सुश्री प्रभा हर्षे
☆ “पाखरं उडून गेल्यानंतरचा रिकामा आशियाना…” – लेखिका : सुश्री लीना पांढरे ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆
मी जेथे राहते त्या वसाहतीत घरटी मूलं साता समुद्रापल्याड शिकण्यासाठी वा नोकरीसाठी कायमची उडून गेलेली आहेत आणि घरटी रिकामी झालेली आहेत.
माझ्या शेजारणीच्या दिवाणखान्यात दोन घड्याळं लावलेली आहेत. एक घड्याळ भारतातील वेळ दाखवते तर दुसऱ्या घड्याळात तिचा मुलगा टोरांटो येथे आहे तेथील वेळ दाखवलेली असते. ती फक्त शरीराने भारतात आहे आणि मनाने टोरांटोमधील तिच्या मुलाच्या घरात.. मुलगा आणि सून कामाला गेले असतील मग त्यांचं बाळ म्हणजे हिचा नातू ; त्याला पाळणा घरात पोहोचवला असेल. तेथील असुरक्षित वातावरण, गुंडागर्दी कर्जाचे हप्ते भरताना पोरांची होणारी दमछाक.. काळजी काळजी आणि काळजी. या माझ्या शेजारणीच्या बोलण्यामध्ये फक्त तेवढाच विषय असतो आणि मोबाईल मध्ये सगळे तिकडच्या देशातील मुलाच्या घराचे फोटो.
माझी एक अत्यंत सुज्ञ मैत्रीण आहे. तिच्या दोन्ही लेकी अमेरिकेमध्ये कायमच्या स्थायिक झालेल्या आहेत. ही वर्षातून एकदा अमेरिकेला जाते आणि त्या दोघी पण वर्षातून एकदा भारतात तिला भेटायला येतात. कायमचं परदेशात जाऊन राहणं आणि तिथलं घरामध्ये बंद करून टाकणारं पूर्ण वेगळं आयुष्य घालवणे अनेक पालकांना जमत नाही आणि ते इथेच राहणं पसंत करतात.
आयुष्यभर आपण स्वतंत्रपणे राहिलेलो आहोत तसंच राहावं आणि मुलांना पण राहू द्यावं त्यांच्या संसारात जाऊन लुडबुड करू नये अडीअडचणीला त्यांच्या पाठीशी जरूर उभं रहावं पण त्यांची गरज संपल्यावर शांतपणे माघारी यावं हा सुजाणपणा माझ्या मैत्रिणीमध्ये आहे. पाच-सहा वर्षांपूर्वीच तिचा जोडीदार वारला. तिचा आलिशान बंगला, बगीचा यामध्ये ती एकटीच मागे उरली. पण आउटहाउस मध्ये असणाऱ्या तिच्या जुन्या मोलकरणीच्या कुटुंबाच्या मदतीने ती आनंदाने आणि धीराने राहते आहे. मुख्य म्हणजे तिच्यामध्ये एक कण सुद्धा कडवटपणा नाही.
पंख फुटल्यावर पाखरं उडून जाणारचं. आपल्याला वात्सल्याची आच होती म्हणून आपण मुलं जन्माला घातली. मुलांनी आपल्याला वेळ दिलाच पाहिजे फोन केलेच पाहिजेत रोज उठून आई-वडिलांप्रती कृतज्ञता आणि आभार दर्शवणारी भाषणं ठोकलीच पाहिजे अशा अपेक्षा आपण मुलांकडून करू नये हेच योग्य. मुख्य म्हणजे आपल्या मुलांची निर्भत्सना आणि इतरांची मुलं श्रावण बाळं अशी तुलना न करता प्राप्त परिस्थिती आनंदाने स्विकारावी.
पुण्यामध्ये माझे काका राहत होते. ९५ वर्षाचे होऊन ते नुकतेच वारले. त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यानंतरही ते तब्बल पंधरा वर्ष आनंदाने जगले. त्यांची पत्नी माझी काकी सात-आठ वर्षांपूर्वी त्यांच्या आधीच वारली. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही अमेरिकेमध्ये कायमचे स्थायिक झालेले आहेत. पण त्यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि यांनी साठवलेल्या शिलकीमुळे शेवटपर्यंत काका त्यांच्या बंगल्यात आनंदाने राहू शकले.
आमचा एक मित्र आहे तो मजेत म्हणतो की आता म्हातारपणी मला शेवटच्या क्षणापर्यंत सोबत करणारे दोन सोबती मिळाले आहेत एक आहे बीपी आणि दुसरा डायबिटीस.. आजारपण आल्यावर निदान उपचार करायला आपल्याकडे पैसे आहेत ही सकारात्मक गोष्ट अनेक आर्थिक सुबत्तेमध्ये राहणार्या वृद्धांना जाणवत सुद्धा नाही हे दुर्दैव.
अगदी सुकून खारीक झालेली एक म्हातारी रोज शेळ्या राखत भर दुपारच्या टळटळीत उन्हात माझ्या दारावरून जायची. मी दारात लावलेल्या झाडांच्या सावलीत घटकाभर बसायची. मी तिला माठातून तांब्याभर थंड पाणी नेऊन द्यायचे. एसी मध्ये आपले मांजर कुरवाळतं नेहमीप्रमाणे मन रमवायला आता कुठल्या देशात फिरायला जायचे याचे प्लॅनिंग करणारी माझी आई त्या म्हातारीवर फार चिडायची.
“आपल्याच घरासमोरच्या दारात का बसते ही बया? तू कॉलेजमधून दमून आल्यावर लगेच तिला का पाणी नेऊन देतेस? तिचा आता अगदी वहिवाटीचा हक्क झाला आहे. ” अशी बडबड करायची. ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य यावरती पुस्तकं खरडणं आणि व्याख्यानं देणं हे बहुदा आई आपल्या शिरपेचामध्ये अजून एक रंगीत रेशमी पीस खोवून ऐट करण्यासाठी करत असावी. आर्थिक सुबत्ता, वैद्यकीय उपचार सारं काही असूनही कॅन्सर आणि करोनाने आई या जगातून निघून गेली. तिची मांजरी अजूनही आहे.. अजूनही शेळ्या राखत ती म्हातारी झाडाखाली रोज येऊन बसते. तुजी ती वरडणारी माय कुटं ग्येली? असं मला पुसते.
पोरांना उंटाच्या पाठीवरून फिरवणारा उंटवाला अजूनही दारात येतो. हाक घालून दूर देशी असणाऱ्या माझ्या लेकरांचं कुशल पुसतो, बुड्ढे की बालवाला, आईस्क्रीमवाला, चॉकलेट देणारा कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार सारे जण जाता येता पोरांबद्दल विचारत राहतात. माझ्या स्वयंपाकाच्या मावशीला माझ्या धाकट्याशी बोलायची हुक्की येते मग मी त्यांना व्हिडिओ कॉल करून धाकट्याला जोडून देते. “आता कधी येशील रे घरी? “असं मावशी त्याला विचारत राहतात. लेकरांवाचून घर किती सूनं सूनं वाटतं असं मला सांगतात.
अशा वेळेस मला पहेलगामच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारला गेलेल्या गरीब सैयद आदिल हुसैनची आई डोळ्यासमोर दिसते. ‘आमच्या कुटुंबाचा एकमेव आधार रोटी कमावून आणणारा गेला आता आम्ही काय करायचं? ‘
हा सवाल ती माऊली करत असते.
गरीबीमुळे खेड्यापाड्यातून पोट भरण्यासाठी सैन्यात भरती झालेल्या आणि शहीद झालेल्या असंख्य तरुणांचे वृद्ध थकलेले आईबाप, शहीद झालेल्या सैनिकांच्या तरुण बायका, लहान लेकरं टीव्हीच्या स्क्रीनवर दिसत रहातात. मग आपण आपल्या टीचभर दुःखाचा किती कांगावा करावा बरं!
लेखिका- सुश्री लीना पांढरे
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






