सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…श्री जोगेश्वरी आईच्या कृपाछत्राखाली…’ भाग- ३२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
श्री जोगेश्वरी आईच्या कृपाछत्राखाली…
आमची अक्कात्या, घरातली श्रेष्ठ, आदर्श, उंच पुरी, चंद्रासारख्या गोल चेहऱ्याची कणखर आणि,आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढणारी, कर्तबगार स्त्री होती. जोगेश्वरी ते आमचं घर म्हणजे अंगण ओसरी. मोठे काका देवळाच्या अंगणात तर ही अक्कात्या ओसरीवर असायची. तिचे यजमान श्री. दिगंबर पंत गेल्यानंतर ती आमच्याकडेच राहयला आली. अक्का सगळ्यात मोठी.माहेरी कष्टातले बालपण संपत आले असतांनाच तिला बोहोल्यावर चढावं लागलं. पंत बीजवर आणि वयस्कर होते , नववधू अक्कात्या दागिन्यांनी नखशिखांत लगडलेली होती. इतके दागिने अंगावर होते की कोवळी अक्काआत्या, त्या दागिन्यांनी अक्षरशः वाकली होती. गरिबीतून वर आलेली ती, भल्या मोठ्या जहागिरीची मालकीण झाली .पोटी संतान नाही त्यामुळे त्या दोघांनी माझ्या मोठ्या बहिणींवर जीवापाड प्रेम केलं. पण अक्काआत्याच्या नशिबी संसार सुख नव्हतं.पंतांना दाढी करताना जखम झाली,ती आत तोंडापर्यंत पसरून त्या दुखण्यातच त्यांचा अंत झाला. एवढे हुशार, प्रेमळ, बायकोवर जीवापाड प्रेम करणारे पंत,व्यवहारात कमी पडले, बायकोवर जीव ओवाळून टाकतांना त्यांनी एक फार मोठी चूक केली अक्कात्याच्या नांवावर ईस्टेट, पैसा, वाडा कागदोपत्री काहीच लिहून ठेवलं नाही. आणि म्हणूनच अक्कात्याच्या आयुष्याची धूळधाण झाली.भाऊबंदांनी सारा वाडा सारी सारी इस्टेट तिचा विश्वासघात करून लांडी लबाडीने लुटली. आणि दुर्दैवी अक्का भावाच्या आसऱ्याला माहेरी आली. खूप खूप रडली ती. पण मग डोळे पुसून कष्ट करण्यासाठी तिने पदर खोचला आणि तो बांधलेला पदर शेवटपर्यंत बांधलेलाच राह्यला.
डेक्कन जिमखान्यावर आयुर्वेद रस शाळेत अवघ्या 20 रुपयात तिने नोकरी केली. त्या काळच्या 20 लाखाची मालकीण,वीस रुपयांसाठी घराबाहेर पडली, आणि तिने परिस्थितीशी लढा दिला. सकाळी सातलाच श्रीजोगेश्वरीचे दर्शन घेऊन ती घराबाहेर पडायची. बुधवार पेठ ते लकडी पूल पायी चालत जाऊन विठोबाचं मंदिर गाठायची. विठुरायाला आपलं गाऱ्हाण ती डोळे पुसत सांगायची. मागे वळून बघायची तर सभामंडपाच्या कोपऱ्यात चिमण्यांचा थवा तिची वाट पाहत माना वेळावत बसलेला असायचा. हो!अपत्य सुखाला वंचित झालेली अक्का शंभर चिमण्यांची आई होती त्या चिमण् पाखरांवर ती अबोल प्रेम करायची. नवल वाटतंय नां तुम्हाला! पणअहो, ही अगदी मी प्रत्यक्ष पाह्यलेली खरी गोष्ट आहे.अक्कात्याला उशीर झाला तर चिमण्या तिथे येऊन चिंवचिंवाट करून बाजार भरवायच्या. क्षणापूर्वी रडणारी ती दुसऱ्या क्षणी हंसायची, , ” आले ग बायांनो आले, नका कलकलाट करू.” असं म्हणून तांदुळाचा डबा त्या चिमण्या पाखरांपुढे रिता करायची. दाणे टिपल्यावर, पोटोबा शांती झाल्यावर थव्याने यायच्या तशा थव्याने पाणी प्यायला,भरलेल्या करवंटीकडे चिमण्या भरारी मारायच्या. अहो हो! त्यांची ही माय त्यांच्या करता पाणी पण भरून ठेवायची. वात्सल्य पूर्ण नजरेने अक्काआत्या त्यांच्याकडे बघत बसायची. चिमण्यांनी दाणान् दाणा टिपून तिच्यासाठी जागा स्वच्छ करून ठेवलेली असायची. मग अर्धा तास त्या जागेवर बसून तिचे पोथी वाचन, स्तोत्र वगैरे चालू असायचे. विठ्ठलमय होऊन समाधी लागायची तिची. घड्याळ्यात आठचे ठोके पडले की लगबगीने उठून विठुरायाला दंडवत घालून रसशाळेचा रस्ता अक्कात्या धरायची. रात्री बरोबर आठ ला तुळशीबाग राम मंदिरात आरतीसाठी तिची हजेरी नित्य नेमाने असायचीचं. अशा प्रकारे पूर्ण दिवस तिने बांधून घेतला होता. त्यामुळे दुःख उगाळायला दिवसा तिच्याजवळ वेळच नसायचा. तुळशी बागेतून आल्यावर जिन्या जवळच्या गँलरीत ती पथारी पसरायची. जाताना मला म्हणायची, ” कुंदाताई आम्ही चाललो आतां हाड पसरायला. ” मला तो शब्द कसातरीच वाटायचा मी रडकुंडीला येऊन विचारायची, “असं काय गं बोलतेस आत्या? म्हणजे तू मला सोडून जाणार?” हंसून मला जवळ घेत ती म्हणायची, “अगं वेडा बाई म्हणजे मी झोपायला जातेय गादीवर अगदी हातपाय पसरून झोपणं म्हणजे हाडं पसरणंच नाही का? अगं ती जोगेश्वरी बसलीय ना तिथे,तिने बोलावल्याशिवाय तुला सोडून मी थोडीच जाणार आहे .” अशी शब्दांची कोटी करून थकली भागलेली कृश झालेली आत्या दुसऱ्या दिवशी चिमणचारा देण्याकरता निद्रेच्या आधीन व्हायची. तिच्या आयुष्यातला एकएक दिवस ती असा संपवायची. झोपतांना देवी मातेला साकडं असायचंच “जोगेश्वरी माते किती दिवस राह्यलेत अजून? केव्हां बोलवतीस मला?” तिचं बोलणं ऐकून मला रडू यायचं. तेव्हा ती मला जवळ घ्यायची आणि मी तिच्या कुशीत विसावायची. माझी अक्काआत्या कुठे जाऊ नये म्हणून मी तिला घट्ट धरून ठेवायची. अशी होती आमच्यावर अलोट माया करणारी, ती पिढी,आमची जवळची माणसं..
अजूनही ह्या आठवणी ताज्या आहेत.आतां अश्रू भरल्या डोळ्यांच्या पडद्याआडून डोकावणाऱ्या ओळी समोर येतात.
… ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती…
मंडळी माझ्या मनातलं मी शब्दात उतरवते आणि शब्दातलं तुम्ही तुमच्या मनांत उतरवता, म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद..
क्रमशः…
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




