सौ. उज्ज्वला केळकर
☆ चित्राचे अंगण…. – भाग – १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
परवा आमच्या शेजारचं एक बाळ रडत होतं. असेल दोन अडीच वर्षाचं. त्याच्या आईने मोबाईलवर गाणं लावलं आणि ती त्याला रिझवू लागली. मला एकदम आठवण झाली, आमच्या लहानपणी बाळ रडायला लागलं , की आई किंवा घरातलं कुणी तरी त्याला अंगणात नेई आणि गाणं म्हणे,
‘बाळाच्या अंगणात कोण कोण आलं बाई, कोण कोण आलं ? मग बाळाच्या अंगणात चिमण्या चिवचिवून जात. काऊ, मैना, पोपट, साळुंक्या येत. माऊ, भू भू, गाय , बैल, हरण, ससा येत. म्हणणाराची कल्पनाशक्ती जेवढी मोठी, तेवढा गाणं लांबे. हे गाणं आठवता आठवता मला एकदम सुचलं. कसं सुचलं, कुणास ठाऊक? मला सुचलं ,
‘चित्राच्या अंगणात कोण कोण आलं बाई कोण कोण आलं ?
कोण कोण आलं बाई, त्यांनी काय काय केलं, बाई काय काय केलं? ‘
.. .. पण ही चित्रा कोण? तिच्या अंगणात म्हणजे तिच्या मनाच्या अंगणात का? नाही. …. मनाच्या अंगणात नाही. जीवनाच्या अंगणात…
‘चित्राच्या अंगणात (जीवनात) कोण कोण आलं बाई कोण कोण आलं ?
चित्राच्या मनात कोण कोण राहिलं बाई, कोण कोण राह्यलं ?
मग तिने काय काय केलं बाई काय काय केलं ?
मग तिने त्यांना कागदावर उतरवलं बाई , कागदावर उतरवलं.
मग तिने त्यांना कागदावर उतरवलं बाई , कागदावर उतरवलं.‘
– – – त्या कागदावर उतरवलेल्या माणसांच्या मग झाल्या कथा …..
चित्रा म्हणजे श्री.ज.जोशी यांच्या घरातील एक प्रकाशमान नक्षत्र. १९४८साली, ते त्यांच्या घरात दाखल झालं. दिसायला सुरेख, म्हणून चित्रा नाव ठेवलं असेल, किंवा चित्रा नक्षत्रावर जन्मलेली, म्हणून चित्रा नाव ठेवलं असेल. दोन्ही दृष्टीने नाव यथार्थ होतं. श्री. ज. जोशी म्हणजेच श्रीकृष्ण जनार्दन जोशी. मराठीतील एक जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक. मराठी साहित्याचा आढावा, त्यांचा नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. तर अशा साहित्यिकाचा वारसा आपल्या कुवतीप्रमाणे पुढे नेणारी त्यांची लाडकी कन्या, म्हणजे चित्रा. या चित्राने अनुभवलेली, तिच्या मनात रेंगाळलेली माणसे, तिने कागदावर उतरवली. जशीच्या तशी नव्हे, कधी थोडे रूप पालटून, व्यक्तिमत्व आणि घडलेल्या घटना यात थोडा फेरफार करून.
‘चित्रांगण’ हे चित्राचं पहिलं पुस्तक. पण ते छापलं गेलं चित्रा असताना नव्हे, तर चित्राची शुभदा झाल्यावर.
चित्रा शाळेत असल्यापासून कविता, कथा लिहायची. पण काहीसा भिडस्त स्वभाव, आपण विशेष काही करतोय …… इतरांपेक्षा वेगळं., याची जाण नसणं, यामुळे तिने आपलं लेखन फारसं कुणाला दाखवलं नाही. मैत्रिणींनाही त्याबद्दल सांगितलं नाही आणि वडलांनाही नाही. पहिली कविता पाचवीत असताना तिने लिहिली. ती शाळेच्या मासिकात छापून आली. त्यानंतर एकदा साधना मासिकाने मुलांसाठी काव्यस्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात तिची कविता ‘सावल्या ‘ ही प्रथम क्रमांकाने निवडली गेली. तिला पुरस्कार मिळाला आणि कविताही छापून आली. कथास्पर्धेतही एकदा तिच्या कथेला पुरस्कर मिळाला होता , पण बाईंनी तिचे कौतुक न करता दुसरा नंबर आलेल्या त्यांच्या लाडक्या विद्यार्थिनीचे कौतुक केलं, याचंही तिला त्या बालवयात वैषम्य वाटलं. स्वाभाविकच होतं ते, नाही का? बालोद्यानमध्ये तिची कथा तिने वाचली, पण मैत्रिणींना ती ऐकायला सांगावी, हे काही तिला सुचले नाही. अशा तऱ्हेने, कविता, कथा लिहीत आपल्या बालपणावर साहित्य निर्मितीच्या पाउलखुणा उमटवत ती कॉलेजकन्या झाली. कन्या नव्हे, तरुणी. वाचन-लेखनाची आवड तिने तिथेही जोपासली होती.
