सुश्री तृप्ती कुलकर्णी
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ प्रिय लोकमान्य टिळक यांस…!!! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
कसंय ना टिळक !
तुम्ही ‘स्वराज्य स्वराज्य’ असं म्हणत होतात. पण ते कान गोष्टीप्रमाणे ‘स्वैराचार स्वैराचार’ ऐकलं गेलं.
आता कसंय, कान गोष्टीच्या खेळात कुणालाच दोष देता येत नाही. कारण ऐकताना मानसिकता काय आहे यावर त्या शब्दाचा उच्चार ठरतो. त्यामुळे सोडून दिलं एक खेळ समजून…
फक्त तुमच्या स्मृती दिनाच्या दिवशी ‘स्वराज्य’ हा शब्द आम्हाला नीट आठवतो. आणि बरं का टिळक!
आम्ही तो व्यवस्थित उच्चारतो. त्या शब्दाच्या उच्चाराने मनात देशप्रेमाच्या भावना निर्माण होतात…
अगदीच नाही असं नाही… पण फार तात्कालीक. दुसऱ्या दिवशी आमच्यासाठी ……
” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि तो मी मिळवणारच ” हे लोकमान्य टिळकांनी उच्चारलेलं फक्त ऐतिहासिक विधान असतं.
टिळक ! आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण अजून स्वराज्य आलं का हा प्रश्न मला पडतो. निदान माझ्या पिढीला तरी. कारण स्वातंत्र्यानंतर पुष्कळ वर्षांनी आम्ही जन्माला आलो. पण आजही आपली भाषा, आपली संस्कृती, आपले आचारविचार, या सगळ्यावरती येणाऱ्या मर्यादा बघितल्या, त्या सगळ्याचं
संकुचीकरण होताना बघितलं की वाटतं नक्की काय मिळवलं आपण??? “ स्वातंत्र्य “ मिळवून?
फक्त भौगोलिकदृष्ट्या आपला प्रदेश स्वतंत्र झाला. आणि राजकीयदृष्ट्या आपली माणसं सत्तेवर आली.
पण या पलीकडे स्वराज्य कुठे आहे? …. भाषेवरून वाद होत आहेत. प्रांतावरून वाद होत आहेत. सीमावाद बोकाळला आहे. जातीभेद, धार्मिक द्वेष याबाबतीत तर बोलायलाच नको…. त्याबाबतीत उघडपणे बोलण्याचं स्वातंत्र्यसुद्धा गमावलंय. आता …
आता … भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे. तुम्हाला सांगते टिळक तुम्ही शिक्षक होतात ना. तर या व्यवस्थेनं शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पार खेळखंडोबा करून टाकलाय.
आता काही साधं राहिलं नाही बरं का , आता सगळं ‘महा’ झालंय, आणि आता फक्त पाट्यांमध्येच, नावांमध्ये ‘अखिल भारतीय’ हे शब्द दिसतात. कृतीमधला भारत तर गल्लीनुसार वेगळा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हा क्रांतीकारकांना, देशभक्तांनासुद्धा सोडलं नाही इथल्या लोकांनी. त्यांच्या चुकांचे ताशेरे ओढण्यात अग्रगणी आहेत मंडळी.
टिळक! आता अग्रलेखाचे महत्त्व नाही, तर ‘ब्रेकिंग न्यूजचे’ महत्त्व आहे. अखंडितपणा केव्हाच संपला आहे अगदी बातम्यातूनसुद्धा ! तेव्हा तुम्ही अखंड असावं म्हणून धडपडलात आणि आता…
आता सतत तोडण्यामोडण्याच्या गोष्टी घडतात…माणसं म्हणू नका, वस्तू म्हणू नका , राजकीय पक्ष, नीती , नियम, मूल्य, म्हणू नका किंवा अजूनही काही जे असेल ते …. तोडणं आणि मोडणं हे नेहमीच झालंय ! ‘ब्रेकिंग’ न्यूजचा जमानाय ना!
तुम्ही लोकांनी ज्या भारताबद्दल इतकी स्वप्नं पाहिली, ती स्वप्नं तुमच्याखेरीज कुणाच्या लक्षात तरी आहेत का हाच प्रश्न आहे. …
…. त्यामुळे तुम्हा लोकांना एक नम्र विनंती आहे. …
…. एक तर परत भारतात जन्म घेऊ नका. आणि समजा घेतलात ना, तर आधीसारखे येऊ नका.
… म्हणजे ते तत्त्वनिष्ठ,
… उच्च विचारसरणी असणारे
… साधी राहणी असणारे
… सामाजिक कळवळा असणारे
… दया, सहानुभूती असणारे
… विचार आणि विवेक शाबूत असणारे
अंहं …
अंहं ….
यातलं काही म्हणजे काहीही घेऊन येऊ नका.
अहो का म्हणजे काय? तुम्हाला परग्रहवासी ठरवतील इथली लोकं !
यायचं झालं ना तर तुम्हाला वेश बदलून, भाषा बदलून, आणि विचार बदलून ,यावं लागेल
…. निदान तसं दाखवावं लागेल.
भाषा तर इंग्लिशच वापरा ! काय आहे, आपल्या स्वतंत्र भारतात कोणी इंग्लिशमध्ये बोललं ना की ते खरं वाटतं. त्याला ‘व्हॅल्यू’ येते आणि अर्थातच ते फेमस होतं… मगच लोक त्यालाच फॉलो करतात.
बरं का टिळक ! आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही. तुम्हाला सांगते .. आता फॉलोवर्सचा जमाना आहे.
काम करणाऱ्यांचा नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचं… पहिले ए आय शिका.
अहो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ! तो न येणारा माणूस इथून पुढच्या भारतात आणि जगातही जगू शकणार नाही. आता इथे सगळं ऑनलाईन होतं, त्याचे पासवर्ड असतात.
तुम्हाला देशामध्ये बदल घडवायचे असतील तर …
तर तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, ट्विटर, हॅशटॅग असं सगळं शिकावं लागेल. रिल्स बनवावे लागतील….. तेव्हा कुठे तुम्हाला लोक ऐकतील, पाहतील, लाईक करतील, कमेंट करतील…
पण लोक स्वतः काही करतील याबाबत मात्र मी काही सांगू शकत नाही.
आणि हो .. ही शेवटची गोष्ट सांगून मी इथे थांबते. कारण त्या नंतर सांगण्यासारखं काहीच उरत नाही.
…. इथून पुढे काहीही झालं तरी चुकूनही ‘ परदेशी वस्तूवर बहिष्कार ’ टाकण्याची भाषा करू नका.
नाहीतर आपण आपलं रोजचं जगणंसुद्धा जगू शकणार नाही. इतके आपण त्यावर अवलंबून आहोत.
त्यामुळे नक्की कुठल्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही लढलात?? … हा आता परत एकदा विचार करा.
आणि मगच पुन्हा भारतात यायचं की नाही याचा निर्णय घ्या.
– – – तोपर्यंत आम्हाला शक्य आहे, आमची स्मृति आहे, तोपर्यंत दर एक ऑगस्टला आम्ही तुम्हाला अभिवादन करूच…
….. पुढचं मात्र काही माहीत नाही.
© तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






