श्री सुधीर करंदीकर
☆ “गणपती बाप्पांच्या मनातलं…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
नुकताच आपण सगळ्यांनी गणपती उत्सव खूप आनंदाने आणि मजेत साजरा केला.
ह्या वेळच्या उत्सवाची माझी एक छान आणि believe it or not अशी आठवण ————-
गणपती उत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवशीची ही घटना आहे. उद्याची सगळी तयारी झाली होती. सकाळी लवकर जाऊन बाप्पांची मूर्ती पण घेऊन आलो होतो.
माझ्या नित्य नियमाप्रमाणे सकाळी सकाळी टेबलवर चार वर्तमानपत्रे आलेली होती. माझे वर्तमानपत्रांचे पारायण सुरू होते, अधून मधून फेसबुक आणि वॉट्सअप कडे पण भटकंती सुरू होती. आणि गरमागरम चहा पण घेत होतो.
अचानक स्वयंपाक घरातून मस्त गोडसर असा सुंदर वास यायला लागला. बायकोला आवाज दिला आणि विचारलं – आज काय स्पेशल आहे? सुंदर गोड वास येतोय.
बायको – अहो उद्यापासून गणपती उत्सव सुरू होतोय. रोजच्या संध्याकाळच्या प्रसादाकरता पंचखाद्य करते आहे.
मी सहजच मनात म्हटलं – गणपती बाप्पा तुम्हाला गोड आवडतं म्हणून प्रसादाकरता सुंदर पंचखाद्य तयार होतय, आणि रोजच्या सकाळच्या प्रसादाकरता मोदक, शिरा असे गोड पदार्थ असणारच आहेत.
आपल्या दारावर जसा टकटक आवाज येतो, तसाच काहीतरी आवाज देवघरामधून येतोय असा मला भास झाला. माझ्या काही लक्षात येईना. मी इकडे तिकडे बघत होतो, तेवढ्यात देवघरातून कुणीतरी बोलतय असं वाटलं, म्हणून देवघराकडे गेलो, आणि माझी शंका खरी ठरली. तिथूनच बोलण्याचा आवाज येत होता.
देवघरा मधून: मी गणपती बाप्पा बोलतोय
मी चांगलाच गडबडलो. मी स्वतःला दोन-तीन ठिकाणी चिमटे काढून बघितले. सगळ्याच ठिकाणी चिमटे जाणवत होते, म्हणजे मी शुद्धीवर नक्कीच होतो. म्हणजे देवघरातली आज आणलेली गणपतीबाप्पांची मूर्तीच बोलत असणार. मी वाकून नमस्कार केला.
देवघरातून: सुखी राहा. तुझा अंदाज बरोबर आहे. मीच गणपती बाप्पा बोलतोय.
मी पुन्हा वाकून नमस्कार केला.
गणपती बाप्पा: तुला कोणी सांगितलं की मला गोड आवडतं म्हणून
मी: तसं सांगितलं कोणीच नाही. पण फोटोमध्ये तुमच्या समोर मोदकांचं आणि गोड पदार्थांची ताटे असतात, सगळ्या गणपतीच्या देवळांमध्ये उत्सवाच्या वेळेस आणि रोजच गोड पदार्थांचा प्रसाद असतो, बऱ्याच पौराणिक कथांमध्ये पण तसा उल्लेख आहे. आम्ही आपलं तेच खरे मानून सुरू ठेवतो. आमचं काही चुकत असेल तर सांगा
गणपती बाप्पा: तुम्ही प्रसाद म्हणून मोदकाचे ताट माझ्यासमोर ठेवता, पण पूजा झाल्यानंतर किंवा आरती झाल्यानंतर मी खाल्ल्यामुळे काही मोदक कमी झाले आहेत कां? किंवा लाडू कमी झाले आहेत, शिरा कमी झाला आहे, असं कधी बघितलं आहे कां ?
मी: नाही, तसं दिसलं कधीच नाही. आणि कुणी तसा विचार केला असेल असे पण वाटत नाही. सगळेच जण देवासमोर नैवेद्य दाखवतात, आणि आरती संपली की लगेच त्याचे वाटप आणि खाण्यास सुरूवात होते. तुम्ही खाल्लाय का नाही, हा विचारच कोणाच्या मनात येत नसावा. तुम्हाला गोड खरोखरच आवडत नाही का!
गणपती बाप्पा: आवडत नाहीच, असं नाही, पण मला गोड पदार्थांपेक्षा गोड माणसं जास्त आवडतात. माणसं म्हणजे स्त्री – पुरुष – मुलं – मुली असे सगळेच त्यामध्ये आले. गोड माणसे म्हणजे काय ते लक्षात आलं ना!
