सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ.अंजली दिलीप गोखले
🪻 अभिनंदन 🪻
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री अंजली गोखले यांनी लिहिलेले “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते स्वामी विवेकानंद” हे माहितीपूर्ण पुस्तक ‘विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभाग’ यांनी नुकतेच प्रकाशित केले आहे.
आपल्या समूहातर्फे अंजलीताईंचे मनःपूर्वक खूप अभिनंदन आणि यापुढील त्यांच्या अशाच समृद्ध साहित्य-सेवेसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. 💐
🌸🌼🌸
आजच्या “ मनमंजुषा “ सदरात वाचू या.. ‘ हे पुस्तक का लिहावेसे वाटले ‘ याबद्दलचे अंजलीताईंचे मनोगत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ स्वामी विवेकानंदांवरचे पुस्तक मला का लिहावेसे वाटले… ☆ सौ.अंजली दिलीप गोखले ☆
☆
स्वामीजींच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेनेच या पुस्तकाचे लिखाण पूर्णत्वाला जाऊ शकले.
ऑटोबायोग्राफी ऑफ योगी परमहंस योगानंद या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद करताना स्वामी विवेकानंदांचा संदर्भ आला.
अमेरिकेतील एका छोट्या गावामध्ये सहा सात वर्षाची मुले खेळत असतात. जवळच छोटासा टॅंकअसतो. थोडावेळ खेळ झाल्यानंतर मुलांची दंगामस्ती, त्यानंतर भांडणे होतात. एक मुलगा आपल्या लहान भावाला पाणी भरलेल्या टॅंक मध्ये ढकलून देतो. तो मुलगा बु डायला लागतो आणि त्याच क्षणी त्याचे लक्ष आकाशाकडे जाते. तिथे त्याला झगझगता प्रकाश दिसतो आणि त्यामध्ये एक आश्वासक चेहराही दिसतो. त्याचवेळी पाण्यामध्ये त्याच्या हाताला एक काठी लागते आणि मित्र त्याला ओढून घेतात आणि त्याचा जीव वाचतो..
त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी तो मुलगा आपल्या आईबरोबर शिकागो येथे चाललेला असतो. त्यात वेळी त्याला समोर तसाच झुक झुकता प्रकाश पुन्हा दिसतो आणि तोच आश्वासक चेहरा असलेली व्यक्ती पण दिसते. तो त्यांच्याकडे जायचे ठरवतो तेवढ्यात ती व्यक्ती पायऱ्या चढून एका मोठ्या हॉलमध्ये जाते. तोही त्या हॉलमध्ये जातो आणि पाहतो तो हॉल गच्च भरलेला असतो आणि त्या ठिकाणी जागतिक धर्म परिषद भरलेली असते.
केशरी फेटा आणि अंगभर केशरी कपनी घातलेली ती व्यक्ती म्हणजे भारतामधून आलेले स्वामी विवेकानंद होते. त्यांचे भाषण संपल्यानंतर तो त्यांना शेक हँड करून यावे असे मनाशी ठरवतो. त्यांच्या जवळून जाताना त्याच्या मनात येते की आपल्याला असे मोठे गुरु पाहिजेत. यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळावे. तो जवळ गेल्यावर स्वामीजी त्याच्याकडे पाहून त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,, ” अरे मी तुझा गुरु नाही. तुझ्या पुढील आयुष्यामध्ये जे तुला चांदीचा पेला देतील, ते तुझे गुरु असतील.”
25-30 वर्षांनी त्या व्यक्तीला, भारतातूनच आलेल्या परमहंस योगानंदानी चांदीचा पेला दिला.
.. हा प्रसंग वाचल्यानंतर मी थक्क होऊन गेले. अशा द्रष्ट्या, दैवी शक्ती लाभलेल्या स्वामीजींची आपण पूर्ण ओळख करून घ्यावी, त्यांचे विचार समजून घ्यावेत, असे मी नक्की केले. आणि त्यांची पुस्तके वाचण्याचा सपाटा सुरू केला. अशी मोठी पंधरा-सोळा पुस्तके वाचल्यानंतर सोप्या भाषेत स्वामीजींवर पुस्तक लिहिण्याचे मी ठरवले आणि त्यातून तयार झाले ” हिंदुत्वाचे विश्व प्रवक्ते स्वामी विवेकानंद “ हे स्वामीजींवरील पुस्तक.
…. स्वामीजींच्या आईने भगवान शंकराकडे आणि जशा सुपुत्राची मागणी प्रार्थनेने केली केली, तसेच होते स्वामीजी. त्यांच्यातले सद्गुण ओळखून वडिलांनी जसे मार्गदर्शन केले तसेच घडले स्वामीजी.
…. सद्गुरु रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या पट्ट शिष्याला ओळखून, त्याला प्रेमाने आपलेसे करून, आपल्या ज्ञानाची ओंजळ पुरती रिकामी करून त्याला जशी झळाळी दिली, तसे तेज:पुंज बनले स्वामीजी.
…. आपल्या गुरुदेवांच्या इच्छेप्रमाणे आयुष्यात फक्त त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी झटले स्वामीजी.
…. आपल्या मातृभूमी बरोबर सगळ्या जगाच्या हितासाठी झटले स्वामीजी.
…. ” हे विश्वची माझे घर ” म्हणत ज्ञानदेवांचे पसायदान आचरणात आणून आपल्या आयुष्याची
अक्षरशः आहुती दिली ती स्वामीजींनी.
…. फक्त भारतातच नाही तर अमेरिका इंग्लंड येथेही हिंदुध्वज रोवून तो ध्वज फडकवला तो स्वामीजींनी.
अशा स्वामीजींचे सर्व पिढीला आदर्श असेच आहे.
म्हणूनच – –
“हिंदुत्वाचे विश्व प्रवक्ते स्वामी विवेकानंद” हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे आणि आचरणात आणावे असे मला मनापासून वाटते.
☆
© सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






