श्री दिवाकर बुरसे
☆ ‘मानाची भिकबाळी’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
पुणे म्हटले की लोकांना प्रथम पेशवाई आठवते. आणि पेशवाई म्हटले की डोळ्यासमोर येतो शनिवारवाडा, कसबा, शनिवार, सदाशिव, नारायण पेठा, लालचुटुक डौलदार झिरमिळ्यांच्या डुलणाऱ्या ब्राह्मणी पगड्या आणि कानात लुटलुटणाऱ्या टपोऱ्या पाणीदार मोती-पाचू-माणकांच्या भिकबाळ्या!
पुणेरी पगडी (आणि हो, भिकबाळीही) विद्वत्तेचे, पांडित्याचे प्रतीक मानले जाते, हे खरे आहे. सध्या पुणेरी पगडी उडविण्याचे, हटविण्याचे प्रयत्न चालले आहेत. मला वाटते, ते योग्यही आहे. विद्वत्ता, पांडित्य यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर त्या ‘तसल्या पगड्या’ आणि ‘भिकबाळ्या’ आता हव्यात कशाला!
तसे पाहिले तर ही पुणेरी पगडी आता कोणी वापरतही नाही. केवळ काही विशेष प्रसंगी, सत्कार समारंभाच्या निमित्ताने, नाटका – सिनेमातून आणि विशेषतः राजकारणासाठीच त्या उपयोगात आणल्या जातात. भिकबाळीचेही तसेच आहे. कानात भिकबाळ्या घातलेली तरुण मुले मात्र हल्ली दिसतात काही वेळा. पण सध्याची ती फँशन असावी. त्याचा विद्वत्तेशी, पांडित्याशी दूरान्वयानेही संबंध नसावा.
मलाही भिकबाळी लहानपणापासून आवडते. आपल्या कानात भिकबाळी असावी असे मलाही वाटायचे. पण ती मला कधीच धारण करता आली नाही. एक संधी आली होती बालपणी, पण ती हुकली. त्यानंतर भिकबाळी घेण्याची ऐपत असतानाही मी घेतली नाही. आणि आता तर तशी इच्छा आणि हौसच मी गमावली आहे.
१९५५ सालची गोष्ट आहे. मी त्यावेळी नऊ वर्षांचा होतो. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज करण्याचे आठ-नऊ हे आदर्श वय. मी कुटुंबातल्या थोरल्या मुलाचा थोरला मुलगा. पहिला नातू. आजोबांनी नातवाची मुंज करायचे घोषित केले. मुंज पुण्यात न करता आपल्या गावी, माळशिरसला (भुलेश्वर, ता. पुरंदर) आपल्या वाड्यात करायची हे ठरले. मुंजीचा दिवसही ठरला. तो होता भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५५. मुहूर्त सकाळी ११ वाजून सात मिनिटे.
एक जानेवारी पासून मंगल कार्यापूर्वीचे कुळाचार, उपक्रम, कर्मकांडे सुरू झाली. कुलदेवता, ग्रामदेवता, सद्गुरुदेवता, कसबा गणपती, जोगेश्वरी यांना निमंत्रणे देऊन झाली.
काही जवळच्या नातेवाईकांकडून गडंगणेर, केळवणासाठी निमंत्रणे येवू लागली. चौधरी शास्त्रीजींकडे दिलेली माझी बबूआत्या, (मागच्याच महिन्यातच तिचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले), वडिलांची देवकीमावशी, समोर राहणाऱ्या लक्ष्मीकाकू, शेजारच्या शाळिग्राम मामी इ. कडचे दिवस ठरले. एका पाठोपाठ धडाक्यात कार्यक्रम सुरू झाले.
त्यातील एक महत्वाचे निमंत्रण आले माझ्या सासवडच्या मावशीकडून. सरदार महादेव रामचंद्र पुरंदऱे यांचेकडून. हे मुळचे श्रीमंत घराणे पण आता त्यांची परिस्थिती डबघाईला आलेली होती. तरीही ‘सुंभ जळाला पण पीळ तसाच राहिलेला’ अशी अवस्था. त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठेला साजेल असाच पुरणपोळीचा बेत केला होता. तीस-चाळीस पान झालं त्या दिवशी. आहेर, मानपान सगळं यथास्तिथ केलं.
