विग्न होऊन म्हणाला

” जाऊ द्या. अशीही आपल्याला काही तिच्या पैशांची गरज नाहीये “

” पैशाचा इश्यूच नाहीये माधवी. इतकं चांगलं शिक्षण घेऊनही तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग करत नाहीये तर त्या शिक्षणाचा फायदाच काय? मग साधं बीए, बीकॉम केलं असतं तरी चाललं असतं. कशाला तिच्या शिक्षणासाठी आपण इतका पैसा खर्च केला असता?  ” विनायक चिडून म्हणाला

” जाऊ द्या तुम्ही चिडू नका. शांततेने जेवून घ्या. आणि तिलाही काही बोलू नका. उगीच तुमचा बीपी वाढून जाईल “

” वाईट वाटतं गं! लोक विचारतात तेव्हा सांगायलाही लाज वाटते की माझी मुलगी घरीच बसलीये. कसलाच जाॅब करत नाहीये “

” मी परवाच तिला नोकरीबद्दल बोलले तर ती माझ्यावरच खवळली. ‘ तुम्हांला मी जड झाले असेन तर करुन टाका माझं लग्न ‘असं म्हणायला लागली “

” दुसरा पर्यायच काय ठेवलाय तिनं आपल्यासमोर? खरंच यावर्षी करुनच टाकतो तिचं लग्न ” विनायक उद्वेगाने म्हणाला

” नाहीतर काय! घरात बसूनही काय करते ती? सांगितल्याशिवाय कोणतंही काम करत नाही. सदोदित तो मोबाईल घेऊन बसलेली असते. काय करते कुणास ठाऊक! आपण काही बोललो तर रुसून बसते. चारचार दिवस बोलत नाही “

“उद्यापासूनच तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करुया. आताच ती सव्वीस वर्षाची आहे. जास्त उशीर केला तर नंतर लग्न जमणंही कठीण होऊन बसेल. खरंतर आपण अगोदरच तिचं लग्न उरकून टाकायला हवं होतं. उगीच तिला नोकरी लागण्याची

वाट बघत बसलो “

” तिच तर म्हणत होती की ‘नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून ‘आजकालची मुलं म्हणे नोकरी करणारी मुलगीच पसंत करतात’असं तिचंच म्हणणं होतं “

“आता तिचं काहिही ऐकायचं नाही. चांगलं स्थळ आलं की उरकून टाकायचं ” विनायक ठामपणे म्हणाला

दुसऱ्या दिवसापासून खरोखरच त्यानं वेगवेगळ्या शहरातल्या विवाह संस्था, मंडळात नयनाचं नाव नोंदवायला सुरुवात केली. आपल्या नातेवाईक, मित्रांना फोन केले. ‘मुलीचं यंदा कर्तव्य आहे तेव्हा तुमच्या माहितीतलं चांगलं स्थळ सुचवा “अशी त्यांना विनंती केली.

काही दिवसांनी एक चांगलं स्थळ चालून आलं. मुलगा हैदराबादला एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. नऊ

लाखाचं पॅकेज होतं. फोटोवरुन तरी चांगला दिसत होता. विनायकनं त्याची माहिती आणि फोटो नयना आणि माधवीच्या मोबाईलवर पाठवले. पण दोघींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दोन दिवसांनी त्यानंच माधवीला विचारलं.

“मी ते स्थळ पाठवलं होतं ते तुम्ही दोघींनी बघितलं नाही का? “

” बघितलं. नयना नाही म्हणतेय “

” का? सगळं तर चांगलं आहे “

” तिचं नेहमीचंच कारण. नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हणे “

” बोलव तिला ” विनायक संतापून म्हणाला

माधवीनं नयनाला तीनचार हाका मारल्या पण तिनं प्रतिसाद दिला नाही. शेवटी माधवी उठून तिच्या खोलीकडे गेली आणि तिला घेऊन आली.

“काय बाबा? “

“काय करत होतीस? तुझ्या आईनं इतक्या हाका मारल्या. ऐकू नाही आल्या? “विनायकनं रागाने विचारलं

“काही नाही. गाणी ऐकत होते. कानात ईअर फोन होते म्हणून ऐकू आलं नाही “

” बरं. मी ते स्थळ पाठवलं होतं, त्याला तू नाही म्हणतेय म्हणे “

” हो. मी मागेही तुम्हांला सांगितलं होतं की मला नोकरी लागल्याशिवाय लग्नच करायचं नाही म्हणून “

“मला एक सांग. तू इथे नोकरी करुन काय उपयोग? मुलगा जर दुसऱ्या शहरात असेल तर तुला इथली नोकरी सोडावीच लागणार ना? “

” हो बरोबर. पण आजकालच्या मुलांनाच नोकरी करणारी मुलगी हवी असते. नोकरी करणाऱ्या मुली स्मार्ट, हुशार आणि जगासोबत चालणाऱ्या असतात असं त्यांना वाटतं. अशा मुलींना जास्त पॅकेजेसची मुलं मिळतात “

