सौ.अंजोर चाफेकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “वेगळ्या वाटेवरचा डाॅक्टर” – मूळ इंग्लिश पुस्तक – ‘Band-Aid for a Broken Leg’ – लेखक : डेमियन ब्राऊन मराठी अनुवाद : सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆
पुस्तक : वेगळ्या वाटेवरचा डाॅक्टर
मूळ इंग्रजी पुस्तक : “ Band-Aid for a broken leg “
मूळ लेखक : डॅमियन ब्राऊन
अनुवादिका : मंजुषा मुळे
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
किंमत : ₹५९५ /-
पृष्ठे : ४६१
सौ. मंजुषा मुळे
मंजुषाताईंचे हे पुस्तक वाचायला घेतले आणि आफ्रिकन लोकांची गरिबी, त्यांच्यावर सतत बेतणारे जीवघेणे प्रसंग वाचून अंगावर काटा आला. त्या सर्व आव्हानांना धैर्याने तोंड देणारा, कठिण परिस्थितीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणारा, त्यांच्यासाठी अव्याहत झटणारा हा ‘ वेगळ्या वाटेवरचा डाॅक्टर ‘.. त्याचे तिथले आव्हानांनी भरलेले जीवन या पुस्तकात उलगडत जाते. त्याचा धीटपणा, त्याची भावविवशता, त्याच्या आयुष्यातील हृदयद्रावक प्रसंग, त्याचवेळी त्याला मिळणारे तिथल्या लोकांचे भरभरून प्रेम आणि त्याच्यातील असामान्यत्व याची प्रकर्षाने जाणीव होते व मन नतमस्तक होते.
हे पुस्तक म्हणजे लेखकाचे आत्मवृत्त आहे. यात वर्णन केलेले सगळे प्रसंग लेखकाने प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत. यात एकूण २२ प्रकरणे आहेत.
दक्षिण आफ्रिकेतल्या पोर्तुगीजांच्या वसाहती उठल्यानंतर, त्यासाठी संघर्ष करणाऱ्या दोन प्रमुख गटांमध्येच सत्ता स्थापनेसाठी मोठाच संघर्ष सुरू झाला होता. हे यादवी युद्ध तब्बल वीस वर्षं सुरू होतं. अंगोला या देशात कमालीचा विध्वंस झाला होता. लोकांना दैनंदिन आयुष्यही एक संकटच वाटावे अशी परिस्थिती होती. अशावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या एका समाजसेवी संस्थेतर्फे मानवतावादी दृष्टिकोनातून बरंच मदतकार्य सुरू केलं गेलं होतं.
लेखक डॅमियन ब्राऊन हा नुकतीच पदवी घेतलेला एक ऑस्ट्रेलियन डाॅक्टर, आफ्रिकेतील युद्धात विध्वंस झालेल्या अंगोला देशातील खेड्यात या समाजसेवी संस्थेतर्फे मानवतावादी दृष्टिकोनातून येतो. विस्फारलेल्या निष्पाप डोळ्यांनी बघणारी, अन्न भरविण्यासाठी गालांना रबरी नळ्या चिटकवलेली, जीवघेण्या थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगाभोवती वर्तमानपत्र गुंडाळून एखाद्या पुलाखालच्या कोपऱ्यात रात्रभर कुडकुडत बसणारी उदासवाणी मुले बघतो. सर्वत्र अतीव गरीबीच गरीबी. ‘ मी कसा या लोकांशी जुळवून घेऊ? एकटेपणाने कसा जगू? इथल्या एकमेव हाॅस्पिटलची जबाबदारी एकटा कशी सांभाळू?’ या संभ्रमात तो असतो.
इथे वीजपुरवठा नाही. पाण्याची सोय नाही. दूरध्वनीची सोय नाही. लोकांच्या आरोग्याची खबरदारी नाही.
शाळेला छप्पर नाही. मूलभूत गरजा सुद्धा पुऱ्या होत नाहीत. सगळीकडे अजूनही युद्धसदृश वातावरणच आहे… जागोजागी पेरलेले सुरुंगही अजून तसेच आहेत.. आणि या परिस्थितीत लेखकाला जे अनेक भयानक अनुभव येतात, त्यांचं प्रत्यक्षदर्शी वर्णन त्यांनी अतिशय परिणामकारकपणे या पुस्तकात केले आहे.
अशा वातावरणातही एक जोडपे आणि त्यांचे नातेवाईक लग्नात मनापासून आनंदाने नाचतात. त्यालाही नाचायला लावतात व आनंदात सहभागी करून घेतात… तिथे गेल्या गेल्या त्याला आश्चर्याचा धक्का देणारा हा पहिला प्रसंग. या आशावादामुळे त्याला जरा वेळ उभारी वाटते, आणि या लोकांशी संवाद साधायचा असेल तर पोर्तुगीज भाषा शिकायचा संकल्प तो करतो.
एका रुग्णाच्या बाबतीत हाॅस्पिटलमधला स्थानिक कर्मचारी राॅबर्टो त्याला धमकावतो,
“ईसाबेलावर काहीच उपचार करता येणार नाहीत असं कसं म्हणता तुम्ही? शस्त्रक्रिया केली नाही तर ती नक्कीच मरेल. केल्यावरही ती मरू शकेल. पण म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत? अहो नवे डाॅक्टर, तुम्हाला आमच्याबद्दल, आमच्या औषधांबद्दल काहीच माहिती नाही. आमची भाषाही तुम्हाला येत नाही. “
आणि लेखक थिजल्यासारखा संभ्रमात उभा राहतो.
एकदा एक सैनिक हातावर पडला म्हणून दवाखान्यात येतो..
“ कसं मोडलं हाड? ” असं विचारल्यावर तो सैनिक विचारतो, “ म्हणजे मोडलंय का ते?” – इतकं अज्ञान.
हाड मोडले होते यात शंकाच नव्हती. उपचारापूर्वी निदानाची खात्री करून घ्यायची ही लेखकाची सहजप्रवृत्ती. म्हणून तो इ मेल वरून युरोपातील सर्जनांना विचारीत असे, तेही त्याला आनंदाने उत्तरे पाठवीत. पण इथे औषधे नाहीत. पर्यायी औषधेही नाहीत. साधनसामग्रीही नाही. आता पुन्हा कुठचे संकट उभे ठाकेल, कुठले अरिष्ट ओढवेल याची सगळ्यांनाच सतत भीती. रोजची ही भीतीची भावना लेखकाला सतत ग्रासून टाकत असते.
अशा परिस्थितीत तो एकदा प्रेयसीला फोन करतो. ती स्पष्टपणे त्याला सांगते.. “मी तुला कोणताही आधार देऊ शकत नाही. तुला तिकडे जायचे होतं म्हणून तू मला सोडून गेलास. ” तो हतबल होतो, पण निग्रहाने काम चालूच ठेवतो… हा त्याचा निग्रह खरोखरच असामान्य म्हणावा असाच.
एकदा एका स्रीचे पोटाचे ऑपरेशन करायचे असते. भूल देण्यासाठी एकच औषध असते.. केटॅमाईन.
जे खरे तर किरकोळ शस्त्रक्रियांसाठी वेदनाशामक म्हणून वापरतात. लेखक राॅबर्टोला विचारतो,
“ निर्जंतुकरणासाठी साधन कुठे आहे?”.. त्यावेळी राॅबर्टो पेटत्या कोळशांवर ठेवलेला प्रेशर कुकर दाखवतो.. लेखकाला अस्वस्थपणामुळे घाम सुटतो. त्याही परिस्थितीत तो अपेंडिक्सचे ऑपरेशन करतो.
राॅबर्टो त्याला म्हणतो, “तुम्ही योग्य तेच केले नवे डाक्टर “
लेखक म्हणतो, “जे घडलं, जे मी पाहिलं, त्यामुळे अजूनही मला धडधडते आहे. “
परंतु या अशा परिस्थितीत सुद्धा विसाव्याचे क्षण लेखक अनुभवतो. संध्याकाळचे नदीवर फिरायला जाणे,
सूर्यास्त बघणे आणि चर्चमधून पार्श्व संगीतासारखे, वाद्याच्या साथीशिवाय गायले जाणारे पोर्तुगीज भाषेतले ते सुंदर सूर ऐकणे.
कितीही मनाला रमविण्याचा प्रयत्न केला तरी अंथरूणावर पडल्यावर लेखकाला झोप येत नसते.. ‘ आपण इथे जे सेवाधर्मी काम करतो त्याने इथल्या परिस्थितीत खरंच काही फरक पडतोय का ‘ असे विचार मनाला बोचतात. इथे आलेले रुग्ण त्याच्या डोळ्यासमोर येतात व तो अस्वस्थ होतो. गोंधळून जातो.
…. मेंदूला आलेल्या सुजेमुळे होणारा असह्य दाह शांतपणे सहन करणारा किड् जे, प्रचंड भाजलेला जोस, मलेरियाचे दोन तीन हजार पेशंटस्… मनाला वैफल्य आणणारं, अतिशय करुणाजनक तरीही प्रेरणादायक आणि त्याच वेळी भ्रमनिरास करणारं असं हे जगणं.
एका स्रीचे गर्भाशय फाटते, प्रचंड रक्तस्राव होत असताना गर्भाशयातून बाळ बाहेर येते. त्या स्त्रीला तो वाचवतो. स्त्रीचे नातलग आनंदाने गाणी म्हणायला सुरवात करतात आणि लेखक मात्र स्वतःशी म्हणतो, “माझे अश्रू आवरत नाहीत. हुंदके येतात मला. मनात दाटलेली निराशा, वैफल्याची भावना अशी बाहेर पडते आहे…. आणि हे गाताहेत.. “
असे कितीतरी चित्तथरारक प्रसंग या पुस्तकात चितारले आहेत.
माविंगामधल्या मोझाम्बिक लोकांबद्दल तो म्हणतो, “कुठलीच निराशा नाही, खिन्नता नाही, उद्वेग नाही.
कसंतरी तग धरून जिवंत रहायचं एवढेच काम. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, अर्धा पेला भरलेला आहे असाच. सध्या इथे युद्ध चालू नाही हाच दिलासा. ” त्यांच्या मनाचा खंबीरपणा आणि येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची शांत जिद्द पाहून लेखकाचे मन हेलावून जाते.
रात्री हाॅस्पिटलचे काम आटपून तो जवळच्या एका झोपडीत येत असतो. – तीच त्याची राहायची खोली. गादीवर पडतो. झोपडीत भरून राहिलेला असह्य वास. धुळीने माखलेले, गचाळ, माशा, किडे, मधमाश्या यांनी व्यापून टाकलेले हाॅस्पिटलचे आवार.
मनात रोज विचार येतात, ” एक स्वयंसेवक म्हणून मी इथे आलो. पण आयुष्यातील चैतन्य हरवलंय. भविष्यात आपण एकटे पडणार आहोत. भौतिक सुखसमाधान तर दूरच. कुठल्याच चांगल्या, आनंददायक गोष्टी अनुभवायला येत नाहीत. झोपायचा प्रयत्न असफल करणारे हे विचार. जाणीवपूर्णक अशा ठिकाणी येणं याला स्वार्थत्याग म्हणायचं का? पण मी हे काम स्वीकारले आहे, निरपेक्षपणे, अगदी मनापासून. “
सुदानमधे सतत गोळीबाराला बळी पडणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना, सतत भीतीच्या छायेत वावरताना मन निराश होतं… “ या सगळ्याचा शेवट काय? आपण स्वतःसाठीच निरुपयोगी होऊन जाऊ का ? मला नेमकी कशाची भीती वाटते आहे?माझ्या हाताला झालेल्या जखमेची?धोकादायक विमान प्रवासाची? मदतकार्यासाठी कुठे जाण्याची माझी इच्छा आता मावळत चालली आहे. हे असले विचार यापूर्वी माझ्या मनात कधीच आले नव्हते. मी खूप थकून गेलोय. यापुढे मी हे काम करू शकणार नाही “
…. आणि मनाच्या अशा दोलायमान अवस्थेत तो ऑस्ट्रेलियाला परत जाण्याचा निर्णय घेतो. त्याच्या या निर्णयावर सिडनीतल्या ऑफीसमधे प्रतिक्रिया उमटते की त्याने अनुभवी मानसोपचार तज्ज्ञाला भेटावे.
परंतु घरी आल्यावर त्याला पुन्हा मनापासून वाटायला लागतं की तो पुन्हा अशा स्वयंसेवी कामासाठी नव्या ठिकाणी हजर होईल. आणि तो पुन्हा दुसऱ्या शहरातल्या अशाच सेवाभावी हॉस्पिटलमध्ये स्वयंसेवक म्हणून रुजू होतो.
या पुस्तकातले सर्व प्रसंग अंगावर काटा आणणारे आहेत. परंतु कुठेही अतिशयोक्ती नाही. अवास्तव चित्रण नाही. लेखकाने मनातले विचार अगदी प्रांजळपणे लिहिले आहेत. आणि मंजुषाताईंनी अनुवाद करताना हे सगळे विदारक प्रसंग आणि त्यावेळचे लेखकाच्या मनातले भाव अगदी अचूक टिपले आहेत. त्यामुळेच हे पुस्तक नक्कीच हृदयाला भिडते.
लेखक डॉ. डॅमियन ब्राऊनचे हे विलक्षण अनुभव मराठीत अनुवाद केल्यामुळे आपल्या कल्पनेपलिकडच्या एका वेगळ्याच जगाची अविस्मरणीय आणि संवेदनक्षम माणसाला विचार करायला भाग पाडणारी सफर आपल्याला घडते. मेडिसिन्स सान्स फ्राॅन्टिअर्स या सेवाभावी संस्थेचा परिचय होतो. कारण डाॅ. डॅमियन ब्राऊन हे या संस्थेतर्फे स्वयंसेवक म्हणून अफ्रिकेत गेलेले असतात. आणि हे पुस्तक म्हणजे तिथे त्यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या हृदयद्रावक अनुभवांचे कथन आहे…
मंजुषाताईंच्या या अनुवादामुळे वैद्यकीय क्षेत्रातील मानवहितवादी गट व आयुष्य पणाला लावून काम करणारे डॉ. ब्राऊन यांच्यासारखे देवदूत यांचे दर्शन होते.
– – हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचले तर पाहिजेच, पण हे पुस्तक आत्मपरीक्षण करायला लावते. आपापल्या घरात सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या सर्वांनाच मनन, चिंतन करायला भाग पाडते.
परीक्षण सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







मंजूषा ताईंच्या खूप छान पुस्तकाचा परिचय करून दिलात.नवीन व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.