सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ आक्रोश आसवांचा (कविता-संग्रह)… कवी : श्री विष्णू सोळंके – परिचय : प्रा. डॉ. बालाजी लाहोरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पुस्तक : आक्रोश आसवांचा (कविता-संग्रह)

कवी : श्री विष्णू सोळंके

परिचय : प्रा. डॉ. बालाजी लाहोरकर

श्री विष्णू सोळंके

सोळंके यांच्या कवितेचा आत्मा हा रस्त्यावरचा सामान्य माणूस आहे, गरिबी, दहशत, मृत्यू, उपेक्षा अनुभवता येते. त्यांनी आपल्या साहित्यात सजीव अनुभवांना शब्दबद्ध करतांना सामाजिक बांधिलकीचे भानही सदैव जागृत ठेवले आहे.

आक्रोश आसवांचा या कविता संग्रह यामधील कविता या १९९७ ते २००८या कालावधीत लिहिल्या गेलेल्या आहेत. त्या त्यांच्या स्वतःच्या भाव जीवनातील सुख दुःखाच्या वास्तव अनुभवांवर आधारलेल्या आहेत. या कवितांचा उत्कटपणा, आशयघनताआणि मनस्विता वाचकाला गहिवरून टाकते. हे मनोगत म्हणजे कविच्या मनोभूमीतील एक आत्मीय आत्मपर संवाद आहे. जिथे कविता ही केवळ लेखनाची प्रकिया नसुन, जीवनातील प्रत्येक संघर्षाला तोंड देण्याची एक सजिव आणि स्नेहवर्धक साथ आहे.

या कविता संग्रह याला दिलेल्या प्रस्तावनेत जेष्ठ समिक्षक व साहित्यिक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी विष्णू सोळंके यांचा काव्य प्रवास हा अंतर्मुखतेचा, आत्मभानाचा आणि प्रामाणिक अभिव्यक्तीचा प्रवास असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, कविता ही अनुभवातून साकार होते; केवळ विचाराने नव्हे, तर अनुभवाच्या तीव्रतेतून जन्म घेते. ही तीव्रता जेव्हा मनात झिरपत राहते, तेव्हाच खरी कविता घडते, असे ते स्पष्ट करतात.

विष्णू सोळंके यांनी आपल्या कवितेला कोणत्याही शैलीतील चौकटीत बंदिस्त केले नाही. त्यानी मुक्तपणे, पण या मनःपूर्वक आणि आत्म्याशी इमान राखून कविता लिहिल्या आहेत. या कवितांमध्ये सामाजिक जाणीव, माणूसकीचा शोध, अंतर्मुखता, आशावाद आणि सौंदर्यदृष्टी यांचे सुरेख संमेलन आढळते. जोशी यांचे मते ही कविता केवळ वैयक्तिक भाव प्रदर्शन नाही, तर ती सामूहिक वेदनांचे प्रतिबिंब आहे. मानवीअध:पतन, विसंवेदना आणि विस्मृती यांचे ते प्रातिनिधिक दर्शन आहे. या कवितांत एक जागृत सामाजिक भान आहे आणि चिंतनशीलता आहे. त्याच बरोबर या कवितांमध्ये सौंदर्य, करुणा, आणि श्रमशीलतेची उदात्त भावनाही प्रकर्षाने जाणवते. कवीच्या आत्मिक सामर्थ्याला पूर्ण न्याय देण्यासाठी, त्यांनी ही वाटचाल अधिक सखोल आणि प्रगल्भ अभिव्यक्तीकडे करावी, अशी शुभेच्छा जोशी यांनी दिल्या आहेत. या कविता संग्रहातील विविध कविता स्वतः मध्ये एक स्वतंत्र अर्थसंपन्नता बाळगून आहेत.

जमते का ते बघतो, ही कविता मनाच्या सुक्ष्म भाव स्थितीचा सुरेल प्रवास उभा करते. जमते का ते बघतो, ही पुनरुक्ती एकाच वेळी प्रश्नार्थक आणि आर्त भासवते. नात्यातील अव्यक्त ओलावा, स्वप्नातील संवाद, स्मृती चं भिजणं आणि सुखाच्या शोधातील एकाकी वाटचाल हे सगळं मनाला हलवून जाते. कवितेचा लहेजा अंत्यंत कोमल आणि भावस्पर्शी आणि गुढ आहे. शेवटच्या ओळीतून एक आशावादी सूर ही प्रकटतो.

या नभाला वेचतो मी, ही कविता संवेदनशील मनाच्या आत्मकथनासारखी वाटते. कवी आपले दुःख, निशब्द आक्रोश, मूक प्रतिकार या गोष्टी प्रभावी शब्द रचनेतून मांडतो. शांत शहरात दंगलीशी खेळतो, ही ओळ विशेष अर्थवाही असून समाजातील विरोधाभास दर्शवते.

सांजवेळी आठवांना, ही कविता आठवणींच्या नाजूक धाग्यांनी विणलेली आहे. डायरीची मूक पाने, गंध मागणे, लाजणा- या फुलांना न्याहाळणे अशा प्रतिमा कवितेला कोमल आणि नाजूक स्पर्श देतात.

जीवना, ही कविता दुःखाच्या सखोल जाणिवेचा आर्त स्वर आहे. यातून जीवनातील शाश्वत वेदना आणि अस्तित्ववादी जाणीव दिसून येते. सावलीने या छळावे, ही कविता काळाच्या विषादपुर्ण वास्तवादावर अचूक आणि ठाशीव भाष्य करते. फुलांचे गाव काट्यापाशी बोचते, माणूसकीच्या रक्ताने रस्ते भरतात, ही रुपके समाजाच्या अंध: पतनाचे भीषण चित्र उभे करतात.

पावसाने असे… ही कविता प्रतीक्षेतील वेदना, प्रेमभंग, आणि एकाकी रिकामे पण यांचे शब्द रुप आहे.

पावलांनी असे दूर नेऊ नये… ही शैवटची ओळ हृदयस्पर्शी आणि करुणेने भारलेली आहे.

निळे चांदणे, ही गझल प्रेमाच्या नाजूक आणि कोवळ्या भावनांचे ललित चित्रण करते.

सावलीने या छळावे, पावसाने असे, निळे चांदणे हे, हाय लाजरी तुझ्या सारखी, अशा विविध कविता समाजातील वास्तव, वैयक्तिक व्यथा, प्रेमातील नजाकत, आणि जीवनातील विसंगती यांचे सर्जनशील चित्रण करतात.

प्रतीकांची सुसंगत निवड, भाषेतील लयबद्धता, सौंदर्य दृष्टी, अंतर्मुख अभिव्यक्ती आणि भावनांचा आर्त स्वर हे सारे या कवितांना एक नितांत अनुभवात्मक वाङ्मयीन उंची देतात. पावसासारख्या साध्या नैसर्गिक घटनेलाही कवी नवीन अर्थ देतो, तर प्रणयाचे सूचक स्पर्शही तो सौंदर्याने रंगवतो.

विष्णू सोळंके यांच्या कविता केवळ वाचाव्यात म्हणून नाही तर त्या अनुभवाव्यात, अंतर्मनात झिरपाव्यात,….. मनाच्या एखाद्या कोपऱ्यात शांतपणे बसून त्या आपल्याला बोलावत राहतात…

परिचय : प्राचार्य डॉ बालाजी लाहोरकर

मो ९८८१३६१४६९

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

मंजूषा ताई पुस्तक परिचयावर छान लेख प्रस्तुत केला आहे तुम्ही.