मी: अर्थ समजेल असं लक्षात येत नाहीये
गणपती बाप्पा: गोड माणसं म्हणजे –
नेहमी गोड बोलणारी माणसं मला आवडतात. नुसतं वरवर गोड बोलणारी माणसं घराघरात आणि समाजात सगळ्याच थरांमध्ये आहेत. आपल्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावल्या जात असेल, तिला कमी लेखण्याचा प्रयत्न आपल्या बोलण्यात असेल, बोलण्यात अहंभाव म्हणजे मी आहे म्हणून सगळे आहे – असा भाव असेल, तर या बोलण्याला गोड बोलणे म्हणत नाहीत. गोड बोलणं हे मनापासून असलं पाहिजे.
आपापसात गोडी निर्माण करणारी माणसं मला आवडतात. कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्याकडून होईल तेवढी मदत इतरांना करणारी माणसं सभोवार गोडी निर्माण करत असतात, ती मला आवडतात.
गोड स्वभावाची माणसं मला आवडतात. यांचा स्वभाव स्वच्छ असतो, मनामधे घमंड नसते, मनात कपट नसतं. मनात कुणाला फसवणे किंवा कोणाला फसवून आपला फायदा करणे हा विचार नसतो. कुणाला त्रास देणे, मारहाण करणे, अशी यांची विचारसरणी नसते.
मला गोड हसणारी माणसे आवडतात. काही माणसांचे चेहेरे कायम एरंडेल तेल प्यायल्या सारखे असतात. मी त्यांना आतून सुचवत असतो, कि काळजी माझ्यावर सोडा, थोडे मोकळे व्हा, पण कुणाचं माझ्या सांगण्याकडे लक्षच नसत. खोटे हसणारी माणसे पण भरपूर आहेत. पण अशा लोकांच्या हसण्यात खळखळणारा गोडवा नसतो कारण त्यांच्या मनात गोडवा नसतो.
सर्वांगाने गोड असणारी माणसं मला आवडतात. प्रसाद – पूजाअर्चा – देवदर्शन हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. देवळामध्ये किंवा मूर्तीमध्ये देव बघण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला देव बघता आला, तर तो तुमच्या मनाचा गोडवा, आणि ती तुमची खरी उंची.
माझ्या करता प्रसाद गोड ठेवला काय, किंवा तिखट ठेवला काय, किंवा आंबट ठेवला काय, मला काहीच फरक पडत नसतो, कारण मी यामधलं काहीच खाणार नसतो. तुम्हीच तो प्रसाद संपवणार असता. उत्तम तब्येतीकरता खरंतर गोड तिखट कडू आंबट खारट तुरट अशा सगळ्याच चवी थोड्या थोड्या प्रमाणात पोटात जाणे जरुरी असते. म्हणून नेहेमी अशा विविध चवींचे प्रसाद असावेत.
सार्वजनिक गणेशोत्सवामुळे लोक एकत्र येतात, मंडळांचे गणपती बघण्याकरता एकत्रपणे बाहेर पडतात, निरनिराळ्या क्षेत्रांमधल्या कलाकारांना आपली कला लोकांपुढे सादर करण्याची संधी मिळते. लोकांना पण आनंद मिळतो. काही मंडळांचे, काही सोसायटीं मधले कार्यक्रम खरोखरच सुंदर असतात आणि मला ते आवडतात. जिथे सगळेच लोक आनंदी असतात तिथे मला राहायला नक्कीच आवडते.
दुसरा विचार म्हणजे चतुर्थीला तुम्ही आपापल्या घरी माझी स्थापना करता आणि दीड दिवसांनी/५ दिवसांनी/अनंत चतुर्दशीला माझे विसर्जन करता. विसर्जन का करता हे मात्र मला समजत नाही, माझी तर राहण्याची इच्छा असते. सगळेजण विसर्जन करताना “गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या” गर्जना करत करत विसर्जन करतात. तुमच्या ‘लवकर या’ ह्याला प्रतिसाद म्हणून बऱ्याच वेळा तुमच्याकडे लवकर जावं अशी माझी इच्छा होते, पण येता येत नाही कारण पुढच्या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातली चतुर्थी उजाडते तेव्हाच तुम्हाला माझ्या येण्याचे वेध लागतात.