दुसरे निमंत्रण आले मामाकडून म्हणजे हिवऱ्याच्या सरदार अण्णाजी बळवंत बोकिलांकडून. (पेशवाईतल्या सखारामबापू बोकिलांचे वंशज) हे माझे आजोळ. माझी आजी, गीताबाई बोकिल ही फार कर्मठ, करारी आणि तालेवार बाई. सासवडला एकटीच रहायची. श्रीमंतीत वाढलेली. माझी आई हे तिचे शेंडेफळ म्हणून लाडाची. तिच्या मुलाची मुंज होत्येय याचे आजीला फार अप्रूप. जेवणाचा थाट थेट पेशवाईचा. चांदीची फुले लावलेले शिसवी पाट, घसघशीत ताटे, त्यापुढे पाच- पाच वाट्या मांडलेल्या. चांदीच्या हत्तीवर लावलेले उदबत्त्यांचे घमघमणारे झाड, प्रत्येक ताटाभोवती सुरेख रांगोळ्या. जेवणात पंच पक्वान्नाचा बेत. जेवणानंतर मुखशुद्धीला गोविंदविडा इ. सर्व काही रीतसर झाले.
सर्वांची जेवणे झाली. ओसरीवर पसरलेल्या जाजमावर सगळे गप्पा मारीत बसले होते. तेवढ्यात आजीने मला प्रेमाने जवळ घेऊन विचारले, “काय रे, तुला मी मुंजीत काय देऊ? सोन्याचे जानवे, बोटातली खड्याची अंगठी की एखादे गळ्यातले बदामाचे लाँकेट? जे तुला आवडेल ते सांग. ” मी आईकडे पाहिले. ती म्हणाली, “अरे, आजी विचारत्येना, मग सांग जे तुला हवंय ते. लाजू नकोस. ” मी विचारात पडलो. माझ्या डोळ्यासमोर ती माणिक – पाचू – मोत्याची, लुटलुट हलणारी भिकबाळी आली आणि मी पटकन सांगून टाकले, “मला भिकबाळी दे. “
आमचा हा आजी-नातू-आईचा संवाद माझे वडील जवळच्या खुर्चीवर बसून शांतपणे ऐकत होते. माझी भिकबाळीची मागणी ऐकल्यावर मात्र ते बोलते झाले. म्हणाले, “अरे, भिकबाळी अशी मागून घेण्यासारखी वस्तू नाहीये रे. ती काही पुरुषार्थ करून, मानाने मिळवायची असते. राजसभेला आपल्या विद्वत्तेने थक्क करणाऱ्या एखाद्या पंडिताला राजा सन्मानाने ती बहाल करतो. आपल्या रामशास्त्र्यांनी कशी मिळवली भिकबाळी श्रीमंत पेशव्यांकडून, तशी मिळवायला हवी”. (हा ‘प्रभात’च्या ‘रामशास्त्री’ चित्रपटाचा परिणाम! ) मी हिरमुसला होऊन, खाली मान घालीत पुटपुटलो, “आजी, तुला जे वाटेल ते दे. जानवं, अंगठी, लाँकेट, काहीही. ” हा विषय तिथेच थांबला. आणि आम्ही पुण्याला परतलो.
ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या मुहूर्तावर माझी मुंज संपन्न झाली. सासवडचे उपाध्याय वे. शा. सं. श्री बगंभटजी यांचे बंधु श्री. बाळंभटजी शाळिग्राम यांच्या पौरुहत्याखाली. चार दिवस सोहळा चालला होता. गावजेवणही घातले गेले.
मुंजीत भिकबाळीऐवजी आजीने मला एक छान सोन्याची आंगठी दिली. भिकबाळीची माझी संधी हुकली होती. एक-दोन दिवसानंतर मी ती आंगठी आईकडे परत दिली, उगाच शाळेत खेळताना हरवायला नको म्हणून!
पाच वर्षांनी एक संधी चालून आली. १९६० साली. या वर्षाचा ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून दे. ऋ. ब्रा. सभेने मला निवडले. माझा सत्कार करून काही रोख रकमेचे पारितोषिक दिले.
घरी आल्यावर मी ही आनंदाची वार्ता आईला सांगितली आणि तिला नमस्कार केला. तिने बक्षिसाच्या रकमेचे पाकीट देवासमोर ठेवायला सांगितले. मी तसे केले, पण माझ्या डोळ्यासमोर ती मोती – माणिक – पाचूची, लुटुलुटु हलणारी भिकबाळी चमकत होती. मी आईला तसं सूतोवाच्यही करून ठेवलं.
रात्री मी झोपलोय असं समजून, आईने वडिलांजवळ भिकबाळीचा विषय काढला. त्यावर वडील म्हणाले, “हे बघ, त्याला आदर्श विद्यार्थ्याचे पारितोषिक मिळाले याचा मला अभिमान आहे. पण ती रक्कम भिकबाळीसाठी उडवावी हे मला पटत नाही. विद्यार्थ्याने ती पारितोषिकाची रक्कम आपल्याला उपयोगी, अवडणाऱ्या पुस्तकांवर खर्च करावी असे मला वाटते. ” झाले. भिकबाळीचा विषय पुन्हा एकदा थांबला! माझ्या कानात ती, विद्वत्ता आणि पांडित्य याचे प्रतीक असलेली भिकबाळी लुटुलुटु हलण्याचा योग पुन्हा एकदा टळला.
काळ जात होता. मी भिकबाळीची हौस विसरत चाललो होतो. वडिलांच्या विचारातही काही तथ्य आहे हे वाढत्या वयाबरोबर मलाही पटू लागले होते.
१९८५ साल उजाडले. ‘आखिल भारतीय नाट्य परिषदेचे’, ‘आषाढातील एक दिवस’ या संगीत नाटकातील उत्कृष्ट गीत/काव्य लेखनासाठी, पहिले, ‘छोटा गंधर्व गुण गौरव पारितोषिक’ मला घोषित झाले. मुंबईला जाऊन मी पारितोषिक घेऊन आलो. आई – वडिलांना नमस्कार करून ते पारितोषिक त्यांच्या पायावर वाहिले. डोळ्यासमोर ती मोती – पाचू – माणकाची भिकबाळी पुन्हा चमकली, पण मी गप्प बसलो.
१९९३ साली माझा ‘यंत्रदासविरचित’ ‘सुरक्षितता’ विषयावरचा ‘श्री सुरक्षिताबोध’ पुण्याच्या ‘टेल्को’कंपनीने प्रकाशित केला आणि त्याला ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा’च्या पहिल्या साहित्य संम्मेलनाने ‘सुरक्षितता विषयावरील सामाजिक जाणीवा निर्माण करणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथ’ म्हणून प्रथम पारितोषिक देऊन गौरविले. एकशे वीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशातील ‘सुरक्षितता’ या वेगळ्या विषयावर इतक्या अनोख्या शैलीत ग्रंथ लिहिणारा मी पहिलाच ग्रंथकार होतो! सर्व बाजूंनी कौतुकांचा वर्षाव झाला. दिल्लीच्या ‘नँशनल सेफ्टी कौन्सिल’चे अध्यक्ष श्री गुप्ता यांनी त्या ग्रंथाला ‘सुरक्षिततेची गीता’ म्हणून गौरविले. डाँ. नीलकंठ कल्याणी, उद्योग महर्षी ऋषितुल्य श्री शंतनूराव किर्लोस्कर, साहित्यिक विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, द्वा. वा. केळकर, इ. मान्यवरांनी मला व्यक्तिगत प्रशस्तिपत्रे पाठवून गौरविले. विद्वत्तेच्या बहुतेक सर्व मांडवाखालून जाण्याचे भाग्य मला त्या निमित्ताने लाभले. ‘पुण्याच्या लौकिकात भर घालणारा नागरिक’ म्हणून पुण्याच्या महापौरांकडून कौतुक झाले. सकाळ, केसरी, म. टा. , लोकसत्ता, टाईम्स इ. वृत्तपत्रांनी त्या ग्रंथावर स्फुटे, परीक्षणे, संपादकीये लिहिली. ‘घरोघरी असावा असा श्री सुरक्षितताबोध’ म्हणून वाखाणले. खूप कौतुक झाले. आता मला आणि माझ्या ग्रंथाला राजमान्यता मिळविली होती.
हे सर्व मानसन्मान आणि पारितोषिके मी माझ्या थकलेल्या आईच्या चरणांवर अर्पण केली. माझे हे यश पाहून तिचे डोळे पाणावले. कौतुकाने तिने माझ्या गालावरून आपले सुरकुतलेले, रुक्ष हात फिरविले. तिच्या डोळ्यातून दोन आसवे ओघळून माझ्या हातावर पडली. मी विचारले, “काय झालं? ” तर ती म्हणाली, ” अरे, हे आनंदाचे आश्रू आहेत. मी खूप आनंदी आहे आज. पण,.. “. “पण काय? ” मी विचारले. तर म्हणाली, “आज ‘हे’ असते तर त्यांना फार आनंद झाला असता तुझे हे कर्तृत्व पाहून. त्यांनी आपल्या हाताने तुझ्या कानात ‘मानाची भिकबाळी’ चढवली असती”.
भीकबाळीविषयीचे त्यांचे तत्वज्ञान आईच्या लक्षात होते तर अजून. मी सुन्न झालो ते ऐकून. माझ्या डोळ्यापुढे मी कधीही न धारण केलेली ती मोती-पाचू-माणकाची ‘मानाची भिकबाळी’ लुटलुटत होती.
वडिलांना इहलोक सोडून सात वर्षे लोटली होती. मी राजमान्यता मिळविली होती. वडिलांच्या इच्छेप्रमाणे मी ग्रंथकार, पंडित, कवि हा लौकिक यथामती प्राप्त केला होता. पण ते पहायला वडिलच हयात नव्हते. आता मला भिकबाळीची हौस उरलेली नाही. मी यापुढे कधी ती धारण करीन आसेही वाटत नाही.
पण जेव्हा जेव्हा मी दगडुशेट गणपतीचे चित्र बघतो, त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेतो त्या त्या वेळी माझे ध्यान गणेशाची महाकाय तुंदिल तनू, वक्रतुंड, नाना सुगंधाने थबथबा गळणारे गंडस्थळ, कंठातल्या मुक्ताफळांच्या माळा, हिरेजडित किरीट, तीक्ष्ण दंष्ट्र, सरळ सोंड, चंदनचर्चित मलपे दोंद, झळाळणारा पीतांबर, त्यावर वेटोळे घालून बसलेला, इकडेतिकडे चपळाईने टकमक बघणारा कटीचा नागबंध, चरणी बोभाटणाऱ्या वाकिया, घागरिया, रुणझुणणारी नूपुरे, रत्नखचित फरा, हातातील रसाळ मोदक या कशाकडेही न जाता सर्वप्रथम श्री गजानगाच्या लवलवित फडकणाऱ्या कर्णथापा म्हणजे कान आणि त्या शूर्पकर्णातील लुटलुटणाऱ्या, चमकणाऱ्या, मोती-माणिक-पाचूजडित भिकबाळीकडे जाते. दुसऱ्याक्षणी काहीसा ओशाळून भक्तिभावाने मी त्या विघ्नहर्त्या सुखकर्त्या, बुद्धिदात्यापुढे माझे भिकबाळीहीन कान उभयहस्ते पकडून, क्षमायाचना करतो, लीन होतो आणि त्याला साष्टांग नमस्कार घालतो!
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