” पण या मुलाची तर मुलगी नोकरी करणारीच हवी अशी काही अट नाहिये “

” हो. पण मग त्याला पॅकेजही तर कमीच आहे “

“नऊ लाखाचं पॅकेज कमी आहे? “विनायकनं आश्चर्याने विचारलं “तुला माहित नसेल बेटा की मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा मला फक्त तेराशे रुपये पगार होता. हातात फक्त नऊशे-साडेनऊशे रुपये पडायचे. आमचं लग्न झालं तेव्हाही मला फक्त साडेतीन हजार पगार होता. तुझी आई श्रीमंत घरातली होती तरीसुद्धा तिच्या वडिलांनी फक्त माझी सरकारी नोकरी आणि आमचं घराणं पाहून आमचं लग्न लावून दिलं. आणि नंतरही आम्हांला कधी पैशांची चणचण भासली नाही. आज तीस वर्षाच्या नोकरीनंतरही माझं पॅकेज सोळाच लाख आहे. त्यामानाने या मुलाचं पॅकेज सुरुवातीलाच एकदम छान आहे. आणि ते पुढेही वाढू शकतं “

” तुमचा काळ वेगळा होता बाबा. आता महिन्याला एक लाखही पुरत नाहीत “

” तुम्ही स्वतःवर कंट्रोल नाही ठेवला तर महिन्याला पाच लाखही पुरणार नाहीत. व्यवस्थित मॅनेज केलं तर तीसचाळीस हजारातही महिना आरामात पार पडतो. तुझ्या दिलीपकाकाचंच उदाहरण घे. फक्त चाळीस हजारात व्यवस्थित घर चाललंय. मुलं महागड्या काॅलेजमध्ये शिकताहेत. खाऊनपिऊन सुखी आहेत. कधी पैसा पुरत नसल्याची तक्रार नसते. बरं जाऊ दे तुला जर नोकरीच करायची होती तर तू आतापर्यत काय केलंस? पाच वर्षं झालीत तुला इंजीनियर होऊन. तुझ्या सगळ्या मैत्रिणी नोकरीला लागल्यात म्हणे. मग तुलाच का नोकरी लागत नाहिये? “

नयनाचा चेहरा पडला. हळू आवाजात ती म्हणाली

” करतेय मी प्रयत्न पण कुठे जागाच निघत नाहीये त. आणि बाबा मी दोनदा केलीये नोकरी. अगदीच काही घरात बसून नव्हते. “

“बरोबर. पण ती किती महिने केलीस? त्या सुप्रीम इंडस्ट्रीज मध्ये तीन महिने आणि सायबर सोल्यूशन्समध्ये दोन महिने. खरं ना? “

” मग काय करणार? तिथं एक तर पगार कमी आणि हॅरॅसमेंटच इतकी होती की एकेक दिवस काढणं मला मुश्कील झालं होतं “

” बेटा नोकरी म्हंटलं की तिथं थोडीफार हॅरॅसमेंट असणारच. माझंच बघ. सरकारी नोकरी असूनही माझी ऑफिसमधून यायची वेळ नक्की नसते. बारा बारा तेरातेरा तास ड्युटी होऊन जाते. कधीकधी रविवारी, सुटीच्या दिवशीही ऑफिसला जावं लागतं. सततच्या मिटिंग्स्, काॅन्फरन्सने जीव वैतागून जातो. वरुन सिनीयर्सच्या शिव्या खाव्या लागतात त्या वेगळ्या च. सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात असंच असतं कारण सगळ्यांवरच प्रेशर असतं. मलाही बऱ्याच वेळा वाटतं की सोडून द्यावी नोकरी. मस्त आराम करावा पण मी तसं करु शकत नाही ” विनायक तिला समजावत म्हणाला

” तुमची गोष्ट वेगळी आहे बाबा. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. तुम्हांला नोकरी सोडून कसं चालेल? आणि माझं चालू आहे नोकरी बघणं. नोकरी लागली की बघा मला मोठमोठ्या पॅकेजेसच्या मुलांची स्थळ चालून येतील “

” फक्त पॅकेजच महत्वाचं असतं का बेटा? मुलाचं घराणं, त्यातली माणसं, मुलावरचे संस्कार हे तुला महत्वाचे वाटत नाही का? आणि फार श्रीमंत घर कधीच नको. तिथे बऱ्याचदा बायकांना बरोबरीने वागवलं जात नाही. त्यांच्या मताला किंमत दिली जात नाही “

” असेलही तसं. पण आजकालच्या मुलींना हँडसम आणि श्रीमंत मुलगाच नवरा म्हणून हवा असतो “

” चुकीचं आहे ते. बरं जाऊ दे. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहिये. महिनाभर आम्ही थांबतो. तोपर्यंत तुझ्या नोकरीचं जमलं तर ठिक नाहीतर चांगलं स्थळ आलं तर तुला लग्न करावंच लागेल “

” बाबा एका महिन्यात मला कशी नोकरी लागेल? एक वर्ष तरी थांबा “नयना काकुळतीने म्हणाली

” नाही. तुझ्या नोकरीची वाट बघताबघता पाच वर्षं निघून गेली आहेत. जास्त उशीर केला तर तू थोराड दिसायला लागशील. आणि मग थोराड दिसणाऱ्या मुलाशीच तुला लग्न करावं लागेल “

” मला कुणी समजूनच घेत नाही ” नयना संतापून रडायला लागली “ती आई तशीच आणि तुम्हीही तसेच

. सारखे मागे लागतात. मनासारखं काही करुच देत नाहीत “

रागारागाने ती उठली आणि तिच्या रुमकडे निघून गेली

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9209763049

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted