सौ. गीता वासुदेव नलावडे
मनमंजुषेतून
☆ आपली शाळा… लेख क्र. ८ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
कितीतरी वर्षांनी विक्रांतची (नाव बदललेले) आई रस्त्यात भेटली. सोबत त्यांच्या विहीणबाई होत्या. त्यांनी माझी ओळख करून दिली, “या विक्रांतच्या प्राथमिकच्या बाई. ”
त्यांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्यांच्या विहीणबाई म्हणाल्या, “नलावडे बाई ना!”
विक्रांतच्या आई म्हणाल्या, “बघा बाई, मला ओळख करून द्यावी लागलीच नाही. आमच्या घरी सर्वांनाच तुम्ही माहीत आहात. “
मला चौथीतला विक्रांत आठवला. नाट्यवाचनासाठी आम्ही मुले घेऊन “जवाहर बालभवनाला” गेलो होतो. विक्रांतचे वाचन अप्रतिम होते. त्याला नक्की बक्षीस मिळेल असं मला आणि सोमण बाईंना वाटत होतं. या नाट्यवाचनाचं लेखन, दिग्दर्शन सोमण बाईंनी केलं होतं. पण बक्षीस मिळालं आमच्याच शाळेच्या ऋजुताला.
विक्रांतलासुद्धा बक्षीस मिळायला हवं होतं, असं आम्ही दोघी म्हणालो. तो माझ्या शेजारीच बसला होता, तो पटकन म्हणाला, “बाई, बक्षीस कोणालाही मिळू दे. पण नाव आपल्या शाळेचं आलं ना, हे महत्त्वाचं. “
त्याचं हे वाक्य ऐकून मी त्याला जवळ घेतलं, म्हटलं, “किती गुणाचं आहे बाळ माझं!”
या एका वाक्याने त्याने मला बरंच काही शिकवलं. किती निरागस असतात ही मुलं. असूया, मत्सर, द्वेष यांचा स्पर्शही झालेला नसतो.
अशा माझ्या अनेक शहाण्या बाळांकडून मी खूप काही शिकले.
आता विक्रांत अमेरिकेत असतो. भारतात आल्यावर तो मला भेटायला आला. “बाई, पहिल्या पगाराचे पैसे मला शाळेला द्यायचे आहेत, ” म्हणाला आणि “आपल्या शाळेच्या” नावाने चेक लिहून दिला.
किती प्रेम, किती विश्वास – मन भरून आलं.
माझे विद्यार्थी हीच माझी खरी संपत्ती आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं.
क्रमशः दर गुरुवारी…
© सौ गीता वासुदेव नलावडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





