श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # हमारा बजाज… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आमच्या लहानपणी.. म्हणजे साठी च्या दशकात… चैत्र संपता संपता आणि वैशाखाची ओपनिंग सुरू झाली की फारतर जेष्ठ अर्धा अधिका पर्यंत… मराठी महिन्याच्यां गोंधळात न पडता सरळ इंग्रजी मंथचा विचार केला तर मार्च एंड पासून ते जून हाफ पर्यंत उन्हाळ्याचा सिझन सुरू असायचा… त्यावेळी सगळे ऋतू आपल्या वेळा काटेकोरपणाने पाळत असत… इतकचं काय माणसं, संस्था आस्थापना, शाळा, महाविद्यालये, रेल्वे, बस, विमानं इ इ. देखिल आपल्या वर्षभराच्या एकदा आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार चालत असतं… वार्षिक परिक्षेचे पीर एप्रिलच्या मध्याला एकदा पाण्यात पडले कि सगळी शाळकरी मुलांचा जथ्था आपापल्या पालकांसह उन्हाळी सुट्टीसाठी म्हणून गावाकडे जायचा… शहरातील उन्हाळ्यापेक्षा गावात सौम्य आणि अधिक गारवा तसेच आंबा, काजू, फणस, जांभूळ चा मनसोक्त पाहुणचाराचा आस्वाद आनंद लुटून झाला कि मृगाची पावसाची पहिली सर पडायचा अवकाश कि सगळे आपल्या शहरात परतायचे… तेव्हा त्या दोन तीन महिन्यात इकडे सिलिंग फॅन हुप्प होऊन बसायचा… ते ए. सी. , कुलर वगैरे श्रीमंती सिंम्बाल चे फॅड अद्याप मध्यमवर्गीय कुटुंबात अवतरलेले नव्हते… आणि सिलिंग फॅन मात्र शहरात घराघरातून वर्षभर तिन त्रिकाळ घुमत असायचा… पर्यावरणाचा समतोल साधला गेल्याने उन्हाळी तापमान देखील आपला ठरलेल्या पाऱ्यापेक्षा कधी जास्त होतच नसे… तर सांगत होतो कि तेव्हा सिलिंग फॅन हि एकमेव घरटी गरज होती आणि टेबल फॅन खिशात खुळखळणाऱ्या जास्तीच्या पैशाची चैन समजली जायची… जिथे हम दो और हमारे दो चा मामला तिथे सिलिंग वरचा एकुलता एक हाॅल मधला नि बेडरूम मधला हमारा बजाज आपलं गारेगार वारं फिरवायचा… पण जिथं टिचभर जागेत मणभर माणसं असायची तेव्हा हा चैन म्हणून नावं ठेवलेला टेबल फॅन उपयोगात आणला जायचा.. प्रत्येकाच्या सोयीनुसार कोपऱ्यात फिरता वा खडा ठेवून वारं फिरवायचा… स्पीड ची बटनं चार असली तरी वारं भन्नाट देत असे… पण या टेबल फॅन चा उपयोग मात्र त्या उन्हाळ्यापुरता मर्यादित असे… त्यानंतर तो अडगळीत फळीवर (लाॅफ्टवर) त्याला गवसणी घालून ठेवला जाई तो परत पुढच्या उन्हाळ्यातच खाली उतरे… असं दोन दशके पुढची गेली आणि पुढे पुढे सगळा माहोलच बदलत गेला… त्याला काय होतयं या विचाराने बुद्धीला मांद चढले आणि माणसांची विचाराची दिशा विकृत झाली… त्याचा विपरीत परिणाम निर्सगावर झाला आणि तो देखील माणसासारखाच रंग बदलू लागला.. त्याच्या दैनंदिन वेळापत्रकाचलाच त्याने न जुमानता आपल्या मनाला स्वैर स्वातंत्र्य दिले… सगळे ऋतूंची मनमौजी सुरू झाली… कुणीही उठावं कधीही यावं आपल्याला हवं तसं वागावं.. राहावं, ओरबाडावं, नासधूस करावं नाहीतर हुलकावणी देत राहून तोंडच दाखवायचं नाही… आणि माणसालाच वेठीला धरून त्यालाच जाब विचारायचा… सर्व काही तुझ्या ताब्यात आहे याचा फुकाचा गर्व आहे ना तुला मग दाखव कि वेळेवर हवा तेव्हढा पाऊस, थंडी आणि उन्हाळा आणून… आहे का तुझा निर्सगावर अंकुश तुझा… लावतोस का शिस्त मला… तुला काय वाटलं हमारा बजाज सारखा बटणाच्या कळीवर चालू बंद करून हुकमत आमच्या वर मिळवता येईल काय… अरे तुमचा तो हमारा बजाज देखील काहीवेळा चालता चालता बंद पडतो.. मान टाकतो आणि कशी तुमची ऐन गरजेच्या वेळी काशी करून जातो… तेव्हा तुमची कशी होते चिडचिड… अगदी त्याच तालावर माझ्या या बेताल वागण्यानं देखील तुमच्याच बेजबाबदार पणाने माझ्याशी वागणूकीचा परिणाम तुम्हाला भोगायला लावण्याची किंमत मोजून घेत असतो… तुम्ही काय रे हमारा बजाज म्हणून त्या टेबल फॅन चेच गोडवे गात बसता… नि आम्हाला विसरता… ये हमने आपको करारा जवाब दिया है… तो बाजारातून जेव्हा हमारा बजाज नवा कोरा घरी घेऊन येता तेव्हा त्याच्या नवलाई पुढे सगळे घरदारनं घेरुन बसते आणि तो एकशे ऐंशीच्या कोनात फिरणारा टेबल फॅन मात्र अरे मला जरा मोकळीक द्याल तर मी हवा पसरवेन… कुणी आगाऊ कारटं त्या पात्यावर पेन्सिल, कागद धरून आवाजाची गंमत लुटत असतं.. नि माझ्या गतीला अवरोध झाल्याने मग माझी मतीच खुंटते नि कुठेतरी खरखर करणारा कानाला सहन न होणारा आवाज माझ्याकडून निघाला कि… अरे याला वापरून दहा वर्षे झाली म्हणजे याची गॅरंटी संपली आता त्याला भंगारात मोडीत घालून दूसरा नवा आणायला हवा… असं म्हणून पुन्हा तुम्ही नवा हमारा बजाजच आणता… आमच्या सारखे कैक बाजारात आले आणि गेले पण आमच्या सारखे आम्हीच कायम टिकून राहिलोय… हे तुमचं नि हमारा बजाज चं जन्मोजन्मीचं नातं असं अबाधित राहिले आहे.. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी… ठंडा ठंडा कुल कुल..

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments