सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ भाऊबीज… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

बहिण भावाच्या प्रेमाची ही बीज!

रुजवते मनी वेल तो सौख्याचा! 

आपोआपच असे शब्द मनी उमलतात! एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे दोन जीव- मुलगी आणि मुलगा- नातं घेऊन येतात बहिण भावाचे! ते नातं निभावलं जातं दरवर्षी एकमेकांसाठी आनंद देऊन!

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही दिवस पौराणिक कथांवर आधारित गोष्टींचे! दिवाळीची सुरुवात अभ्यंग स्नानाने शुचिर्भूत होऊन केली जाते आणि लक्ष्मीची पूजा सर्वांनाच आवश्यक असते कारण धनलक्ष्मी शिवाय व्यवहारच होऊ शकत नाहीत!

पण नातेसंबंधांची वृद्धी करणारे सण हे मात्र पाडवा आणि भाऊबीज! पाडवा हा पती-पत्नीतील प्रेमाचा,  आदराचा आणि कुटुंबाला टिकवून ठेवणाऱ्या नात्याचा सण तर भाऊबीज ही बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक!

हे नातं स्त्रीचे माहेराशी असलेले प्रेम टिकवून टिकवून ठेवते.. पौराणिक कथेत यम आणि यमाची बहीण हे भाऊबीजेचे मूळ स्त्रोत असे पाहतो,  पण आता आपण पाहतो ती भाऊबीज वेगवेगळ्या स्वरूपात!

लहानपणी भाऊ-बहीण भांडतात,  खेळतात,  वाढतात,  एका घरात.. तेव्हा हा नातेसंबंध दृढ होतो तो भाऊबीजेने! मला आठवतं तेव्हापासून भाऊबिजेच्या भेटवस्तूची मी अगदी वाट पाहायची. पण बरेच वेळा दिवाळीसाठी घेतलेला एकच ड्रेस,  पहिल्या दिवशी आणि भाऊबीज म्हणूनही तोच पुढे केला जाई.. अर्थात तेव्हा परिस्थितीच तशी होती. जे मिळेल ते आनंदाने घ्यायचं एवढंच माहिती! तरीही माझा भाऊ कौतुकाने चार आण्याची नाणी आधीपासून जमवून ठेवीत असे आणि छान लाल कागदात चॉकलेट सारखी गुंडाळी करून देत असे. तेव्हा त्याने कुठेतरी ऐकले होते की,  1962 सालच्या नाण्यांमध्ये सोनं असतं म्हणून त्याने ती नाणी गोळा केली होती. खरं खोटं देव जाणे,  पण त्यामधून मला त्याची भावना दिसत असे!

अशी ती नवलाईची भाऊबीज भाऊ मोठे झाल्यावर बदलत गेली. दोन्ही भाऊ नोकरीला लागले,  मग दर वर्षी दोन दोन साड्या मिळू लागल्या. पुढे लग्नानंतर ते अप्रूप कमी झाले आणि मुलांच्या भाऊबीज सुरू झाल्या. आते,  मामे,  चुलत अशी भावंडे जमू लागली आणि एकत्र जमून भाऊबीजेचा आनंद घेऊ लागली.

आत्ता मला आठवत आहेत त्या पूर्वायुष्यातील दोन मोठ्या भाऊबीज! भावाचे नाते कसे भक्कम असते ते दाखवणाऱ्या..

कॉलेजच्या काळात मी हॉस्टेलवर राहत होते. दिवाळीच्या सुट्टीत मी आणि माझा मोठा भाऊ आई वडील ज्या ठिकाणी होते तिथे मिळून जात असू. एका वर्षी आम्ही दोघे एसटीने निघालो. पंढरपूर मार्गाने जाताना त्यावेळी बरेच ओढे होते आणि त्या ओढ्यांना पूल नव्हते. दिवाळीच्या दरम्यान त्यावेळी अवकाळी पावसामुळे ओढे दुथडी भरून वाहत होते. एसटी ड्रायव्हरने ओढ्यात बस घालायचे धाडस केले नाही. रात्रभर आम्ही ओढ्याकाठी बस मध्ये बसून होतो. सकाळी पाणी थोडे कमी झाले,  म्हणून बस मधील लोक हळूहळू पलीकडच्या तीरावर जाण्यास निघाले.

माझा भाऊ मला म्हणाला,  ‘आपण पलीकडे जाऊ शकतो,  पण तू माझा हात सोडायचा नाही,  तो चांगला पट्टीचा पोहणारा होता. त्याने माझा हात घट्ट पकडून मला बरोबर नेले. मध्ये मध्ये ओढ्यामधील झाडाझुडपांचे काटे बोचत होते,  दगड टोचत होते,  त्यातून मी उंचीने कमी त्यामुळे मधून मधून माझे डोके पाण्याखाली जात होते,  पण आम्ही एकमेकाचा हात सोडला नाही आणि ओढा क्रॉस केला. आता त्या ठिकाणी पूल आहे पण पन्नास वर्षांपूर्वी ही सगळी कसरत भावाबरोबर मी केली. माझ्या मोठ्या भावाची ही मोठ्ठी भाऊबीज माझ्यासाठी होती!

अशीच एक आठवण दुसऱ्या भावाची! आम्ही तेव्हा पाटणला होतो आणि ह्यांची बदलीची ऑर्डर आली. त्या ठिकाणी हजर होण्यास फक्त दहा दिवस हातात होते. यावेळी पाटणहून शिरपूरला (धुळे जिल्हा) जनरल ट्रान्सफर झाली होती. आणि माझे दिवस भरत आले होते..

नववा महिना लागला होता.

दिवाळीचे दिवस होते. त्यामुळे माझा भाऊ भाऊबीजेसाठी फलटण हून पाटणला आला होता. आम्ही तेव्हा बदली आणि माझे बाळंतपण या व्यवधानात होतो. त्याने ते ऐकले. तेव्हा म्हणाला,  ‘ एवढी कशाला काळजी करता,  तिला फलटणला पोचवा. तेव्हा माझी आई त्याच्याकडेच होती. अर्थातच दिवाळीनंतर लगेचच मला फलटणला पोहोचवून हे निश्चिंत मनाने शिरपूरला हजर होण्यासाठी गेले. पुढे आठ दिवसातच माझी डिलिव्हरी होऊन कन्या रत्न झाले! माझ्या भावाची ही मोठी ओवाळणी त्यावर्षी मला होती!

अशा आठवणी मनाच्या कुपीत साठवल्या जातात. आणि ती कुपी उघडली की त्याचा सुगंध दरवळतो.. भाऊबीज हा सण बहिण- भावाच्या नात्याला दृढ करणारा सण आहे. ते नातं मनात कायमच घर करून असतं! अजूनही दिवाळी,  भाऊबीज आली की,  या आठवणी माझ्या मनात अलगद उतरतात आणि पुनः प्रत्ययाचा आनंद देतात!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted