श्री संदीप रामचंद्र सुंकले
मनमंजुषेतून
☆ एका पथिकाचे मनोगत… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
सध्या ५१ वे वर्ष सुरू आहे. थोडक्यात वयाची पन्नाशी उलटली….., अर्धे आयुष्य जगून घेतले…..
मागे वळून पाहताना, अनेक गोष्टी आठवल्या, जाणवल्या…..!
काही घटना आयुष्यात तात्पुरते दुःख देऊन गेल्या, तर काही सुख देऊन गेल्या….
गेल्या हे मात्र खरे….
घटना घडतांना मात्र त्या निघून जाणारं आहेत असे वाटले नव्हते….
त्यामुळे त्याचे त्यावेळी उचित असे सुखदुःख वाटले…
उपजत अंगी असलेले मानसिक धैर्य, घरातील संस्कार आणि आशावादी दृष्टिकोन यांमुळे आयुष्यात फार कमी वेळा निराश झालो…
यात माझे मोठेपण आहे असे मात्र अजिबात नाही….गोष्टी घडत असतात, तशा त्या घडत गेल्या असे म्हणता येईल….
थोडी समज आल्यावर त्या घटनांचा मी साक्षीदार होऊ लागलो….
– – आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार होणे खुप फायद्याचे ठरते असे लक्षात आल्यावर त्याचा उपयोग मी करू लागलो आणि वाढत्या वयासोबत मी अधिकाधिक निश्चिंत होत गेलो…..
खऱ्या साक्षीदाराला शिक्षा होत नसल्याने मी स्वतः ला कधीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले नाही….
त्यामुळे जीवनाकडे तटस्थपणे पाहता आले, जीवन आनंदाने जगता आले, खरे सांगायचे तर आनंदाने जगायला शिकत आहे…..
आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अनेक माणसे भेटली…
अनेक प्रकारची भेटली, प्रत्येकाने विविध मार्गाने आणि संदर्भाने मला समृद्ध केले…
जे मला सज्जन वाटले त्यांनी कसे वागावे हे शिकविले आणि जे मला दुर्जन वाटले त्यांनी कसे वागू नये हे शिकविले……
त्यातील माझ्या अल्पमती ला जे झेपले त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न मी करीत आलो आहे…
बालपणी संघाच्या शाखेत गेल्यामुळे माझ्या आयुष्याला एक प्रकारची शिस्त लागली आणि पुढे श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराजांच्या सान्निध्यात आल्याने जीवनामध्ये तटस्थपणे पाहण्याच्या माझ्या स्वभावाला अधिक चांगले वळणं लागले…
कर्म करण्याचा अधिकार आपल्याला आहे, फळाची अपेक्षा आपण करू नये हे मला गोंदवल्यात जाऊन मला समजले…
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जशी नवनवीन माणसे मला भेटली तशी काही जवळची माणसे मला सोडून गेली…
माणसे सोडून जातात, काही देहाने पुन्हा भेटत नाही, तर काही मनाने दूर जातात….
ती जेव्हा जातात, तेव्हा दुःख होत, पण कालांतराने विधात्या ची इच्छा उचित होती हेच लक्षात येत, मग आपण त्यात फार गुंतून रहात नाही…
गुंता तसाही वाईटच….
मग तो
केसांचा….
नात्यांचा….
अथवा
भावनांचा….
आधीच्या विविध अनुभवांनी मी कधी कोणत्या गुंत्यात अडकलो नाही…
प्रेम जगावर केलं, पण कशातच गुंतलो नाही…. त्यामुळे अनेकांवर सारखे प्रेम करू शकलो…
आज पन्नास ओलांडले असले तरी मी स्वतःला तरुणच समजतो आणि तसेच जगतो….
आता कुठे पन्नाशी आली आहे.. अजून ७० वर्षे जगण्याची इच्छा आहे….
…. साठ वर्षे प्रपंचा साठी आणि बाकीची समाजासाठी…
पुढील साठ वर्षात स्वतःसाठी, वैयक्तिक लाभासाठी कोणतीही गोष्ट करायची नाही असा निश्चय आहे…..
जीवन आनंददायी आहे, ते आनंदाने स्वीकारले पाहिजे, म्हणजे मग ते आनंदाने जगता येते…..
आधी लिहिलेलं एक वाक्य पुन्हा
आपण जीवन आनंदाने जगायला सुरुवात करु, त्यासाठी जिवनात घडणारी प्रत्येक गोष्ट दिलदार वृत्तीने स्वीकारू म्हणजे प्रत्येक जीवनात घडणाऱ्या गोष्टीला प्रतिक्रिया न देता आपल्याला प्रतिसाद देता येईल…
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





सुंदर आत्मचिंतन…सिंहावलोकन आयुष्याचे