सुश्री नीला महाबळ गोडबोले
☆ मायेची बोटे… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆
” माझं चार महिन्यांचं बाळ रडायला लागलं की माझ्या सासुबाई धावत येतात. त्याला उचलून घेतात.
मी कितीतरी वेळा त्यांना सांगितलय… बाळ रडत असेल तर त्याच्या जवळ जायचं नाही.. उचलून तर आजिबात घ्यायचं नाही..
बाळाला तशीच सवय लागते..
पण त्या ऐकतच नाहीत..
मी जाम वैतागलीय..
माझी नोकरी असल्याने बाळाला त्याच सांभाळतात, शिवाय स्वयंपाकही करतात. त्यामुळे त्यांना ठेवून घ्यावच लागतं…
मी काय करू? “
” माझा मुलगा अडीच वर्षाचा आहे.
माझे सासु-सासरे गावाकडे असतात.
इकडे येताना नातवासाठी गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे आणतात.
माझा मुलगा आवडीने खातो.
मला हे आजिबात आवडत नाही.
मुलाच्या दातांचं काय होईल?
आमची भांडणं होतात यावरून…
मी काय करू? “
” सकाळी उठल्यावर दूध व ड्रायफ्रुट्स, मग व्यायाम, त्यानंतर अभ्यास, पोळी-भाजी जेवण, शाळा,..
शाळेच्या डब्यात पोळी-भाजी, उसळ, फ्रुट्स
शाळेनंतर ट्यूशन, त्यानंतर स्पोर्ट्स, घरी आल्यावर अभ्यास.. जेवण.. जेवणात भाजी-भाकरी.
रात्री दहाला झोपणं..
मुलाचं वय सहा वर्षे..
असं अगदी व्यवस्थित मी वेळापत्रक बनवलेलं असताना..
सासुबाई मधेच त्याला फ्रुट्सच्या वेळी लाडू नाहीतर वड्या देतात..
सासरे कधीतरी बिस्कीट किंवा चॉकलेट देतात.
पोरगं कंटाळून एखादे दिवशी स्पोर्ट्सला कंटाळा करू लागलं की..
” राहूदे गं आज त्याला घरी ” म्हणत जवळ घेतात..
एखादे दिवशी शाळेला बुट्टी मारून नातवाला लग्नाला घेऊन जाते म्हणतात..
अन् रात्री कसल्यातरी राजा-राणीच्या गोष्टी सांगतात..
मला फार काळजी वाटतेय पोराची..
नि सासु-सास-यांचा भयंकर राग येतोय.
ते माझ्या मुलाला बिघडवतायत..
” मी काय करू? “
समाजमाध्यामांवरील लेडीज ग्रुपमधे वारंवार विचारले जाणारे हे प्रश्न..
सासुसास-यांपासून लांब रहा..
वेगळं रहा..
या उत्तरांकडे नेणारे..
न्युक्लीअर कुटुंबात वाढलेली ही पिढी..
शिक्षण, नोकरी व पैसा या त्रिदेवांना समोर ठेऊन वाढवली गेलेली..
माणसांपेक्षा पुस्तकांवर, समाजमाध्यमांवरील ज्ञानावर जास्त विश्वास असणारी..
सोळाव्या वर्षी आई-वडिलांपासून वेगळे होऊन स्वतंत्र जगायला लागलेल्या, मायेच्या माणसांचा अभाव असणा-या पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करणारी…
म्हणूनच बाळाची चाहूल लागल्यावर “दोन-तीन पोरांना मोठं केलेल्या ” आईला, सासुला अडाणी समजत पालकत्त्वाच्या पुस्तकांना, समुपदेशनाला आपलेसे करणारी..
निरपेक्ष मायेच्या बावनकशी सोन्यापेक्षा जास्त झळाळी असणा-या व्यावसायिक बेन्टेक्सला भुलणारी..
चंगळवादाच्या रेट्यात आपल्याच माणसांना दूर लोटणारी..
मुलाला जन्म दिला तर महागाईच्या कल्लोळात त्यांचं संगोपन नीट होणार नाही म्हणत… नवजीवाला जन्मापासून रोखणारी..
नि स्वत:च्या भोगवादाला जपणारी..
आणि नवीन जीव जन्माला घातलाच तर
त्याला ” मशीन ” बनवू पाहणारी…!!
हे वाचून, पाहून का कुणास ठाऊक पण मी पन्नास-पंचावन्न वर्षे मागे जाते..
आमचं एकत्र कुटुंब..
आई-बाबा, दोन-दोन काका-काकु, आजोबा..
सख्खी चुलत मिळून आठ भावंडे..
अधून-मधून येणारी आत्या.. नि आतेभावंडे..
पंचक्रोशीत राहणारी आजी..
तीन मावश्या, तीन मामा..
नि हातापायाची बोटे मोजायला अपुरी पडतील.. इतकी मावस-मामे भावंडे..
अंबानींपेक्षाही जास्त असलेलं हे ऐश्वर्य…
रोज सकाळी मला नि चुलतभावाला श्रीकृष्णभुवनमधून आणलेलं इडली सांबार स्वत:च्या मांडीवर बसवून भरवणारे आमचे नाना.. म्हणजे आजोबा..
ताईला आवडतात म्हणून आवर्जून भजी करणारी नि तिला आग्रह करून खाऊ घालणारी थोरली काकू..
पहिला नंबर आला म्हणून अख्खा चॉकलेटचा डबा देणारे दादा म्हणजे थोरले काका..
डोसा मागवून गुपचूप आम्हा भावंडांना खाऊ घालणारे.. मधलेकाका..
नरसोबावाडीला जाताना स्वत:च्या मुलांना एकवेळ न नेणारी.. पण मला आवर्जून घेऊन जाणारी मधली काकू..
घरच्यांचा डोळा चुकवून गाडीवरचा ज्यूस पाजणारा आमचा आबा..
गोळ्याचं सांबार, पिठलं, शेवयाची खीर.. असे कित्येक सुग्रास पदार्थ रांधून आमचं आजोळपण सोन्याचं करणा-या आमच्या आजी नि माम्या..
चिंध्यांच्या बाहुल्या, मातीची चूल नि बोळकी
करायला शिकवणारी आमची आजी.. आईची आई..
सुरकुतल्या मऊशार हातांच्या मिठीत निजवून रंगवून रंगवून गोष्टी सांगत आमचं बालपण मंतरलेलं करणारी तीच आजी..!!
स्वत:चा पोरवडा असताना आम्हा भाचरांचे अतोनात लाड करणा-या आमच्या तीन्ही मावश्या…!!
सुट्टीला आलेल्या आम्हा भाचरांसाठी पहाटे उठून श्रीखंड-पुरीचा स्वयंपाक करून ठेऊन पुण्याहून चालत पिंपरीला जाणारी.. स्वत:चा कारखाना चालवणारी आमची आत्या..!!
आम्ही मुलेच काय आमचे आईवडील आजारी पडल्यावर रात्रीत किर्लोस्करवाडीहून धावत येणारे आमचे डॉक्टरमामा..!!
आपल्या लेकरांचा हा कौतुकसोहळा पहात धन्य होणारे माझे विठ्ठल -रखुमाई..
कदाचित फारशी संपत्ती नसेल..
पण आमच्या माघारी आमच्या पिल्लांच्यामागे भक्कम उभी राहणारी त्यांची मायेची माणसे आहेत… हा केवढा मोठा बॅंक बॅलन्स त्यांच्याकडे होता..
म्हणूनच ते निर्धास्त होते..!!
आम्ही भावंडे मोठी झालो..
फार मोठं शिकलो नाही की सुवर्णपदकांचे मानकरी झालो नाही..
पण या जगात खंबीरपणे जगण्याची क्षमता मात्रं मिळाली..
कदाचित मायेच्या माणसांमुळे मिळणा-या सुरक्षिततेच्या भावनेमुळे..
कोणताही प्रसंग आला तरी माझी माणसे माझ्याबरोबर आहेत, हा विश्वास फार मोठा आधार..!!
किरकोळ कारणांवरून स्वत:चं आयुष्य संपवणारी उच्चशिक्षित तरूण मंडळी पाहिली की आपल्या मायेच्या वैभवाची प्रकर्षाने जाणीव होते..
लग्न होऊन मी सासरी गेले..
थोड्या उशीराने संसारवेलीवर फुलणा-या कळीची चाहूल लागली..
डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली..
घरी आम्ही दोघचं..
सासुबाई नुकत्या वारलेल्या..
आई-बाबा धावत आले.. नि राहिले..
दीड वर्ष आमची काळजी घेत…
मोठे डॉक्टर असलेल्या सास-यांनी स्वत:च्या हातांनी होणा-या नातवंडाचा पाळणा रंगवला..
माझ्या ताईनं हौसेनं डोहाळेजेवण केलं..
बाळाच्या कपड्यापासून सगळी तयारी तिनेच करून पाठवली.