विसर्जन करताना बरेच जण “गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला” अशा गर्जना करतात. खरं तर मला गावाला जायचंच नसतं कारण मलाच चैन पडणार नसते. असो,
माझी किंवा कुठल्याही देवतेची स्थापना तुमच्या घरात उत्सवाच्या स्वरूपात कायमस्वरूपी असावी असे मला वाटते, कारण त्यात तुमचाच फायदा आहे.
आता बघा, घरात दोघेजण असले तरी त्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असतात, संवाद नसतो. घरात चार जण असले, तर तोंडे चार दिशेला आणि संवाद शून्य. अशा घरपणाला काय अर्थ आहे. गणपतीच्या दिवसात घरातली सगळी मंडळी आरतीच्या निमित्ताने एकत्र येतात, जवळपासचे नातेवाईक/मित्रमंडळी पण मुद्दाम घरी येतात, मनोभावे देवाची पूजा होते, आरती होते, पौष्टिक पदार्थांच्या प्रसादाची देवाणघेवाण होते, एकमेकांची चौकशी/ विचारपूस होते. आणि त्यावेळेस सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती मला निख्खळ आनंद दिसत असतो. आणि यालाच घराला घरपण आहे असे म्हणतात. किती मोठा प्लस पॉईंट आहे हा तुमच्याकरता.
तुम्ही घरामध्ये वर्षभर म्हणजे कायमस्वरूपी गणपतीची स्थापना ठेवली, तरी, मी घरात आहे म्हणून तुम्हाला वेगळे असे काहीच करावे लागणार नाही. तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल, तर नेहेमीप्रमाणे तुम्ही घराला कुलूप लावून जाऊ शकता. मला घरातून बाहेर जाण्याकरता किंवा आत येण्याकरता घराचे दार उघडे पाहिजे असं काहीच नाही. रोज आरती/पूजा/फुले/प्रसाद पाहिजेच असे पण काही बंधन नाही. मी उत्सवाच्या स्वरूपात कायम घरात असलो, कि, घरातल्या सगळ्यांच्या सोयीने ठराविक वेळेला सगळेजण रोज एकत्र येतील, महिन्यातून एक दिवस/पंधरा दिवसातून एक दिवस मित्रमंडळी, गावातले नातेवाईक एकत्र येऊ शकतील. संवाद होईल, गप्पा होतील. सगळेजण मोबाईल, टीव्ही बंद करून पूजा/आरती करतील, एकमेकांची विचारपूस करतील. सगळ्यांना आवडेल असं काहीतरी प्रसाद म्हणून एकत्र बसून खाणे होईल. आणि याच बांधिलकीनी तुमच्या घराला कायमस्वरूपी घरपण येणार आहे. घराला घरपण आलं की तुमच्या मध्ये आपोआपच गोडी निर्माण होईल. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे मला गोड पदार्थांपेक्षा गोड माणसं आवडतात. ट्यूब पेटते आहे का?
मी: बाप्पा, असा विचार माझ्या तर कधी डोक्यात आलाच नाही. मी तर नक्की यापुढे असेच करणार आणि यावर थोडं लिहून ते ओळखीच्यांना पण कळवणार हे नक्की
गणपती बाप्पा: तथास्तु
मी एकदम तंद्रीतून जागा झाल्यासारखा जागा झालो. गणपती बाप्पा ने सांगितलेले सर्व विचार माझ्या डोळ्यासमोरून जायला लागले.
मी माझे गणपती बाप्पा बरोबरचे हे बोलणे बायकोला/मुलींना सांगितले, काही मित्रांना फोन करून सांगितले. पण घरातले गणपती बाप्पा बोलले आणि ते पण चक्क माझ्याशी, ही विश्वास न बसण्यासारखीच गोष्ट असल्यामुळे कोण विश्वास ठेवणार! तुमचाही कदाचित विश्वास बसणार नाही.
असो, आपल्या घरातल्या सगळ्यांनी गोड व्हावे हे तर नक्कीच सगळ्यांना पटण्यासारखे आहे. बरं गोड माणसं सगळ्यांनाच आवडतात हे सत्य आहेच. आणि जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला हे पण आपण जाणतोच. आणि याकरता करायचे काय आहे? तर घरामध्ये बाराही महिने गणपतीची स्थापना! आणि ती कशी! तर, घरातल्या सगळ्यांनी कायम गोड बोलून, गोड वागून, गोड हसून.
चला तर मग –
गणपती बाप्पा मोरया…
नेहमीच आमच्या घरात राहा…
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






उत्तम विचार चांगली मांडणी. आम्ही गणपती विसर्जन करत नाही. कुणाला दुखवतही नाही. विश्वास दाते.