श्री प्रसाद साळुंखे
पुस्तकावर बोलू काही
☆ “निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू” – लेखिका : सुश्री शोभा भालेकर ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆
पुस्तक : निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरु (कथासंग्रह)
लेखिका : शोभा भालेकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
काही पुस्तकांची नावंच इतकी सुंदर असतात की कुठलाही संवेदनशील वाचक त्या पुस्तकाकडे आकर्षित होतोच. असंच रोहन प्रकाशनच्या ‘निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरु’ या शोभा भालेकर यांच्या कथासंग्रहाबाबत घडलं.
या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. प्रत्येक कथेचा अवकाश हा भिन्न आहे. म्हणजे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बाबतीतलं वैविध्य आपल्याला जाणवतं. या वेगवेगळ्या समाजातल्या कथा तितक्याच ताकदीने हाताळायला अफाट निरिक्षण शक्ती लागते, याबाबत लेखिकेचं खरंच कौतुक. भाषाशैलीही सोपी पण दर्जेदार आहे, त्यामुळे कथेच्या भावविश्वाशी आपण क्षणात तादात्म्य पावतो.
‘ अस्तित्व ‘ नावाचीच पहिलीच कोकणातल्या ग्रामीण भागात घडणारी कथा हा कथासंग्रह वाचण्याचा प्रवास रंजक असणार याची जाणीव करून देते. ही कथा कोकणात प्रत्येक वाडीत किमान एक दिसणाऱ्या दिशाहीन, सांगकाम्या, व्यसनी, व्यवहार आणि संवेदनाशून्य तरुणाचं आयुष्य दाखवते.
‘ अंग झिम्माड झालं ‘ या कथेत संसारी जबाबदारीत पिचलेल्या एक फरफटलेलं आयुष्य जगणाऱ्या नायिकेचा प्रवास तिने घेतलेल्या व्यक्तिगत निर्णयांना फार आदर्शवादाच्या सोयीस्कर फुटपट्या लावून जज न करता अनुभवतो. तिचं हे परिवर्तन कमाल आहे.
असाच नायिकेचा कायापालट पुढे ‘ चक्रव्यूह ‘ या कथेतही पहायला मिळतो. पण ‘ चक्रव्यूह ‘ या कथेतल्या नायिकेचा तरुण दिसण्याच्या अट्टाहासाला, किंवा त्या अनुषंगाने स्वतःच्या केलेल्या बेढब उपहासाला आपण निश्चित वेगळ्या चष्म्यातून पाहतो, जज करतो. म्हणजे एक स्त्री लेखिका असूनही ब्लॅक, व्हाईट, आणि ग्रे यात फरक करण्याची लेखिकेची वैचारिक स्पष्टता आपल्याला एकाच कथासंग्रहात पडताळता येते.
‘ या पंखावरती मी नभ पांघरती ‘ ही कथाही पंखांना स्वच्छंद विहारायचं बळ देणारी आहे. सुखासीन आयुष्यात लढायचं की नियतीपुढे झुकायचं हा प्रश्न पडतो तेव्हा फार क्वचित लढा निवडला जातो. आततायी पणा न करता या कथेतील नायिका आसावरी राखेतून भरारी घेऊन शून्यापासून विश्व निर्माण करण्याची धमक दाखवते, ते खरोखर स्फूर्तीदायक वाटतं.
‘ हिरकणी ‘ या कथेतही मोलकरणीचं काम करणारी श्रमिक नायिका रेखाटली आहे. आपल्या मुलाला चाळीत घर घेऊन देण्याचं स्वप्न उराशी बाळगून ती काबाडकष्ट करते. तिच्या या स्वप्न पाहण्याच्या हिमतीचं आणि ते पूर्ण करू पाहण्याच्या जिद्दीचं खरंच कौतुक वाटतं.
श्रमिकांचंच बोलायचं झालं तर ‘रातकिडा’ ही एका बापाची कथा फारच संवेदनशीलतेने हाताळली आहे. यात खांदेदुखीने त्रस्त एक रिक्षावाला आपलं दुखरं शरीर विसरून मुलाला इंजिनियर बनवायची खटपट करतो. त्याचं ही शारीरिक दुखणी पचवून मुलाच्या इंजिनियरिंग सारख्या खर्चिक शिक्षणासाठी दिवसरात्र एक स्वप्नासाठी झोकून देणं पाहून खरोखर डोळे पाणवतात.
‘ निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरु ‘ ही कथाही वेगळ्या धाटणीची आहे. ही कथा आहे वृद्ध आईसाठी झटणाऱ्या सुषमाची. सुषमाचं लग्नाचं वय सरत आलेलं असतं पण तिने जणू आपलं तारुण्य, संसाराची स्वप्न सारं बाजूला सारून आईच्या सुश्रुषेसाठी स्वतःला डांबून घेतलं असतं. म्हणजे आईची सुश्रुषा वाईट नव्हें, पण आपल्या आयुष्यातली सुख नाकारणं हे खटकतं. कारण तिच्या भावंडांनी जबाबदारीतून सोयीस्कर पाय बाहेर काढून आपापले संसार सुखाचे केलेले असतात. हिने मात्र स्वप्नातल्या राजकुमाराच्या कहाणीची पानं स्वतःहून मिटलेली असतात, त्यामुळे तिचं आयुष्य हे प्रवाही न राहता त्याचं डबकं होऊ लागतं. आयुष्यातल्या एका सुवर्णमध्यापर्यंत येण्याच्या प्रवासाची ही एक सुंदर कथा आहे.
‘ तराने पुराने ‘ या लॉकडाउन काळात घडणाऱ्या कथेत आजीआजोबांच्या घरी रहायला येण्याने घरच्या खास करून लहान मुलांच्या बदलेल्या दिनचर्येचं खेळीमेळीचं गणित मांडण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.
या साऱ्याच कथा फार संवेदनशीलपणे हाताळल्या आहेत. वाक्य फार पल्लेदार नाहीत, उगाच बोजड शब्द नाहीत. वाक्यरचना सोपी आहे, त्यामुळे आशयगर्भ कथानकही एखाद्या नाजूक फुलासारखं सुरेख उमलतं. त्यामुळे आपल्यासारख्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मंडळींना ट्रेनमधून येताजाता वाचायला सोईचं ठरतं. अर्थात वाचायला कितीही सोपं असलं तरी सोपं लिहिणं ही कला मात्र अवघडच, त्यामुळे लेखिकेला विशेष दाद द्यावीशी वाटते.
परिचय : श्री प्रसाद साळुंखे
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9664027127
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






