सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “पाडगावकर ऐकतांना…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
माणसं आता शीळ घालत नाहीत आणि हात हातात घालून जात नाहीत. प्रत्येक वाट गोंगाटाच्या रानातून भयाण शांततेकडे जाते. साऱ्यांची मान खाली असते.. डोळे पडद्यावर.. लॅपटॉपच्या बटनावर.. बोटांची ठोकाठोकी….. त्यावर माणसं ताल देत नाहीत कारण त्यांचाच तोल बिघडत असतो.
….. असं सतत असल्यावर माणसं कुठून गाणार ?
…. पाडगावकर माणसं आता गात नाहीत आणि हातात हात घालून जात नाहीत …
कटूतेचा पाऊस घर सोडून नव्हे फोडून जातो
विश्वासाचा कणा केव्हाच मोडून जातो
बाळाचा पापा घ्यायला त्याला वेळ नसतो /
…. पाडगावकर माणस आता गात नाहीत.. हातात हात घालून जात नाहीत …
पेटलेल्या दंगलीत माणुसकी खाक झाली
लोकल मधल्या स्फोटात माणसांची राख झाली
तुमच्या माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटनेला पुरावे लागतात पाडगावकर
. कुंडीमध्ये फुलं लावणे बंद झाले …. द्वेषांचे मळे फुलवणारे धुंद झालेत
– – बरं झालं पाडगावकर तुम्ही या जगात नाहीत ….
…. नाहीतर तुम्ही लावलेल्या कुंडीतील रोप उपटणारे पाहून तुम्हाला दुःख झालं असतं
खरंच सांगतो पाडगावकर ….
माणसं आता गात नाहीत
हातात हात घालून जात नाहीत
हातात हात घालून जात नाहीत….
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




