श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “आईच्या हातचं…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

माझ्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी एक पाकीट हातात ठेवत बाबा म्हणाले “निवांत झाल्यावर हे बघ. तुझ्यासाठी स्पेशल गिफ्टयं. ” दिवसभरातल्या गडबडीत पाकीटाविषयी विसरून गेले. रात्री झोपायच्या तयारीत असताना एकदम आठवलं. उत्सुकतेपोटी घाईघाईत पाकीट फोडलं तर त्यात एक पोस्टकार्ड होतं. लग्नाच्या आधी कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहत होते तेव्हा आईनं पाठवलेलं पत्र होतं.

“प्रिय प्रिय सोनी..

अनेक अनेक आशीर्वाद!!

उद्या तुझा पंचविसावा वाढदिवस त्यानिमित्तानं आभाळभरून शुभेच्छा आणि थोडं मनातलं सांगावसं वाटलं म्हणून हे पत्र. तू माझ्यासाठी काय आहेस हे शब्दात सांगता येणार नाही. तुझ्यामुळे जगणं सुंदर झालं. तू आलीस अन माझं अवघं विश्व व्यापून टाकलस.

तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा सर्वोच्च आनंदाचा होता आणि कायमच राहील.

बघता बघता काळ चटकन सरला. तू मोठी झालीस. खूप शिकलीस. नोकरी मिळवून कमावतीसुद्धा झालीस. खूप छान वाटतयं आणि आता दोन महिन्यांनी तुझं लग्न…

बापरे!!

अजूनही खरं वाटत नाही. कालपरवा पर्यंत धडपडत पाउलं टाकणारी माझी छोटी बाहुली आता चक्क बोहल्यावर चढणार. तुला पसंतीचा, हवा तसा जोडीदार मिळाला. याचं मोठं समाधान आहे.

आता या क्षणी डोळ्यात आनंदाश्रू आहेत त्याचवेळस तू दुरावणार म्हणून हुरहूरही वाटतेयं. मुलीच्या आईला या अवघड प्रसंगाला सामोरं जावचं लागतं. असो…

तू हुशार आहेस, हिकमती, हिमती आहेस पण खूप घाई करतेस आणि आता राग कंट्रोल करायला शिक. आई ऐकून घेते म्हणून सासू ऐकलच असं नाही. नवरोबा तर नाहीच नाही. तेव्हा एकदम एक्साईट किवा इमोशनल होणं आता कमी कर. बाकी तू घरी आल्यावर बोलूच.

पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!!

आई..

पंचवीस वर्षांपूर्वीचं आईचं पत्र. पुन्हा पुन्हा वाचलं. क्षणभर वाटलं की आई माझ्यासमोर बसून बोलतेय. शब्दा शब्दात असलेला आपलेपणा, काळजी थेट काळजाला भिडलं. खूप भरून आलं. आईला कडकडून मिठी मारावीशी वाटली पण शक्य नव्हत. तिला जाऊन पंधरा वर्ष झाली. आईची खूप आठवण आली. ती आत्ता सोबत असायला हवी असं खूप आतून वाटलं आहे. हातातल्या पत्राकडं एकटक बघताना लक्षात आल की माझं अक्षरही बरचसं आईसारखचं आहे. गंमत वाटली. त्या पत्रानं आठवणींची एकेक फोल्डर पटापट उघडली. मोबाइलमधला आईच्या फोटोकडे पाहताना डोळे कधी वहायला लागले कळलंच नाही.

एका साधंसं पत्र पण त्यानं दिवस माझा अविस्मरणीय केला. आठवणीतली आई पत्ररूपानं माझ्यासोबत होती हे फार मोलाचं होतं. पूर्वी मोबाइल, ईमेल, सोशल मीडिया वगैरे नव्हतं हे एका दृष्टीने चांगलंच होतं. पत्राद्वारेच विचारल्या जाणाऱ्या ख्याली खुशालीचा आपलेपणा टाइप केलेलं वाचताना जाणवत नाही. एवढं मात्र खरं…

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted