श्री जगदीश काबरे
☆ मैत्र… ☆ श्री जगदीश काबरे ☆
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मैत्री, नातेसंबंध आणि आपली तत्वे ह्या भिन्न गोष्टी आहेत. त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. महात्वाचे म्हणजे जे संबंध अटीतटीवर उभारले जातात ते कधीच टिकाऊ नसतात. कारण प्रेम समोरच्याकडून कसलीही अपेक्षा न करता फक्त देणं जाणते. मी जर माझ्या तत्वांशी प्रामाणिक राहून लोकांशी प्रेमाने वागू शकतो तर, मला समोरचा माझ्याशी कसा वागेल याची भीती वाटायला नको. पण मित्र वा आप्त जर अटी घालत असतील की, ‘तू जर देवाधर्माचं करशील तरच तुला आम्ही साथ देऊ. ‘ तर त्याला emotional blackmailing म्हणता येईल, जे सर्वार्थाने चुकीचे आहे. त्याला बळी पडायचे की नाही हे सर्वस्वी तुमचे विचार किती ठाम आहेत त्यावर अवलंबून आहे.
माझ्या आयुष्यातही अनेक चढउतार आले, तेव्हा मित्रांनी असेच सांगितले की, ‘तू देवाधर्माचं करत नाही म्हणून तुझ्या मागे ही साडेसाती लागली आहे. ‘ पण मी माझ्या नास्तिक विचारांशी ठाम असल्यामुळे मी त्यांना सांगितले की, ‘मी तसे काहीएक करणार नाही. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त होतच असतं. तुम्ही एवढी देवदेवस्की करता तरीही आजारी पडताच ना? देवपूजा करूनही तुमच्या आयुष्यातही मग का संकटं येतात? म्हणून संकटं येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच असे आपण का समजू नये? विपरीत परिस्थितीतही वैज्ञानिक विचारसरणीने आणि विवेकवादी वृत्तीने मार्ग काढता येतो. पण त्यासाठी परिस्थिती आहे तशी स्वीकारून न डगमगता परिस्थितीला शांतचित्ताने सामोरं जाणं हाच खरा उपाय आहे. अशी परिस्थिती का निर्माण झाली यावर साधकबाधक विचार करून त्यातून बाहेर पडण्याचा नेमका मार्ग आपल्याला शोधता आला पाहिजे. माझा ठामपणा पाहून त्यांनी तो विषय पुढे वाढवला नाही. अनुभवाने मला हे कळले आहे की, प्रवाहाविरुद्ध पोहतांना सुरुवातीला जरी आप्तमित्र विरोध करत असले तरी नंतर निदान समोर तरी काही बोलत नाहीत. म्हणजेच लोक चार दिवस बोलतात आणि नंतर ‘तू आणि तूझं आयुष्य’ असं म्हणून आपल्या कामाला लागतात.
तेव्हा आप्तमित्रांना प्रेम आणि तत्वे यातील फरक समजावून सांगा आणि हेही सांगा की, ‘आपले संबंध मतलबावर अवलंबून नसून निखळ प्रेमावर आहेत. प्रेम हे आपल्या माणसाला बंधनात अडकवत नाही, तर त्याला खुलेपणाने त्याच्या आयुष्यात त्याच्या तत्वानुसार वागण्याची मुभा देते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या नास्तिक्यामुळे जर संकटं येणार असतील तर मी त्यांच्याशी दोन हात करायला समर्थ आहे. आपली मैत्री ही मतलबावर नाही तर माणुसकीच्या पायावर उभी आहे, आणि तिच्यात काशामुळेही अंतर येणार नाही. निदान माझ्या बाजूने तरी…’
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





