सुश्री तृप्ती कुलकर्णी
☆ शुकशुकणारी पात्रं… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
एखाद्या घरातून भरपूर पाहुणचार घेऊन आपण बाहेर पडावं आणि चालू लागताना अचानक त्या घरातल्या एखाद्या लहान मुलाने शुकशुक करून हात हलवावा, पुन्हा या म्हणावं, तसं पुस्तकातल्या काही पात्रांच्या बाबतीत घडतं.
साधारण तीन दिवसांपूर्वी पारखा ही भैरप्पांची कादंबरी वाचली. त्यावरती सविस्तर लेखही लिहून झाला. त्यातल्या काळिंगा या पात्राला खरमरीत पत्र लिहून झालं. तरीसुद्धा यातली तैय्यवा मला शुकशुक करू लागली. खरंतर पुस्तक वाचतानाच तिनं तिच्याकडे माझं लक्ष वेधून घेतलं होतं. म्हणजे दर वेळेस मला लेखक जेव्हा एखादा पात्र व्यंग असलेलं जन्माला घालतो मग ते व्यंग कुठल्याही स्वरूपाचं का असेना तेव्हा मला कुतूहल वाटतं. असं वाटतं की दुसऱ्या एखादा पात्राचं कर्तृत्व उठावदार दिसण्यासाठी किंवा त्याला जास्त न्याय मिळवून देण्यासाठी हे पात्र लेखकाने कमकुवत बनवलं असेल का? आणि मग त्या कथानकाचं वाचन चालू असतानाच माझ्या मनात एका दुसऱ्या पातळीवरती एकूण त्या सगळ्या पात्रांचं एकमेकांशी असलेलं नातं बघता डिसेक्शन चालू होतं.
थोडक्यात ह्या पात्राचा या पात्राशी संबंध नसेल तर अमुक एक पात्र इतकं उठावदार झालं असतं का? त्याचा एवढा प्रभाव पडला असता का? त्याचं महत्व जाणवलं असतं का? असा एक विचार माझ्या मनात सुरू होतो. पात्रांची जैविक आणि भावनिक गुंतवणूक मला खुणावू लागते. कथानक आपलं आपल्या वळणवळणाने पुढे जातं राहतं. पुस्तक वाचून मग नंतर त्याच्यावरती लिहून काम करून झाल्यानंतरही डिसेक्शन मोड पुन्हा डोक्यात सुरूच राहतो.
त्यावेळेला काही पात्रांवर अन्याय झालाय असं नकळत वाटून जातं, पण एक साहित्य निर्मिती ही एक कलाकृती आहे आणि ती विकली जाणंही गरज आहे ही गोष्ट जर मानली तर ती आकर्षित होण्यासाठी अशा क्लृप्त्या या लेखकाला कराव्या लागतात हे जाणल्यानं त्याबद्दल हळहळ वाटण्या पलिकडे काही करता येत नाही. परंतु अशी काही पात्रं मनाच्या तळाशी ही राहतातच.
आता यातल्या तैय्यवा या पात्राच्या बाबतीत मला असंच वाटलं ही खरंतर या कादंबरीतील नायकाची आई आहे पण तिला मुकी दाखवली आहे. आणि त्यामुळे अर्थातच तिचे संवाद नाहीत परंतु तिचे संवाद नसतानासुद्धा अप्रत्यक्षपणे ती सगळ्या घटनांशी कशी जोडलेली आहे आणि तिच्यावरती कसा वेगळ्या वेगळ्या प्रकारे जगण्यानेच नियतीनेच अन्याय केला आहे हे जाणवत राहतं. भैरप्पांच्या लेखनाची ही एक कमाल मला इथे जाणवते की एखादं व्यंग असलेलं पात्र सबंध कथानकामध्ये कुठे ना कुठे अदृश्य स्वरूपात स्पर्शत राहतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती ही कादंबरी वेगळी वाटू लागते.
तर अशी वेगवेगळी पात्र त्यांची व्यंग किंवा त्यांची ताकद घेऊन येतात आणि त्या कादंबरीला एक वेगळंच स्वरूप देतात. हा विचार करून नंतर पुन्हा ती कादंबरी वेगळ्या दृष्टीने बघण्यात एक वेगळीच मजा असते. असं बघायला लागलं तर कादंबरीचा खरा नायक किंवा खरा खलनायक कुणीच नाही असे वाटू लागतं आणि या दृष्टिकोनातून कादंबरी काही काळाने तटस्थपणे पाहता येते पण तरीही तिचा आनंद तसाच घेता येतो.
एक वाचक म्हणून नंतर असंही वाटतं की आपलं आयुष्य असंही पाहता यायला हवं. पण ते जमत नाही ही खंत मात्र प्रत्येक वेळी जाणवते.
तुमच्यापैकी कोणाला कधी असं जाणवलं आहे का?
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







