सौ. गीता वासुदेव नलावडे
मनमंजुषेतून
☆ खारीचा वाटा… लेख क्र. ६ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
शक्य असेल तेव्हा रोज मुलांना गोष्ट सांगायला मला आवडतं. आज अशीच एका गरीब पण प्रामाणिक मुलाची गोष्ट आज मी वर्गात सांगितली. आजारी वडील, घरकाम करणारी आई, एक छोटी बहिण असे कुटुंब. आईला मदत म्हणून हा मुलगा पेपरची आणि दुधाची लाईन टाकतो. पहाटे पेपर टाकत असताना त्याला पैशाची बॅग मिळते. तो ती मालकाला देऊन देतो. अशी गोष्ट होती.
गोष्ट सांगून झाल्यावर मी मुलांशी गप्पा मारायला सुरुवात केली. माझ्या वर्गातली बरीच मुलं आर्थिकदृष्ट्या खूप गरीब होती. त्यांना आई-वडिलांचे कष्ट कळावेत म्हणून आणि गरीब बसूनही त्या मुलाचा प्रामाणिकपणा आपल्या मुलांना समजावा म्हणून मी ही गोष्ट मुलांना सांगितली होती.
“तुम्ही आईला मदत म्हणून काय काय करता? ” असा प्रश्न विचारल्यावर, बऱ्याच मुलांनी छोटी-मोठी कामे करून आईला घरकामात मदत करतो असं सांगितलं.
सगळ्यात शेवटी ऋजुता (नाव बदललेले) माझ्या अगदी जवळ आली आणि म्हणाली, “बाई, माझा मोठा भाऊ पेपर टाकतो आणि मी शेजारच्यांच्या छोट्या बाळाला सांभाळते. त्याचे हजार रुपये मिळतात. शिवाय आईला घरातील इतर छोट्या कामात, भांडी घासायला, केर काढायला मदत करते, ” घरात आपण देत असलेल्या खारीच्या वाट्याबद्दल सांगत असताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तिचे काम सर्व वर्गाच्या समोर सांगून, सगळ्यांना टाळ्या वाजवून, तिचे अभिनंदन करायला सांगितलं. छोटसं बक्षीस देऊन तिचं कौतुकही केलं.
पाठीवर पडलेल्या त्या कौतुकाच्या थापेने दिवसभर ती एका वेगळ्याच धुंदीत वावरत होती. प्राथमिक शाळेतली मुलं ही. खेळाबागडायच्या या वयात केवढी ही समज! अकाली प्रौढ झाल्यासारखी वाटतात.
अशी जाणीव आणि संवेदनशीलता मोठेपणीही त्यांच्यात राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
क्रमशः दर गुरुवारी…
© सौ गीता वासुदेव नलावडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






