श्री मंगेश मधुकर
☆ लिमिटेड माणुसकी… ☆ श्री मंगेश मधुकर ☆
मे महिना, फक्त आणि फक्त उन्हाचं राज्य. जिकडं तिकडं त्याचीच चर्चा. ऑफिसच्या कामासाठी सकाळी लवकर बाहेर पडलो असल्यानं काम झाल्यावर भुकेची जाणीव झाली. जवळच्या हॉटेलमध्ये गेलो. ऑर्डर दिल्यावर मोबाइल पाहत होतो. इतक्यात तिथं आलेल्या एकानं लक्ष वेधलं. भर उन्हाळ्यात काळी टोपी, काळा टी शर्ट, काळा गॉगल, स्कीन फिट जीन, पांढरे स्पोर्ट शूज घातलेला किरकोळ अंगकाठीचा टोपीवाला समोरच्या टेबलावर बसला. प्रचंड अस्वस्थ होता. उजवा पाय हलवताना हाताची बोटं मोडणं सुरू होतं. ऑर्डरसाठी आलेल्या वेटरला दोनदा परत पाठवलं. त्याचं विचित्र वागणं सहज लक्षात येण्यासारखं होतं. शेवटी नाईलाजाने टोपीवल्यानं ऑर्डर दिली. वेटरनं आणलेला बनमस्का आणि दोन कप चहा अधाशासारखा संपवला नंतर बिल घेऊन तो नुसताच बसून राहिला. काउंटरवर बिल देत असताना मोठ्यानं बोलण्याचा आवाज आला म्हणून मी पाहीलं तर टोपीवाला आणि वेटरमध्ये वादावादी सुरू होती.
“काय झालं रे!! ”मालकांनी वेटरला विचारलं.
“पैसे नाहीत म्हणतोय”
“बिल कितीचयं”
“सत्तर”
“पैशे नव्हते तर इथं झक मारायला आला का? ”मालक.
“साहेब, खूप भूक लागली होती. दोन दिवसांचा उपाशी आहे. ”टोपीवाला
“तुझ्याकडं बघून वाटत नाही”मालक
“हे सगळं लोकांनी वापरायला दिलंय. माझं काहीच नाहीये. ”
“आता तूच सांग काय करायचं”मालक
“किचनमध्ये भांडी घासतो”टोपीवाला.
“ठीकयं. रघू याला तीन-चार तास सोडू नकोस. ” हा सगळा प्रकार पाहून मला टोपीवाल्याची कीव आली.
“मालक, सत्तर रुपये मी भरतो. त्याला जाऊ द्या. ”
“तुम्ही कशाला भरता. हा फुकटा आहे. ”
“चांगल्या घरातला आणि शिकलेला वाटतोय. परिस्थितीनं वेळ आणलेली दिसतेय. ”
“नशेडी असणार. कामं नको. ऐतखाऊ भाxxx” मालक.
“जाऊ द्या. आपल्याला काय करायचं”पैसे देऊन हॉटेलच्या बाहेर पडलो. बाईक सुरू करणार इतक्यात टोपीवाला आला. “थॅंक यू सो मच”
“इट्स ओके”
“आपली ओळख नसताना देखील तुम्ही मदत केलीत. ”
“त्यात फार काही विशेष नाही, चलो बाय!! ”
“आजकाल माणुसकी राहिली नाही. तुमच्या सारखे लोक फार कमीयेत. ”
“ठीकयं”
“एक रिक्वेस्ट होती”टोपीवाला
“अजून काहीही मदत करणार नाही”मी स्पष्टपणे सांगितलं पण तो बर्फासारखा शांत.
“एकच छोटीशी मदत, पन्नास रुपये द्या. ”
“का? कशासाठी? ”
“संध्याकाळची सोय झाली असती. तुमच्यासारखे रोज भेटत नाहीत”
“म्हणजे मालक म्हणत होते ते बरोबर. तू फुकट्या आहेस. ”
“काहीही म्हणा. ”
“लाज वाटत नाही. ”
“नाही”
“जा बाबा मी काही मदत करू शकत नाही. ”
“असू नका करू. गरिबाची दुवा मिळेल. तुमचं मन फार मोठं आहे. ”
“हातीपायी धड आहेस. जरा कामधंदा कर की… ”
“कशाला उगीच जीवाला त्रास. थोडं डोकं चालवलं खायला मिळतं वर बिडीकाडीची आणि ह्याची पण सोय होते. ”अंगठा तोंडाला लावत तो म्हणाला.
“भाऊ, गप जा. एक रुपयासुद्धा मिळणार नाही”मी खेकासल्यावर अचानक गुडघ्यावर बसून हात जोडून मोठंमोठ्यानं बोलायला लागला. आजूबाजूच्या नजरा आमच्याकडं वळल्या. मला एकदम ऑकवर्ड वाटलं. तो मात्र निर्लज्जपणे हसत होता. डोकं सटकलं.
“काहीही कर. आता तर रुपया सुद्धा मिळणार नाही आणि हा तमाशा थांबव नाहीतर पोलिसांना बोलवतो”माझा ठामपणा बघून तो बिथरला.
“फुकटची शायनिंग मारायला मघाशी माझे पैसे दिले का. ”
“त्याला माणुसकी म्हणतात आणि ती माझी घोडचूक झाली. कळलं. ”
“मग एकदा चूक केलीय ना. आता पन्नास देऊन विषय मिटवून टाक”
“नाही”
“हॉटेलमध्ये चोंबडेपणा करायला कोणी सांगितलं होतं. माझं मी बघून घेतलं असतं. ”तो मुद्दाम चढया आवाजात बोलायला लागला तेव्हा नादी लागण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आलं. त्याच्या लेवलला जाणं आपल्याला जमणार नाही म्हणून गाडीला किक मारली अन सुसाट निघालो. पाठीमागून ओरडण्याचा आवाज येत होता.
लंच ब्रेकमध्ये खिडकीतून पाहत होतो. वाहत्या रस्त्याच्या बाजूला एक म्हातारा भिकारी डोळे बंद करून हात पसरून बसलेला. येणारे जाणारे समोरच्या वाडग्यात पैसे टाकत होते. पैसे टाकले की म्हातारबा ‘भला होगा’ म्हणून पुन्हा डोळे बंद करून बसायचे. तिथून चाललेल्या एका बाईंना म्हातारबाची दया आली. त्यांनी जवळच्या हॉटेलमधून जेवणाचं पार्सल आणलं अन ते म्हातारबांना देऊ केलं पण काहीच प्रतिसाद नाही. त्यांनी डोळेही उघडले नाहीत. बाईंनी हाका मारल्या पण उत्तर नाही. आजूबाजूचे हसायला लागले तेव्हा बाईंचा चेहरा उतरला. पुन्हा एकदा हाक मारली पण….. निराश मनानं बाईं पार्सल तिथंच ठेऊन निघून गेल्या.
माझ्या अनुभवावरून बाईंची मनस्थिती, वेदना समजू शकलो. चांगल्या भावनेनं मदत देऊ केली अन तीच अंगलट आली.
एक गोष्ट मात्र नक्की आजच्या काळात माणुसकी हवी पण लिमिटेड…… नाहीतर आपलाच मनस्ताप वाढतो. —-
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