माझी जाऊ, दोन्ही चुलतसासवा यांनी नवनवीन नि पौष्टिक पदार्थांनी माझे डोहाळे पुरवले..
माझी लेक जन्मली तशी तिची मामी.. माझी वहिनी आणि माझी नागुमावशी धावत आल्या.. हॉस्पिटल वहिनीनं सांभाळलं..
” बाळाला गोडंतेल लावायचं “.. वयस्क मावशी म्हणाली..
मी शास्त्र पदवीधर.. बरीच बालसंगोपनाची पुस्तके वाचलेली..
गोडेतेलावर नाक मुरडलं..
” तुझं ज्ञान पुस्तकी.. मावशींनी सात मुलांना वाढवलय.. त्यांचं ऐकायचं. “
.. इंग्लंडहून पदवी मिळवलेल्या प्रतिथयश डॉक्टर असलेल्या सास-यांनी माझे वेळीच कान टोचले…
माझ्या बरोबरीने… माझ्यापेक्षा जास्तच आईने जागरणं केली..
रात्र रडून जागवणा-या माझ्या लेकीला मांडीवर घेऊन बसलेल्या माझ्यासोबतीला माझे बाबाही अहोरात्र जागले..
माझं चिमुकलं पिल्लू आजीचा हात पहिल्या दिवसापासून ओळखू लागलेलं.
तिच्याकडून माझ्या हातात येताना रडारड..
एका हाताने आजीचा मऊशार दंड नि दुस-या हाताने तिचच मंगळसूत्रं धरलं की त्या चिमुकल्या जीवाला सा-या विश्वातली सुरक्षा मिळत असावी..
पोरीची सगळी आजारपणं आम्ही नवराबायकोनी दुस-या क्षणी धावून येणा-या सास-यांच्या नि माझ्या आई-बाबांच्या भरवश्यावर निभावली..
खाण्यासाठी मला रडवणारी माझी लेक काकुच्या हातचं उप्पीट, मामीच्या हातचं इडली-सांबार, रगडा पॅटीस नि मावशीच्या हातचा बटाटेवडा, डोसा.. मात्रं.. मागून मागून खात असे..
सोनुताईनं आणलेले सुंदर कपडे, रोहनदादाने तासन्तास गाडी-गाडी करत तिला फिरवणं..
शेजारच्या शिवालीताईचं दिवसभर खेळवणं..
यांमुळे तिचं बालपण सुगंधी झालं..
मामीनं माझ्या भीतीला न जुमानता तिचे कान टोचून आणणं,
आप्पांनी.. तिच्या आजोबांनी तिला बालवाडीच्या पहिल्या दिवशी बुद्धिबळाचा सेट देणं..
मावशीनं तिला सुंदर कपडे आणून त्या कपड्यांत तिचे कितीतरी सुरेख फोटो काढणं..
काका-काकुंनी तिला स्वत:बरोबर ट्रीपला नेणं..
अशा कितीतरी तिच्या मर्मबंधातील ठेवी..
स्पर्धांमधल्या, परीक्षांमधल्या तिच्या यशांत तिचं कौतुक करणारे तिचे आजीआजोबा, मामा-मामी, काका-काकु
मावशी, आत्या, सगळी भावंडं..
यांनी तिच्या प्रत्येक यशाचा सोहळा केला..
माझी आई शेवटच्या काही दिवसांत सा-या जगाला विसरली होती.
पण अधून-मधून देवांगीचं.. माझ्या लेकीचं.. तिच्या नातीचं.. नाव मात्रं तिच्या मुखातून निघायचं..!!
” देवांगीला खूप शिकवा..” तिच्या दोन्ही आजोबांचे शेवटचे शब्द…
स्वत:च्या मुलांपेक्षा नातवंडांची काळजी करणारे..!!
दुधापेक्षा सायीची काळजी करणा-याला सायीपासूनच वेगळं करायचं..?
ते सायीची काळजी करतात म्हणून..?
एखादं कापड विणताना अनेक धागे लागतात.
उभे आडवे..
उबदार हवामान लागतं..
कापड टिकण्यासाठी..
अन् या कापडाला गुंफणारी बोटं
मायेची असतील..
तर ते फक्त कापड न राहता..
त्याचं वस्त्रं होतं..
चिरंतन टिकणारं.. पवित्र.. शाश्वत..
देवाच्याही मूर्तीवर विराजमान होणारं…!!
– – अर्थात हे माझं वाटणं.. प्रत्येकाला हे पटेलच असं नाही
© सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
फोन नं. 9820206306, ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