एकदा तिने एक कथा लिहिली. वडलांना न सांगता, दाखवता त्या वेळच्या सुप्रसिद्ध ‘सत्यकथा’ मासिकाकडे ती पाठवली. काही दिवसांनी सत्यकथेचे कार्यकारी संपादक श्री. राम पटवर्धन यांचे पत्र आले, ‘लेखिकेमध्ये लेखन गुण दिसतात, पण अधिक खोलवर जायला हवं. ‘ वडलांना त्यांचं आलेलं पत्र पाहून तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, ‘दादा, तुम्हाला तर मी काहीच सांगितलं नव्हतं, मग त्यांचं तुम्हाला कसं पत्र आलं ?’ ते हसत हसत म्हणाले, ‘अग, वर तू दिलेला आपला पत्ता एकच ना !’ त्यानंतर मात्र तिने अधिक खोलात जाऊन लिहिलेल्या तिच्या तीन-चार कथा पुढे सत्यकथेत प्रसिद्ध झाल्या.
आणखी एक सांगण्यासारखा किस्सा म्हणजे एकदा माधव कानिटकर (प्रपंच, मानिनीचे संपादक) तिच्या वडलांना भेटायला आले होते. त्यावेळी तिने एक कथा नुकतीच लिहून पूर्ण केली होती. ती टेबलावरच ठेवून ती त्यांना ‘बसा’ म्हाणाली आणि आत गेली. वडील आंघोळीला गेले होते. वेळ घालवण्यासाठी माधव कानिटकर टेबलावरची कथा उचलून वाचू लागले. त्यांना ती इतकी आवडली, की त्यांनी तिला हाका मारल्या आणि सांगितले की, ते ही कथा त्यांच्या अंकात छापणार म्हणजे छापणार!’
अभ्यास करता करता चित्राचं तुरळक लेखन चालू होतं. यथावकाश ती बी.ए. झाली आणि नंतर चित्रा जोशीची ‘सौ. शुभदा श्रीधर साने’ बनून सांगलीत नांदायला आली.
— पूर्वाश्रमीची चित्रा म्हणजेच आत्ताच्या सुप्रसिद्ध लेखिका सुश्री शुभदा साने.
सांगली तसं जुनाट गाव. परंपरानिष्ठ, कर्मठ. घरातील लोकही तसेच. कर्मठ. शुभदा पुण्यासारख्या शहरातून आलेली. स्वतंत्र विचारसरणी असलेल्या घराचे संस्कार. तिला या घरात सामावताना खूप तडजोड करावी लागली. या ओदासिन्याच्या काळात तिचा विरंगुळा होता, लेखन आणि वाचन. तिच्या लेखनाचं घरात कुणालाही कौतुक नव्हतं. नाही म्हणायला अपवाद श्रीधरपंतांचा. त्यांना मात्र शुभदाच्या लेखनाचं अतिशय अप्रूप होतं. ज्याच्या-त्याच्या जवळ ते तिच्या लेखनाचं कौतुक करत. पण बाकीच्यांना मात्र तिच्या लेखनाशी काही देणं-घेणं नव्हतं॰ पण ती लिहीत होती आणि कथा छापून येत होत्या.
एकदा मनाच्या विमनस्क अवस्थेत तिने ‘डोह’ कथा लिहिली. नुकतीच लग्न झालेली. सासुरवाशीण. सासरी कष्ट. छळ. उपेक्षा. सकाळी नदीवरून पाणी आणायचं . समोर नदीचा खोल डोह. एकदा घरी तिला भेटायला आलेले वडील तिला म्हणाले, ‘आज मी तुझ्याबरोबर येतो. ते मुलीबरोबर नदीवर गेले. तिचं ते एकटक डोहाकडे बघणं पाहून त्यांच्या काळात चर्रर्रर्र झालं. ते म्हणाले , .’बाळ माझं एक ऐकशील? थोडी उशिरा उजाडल्यावर वर्दळ सुरु झाली, की पाण्याला ये.’ ती दुसऱ्या दिवशीही लवकरच पाण्याला गेली. पुन्हा डोहाकडे काही विचाराने बघितले आणि तिला समोर दिसले, दोन व्याकूळ झालेले, तिच्याकडे काही अपेक्षेने पहाणारे डोळे. जणू तिच्यापुढे आखलेली लक्ष्मणरेषाच. ती, ती रेषा ओलांडू शकली नाही.’ तर अशी ही ‘डोह’ कथा. पुढे ही कथा ‘सत्यकथे’त प्रकाशित झाली.
एकीकडे शुभदाचा संसार वाढत, फुलत होता. तिला दोन मुले झाली. संपदा आणि भूषण. मुलांना वाढवण्यात, त्यांचं लालन-पालन करण्यात तिच्या लेखनाचा वेग मंदावला, पण थांबला नाही. कथा लेखन चालू होतं. त्या प्रकाशित होत होत्या. हळू हळू पुस्तकेही निघत होती. ‘चित्रांगण’ला पहिल्या पुस्तकासाठीचे महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळाले. नंतर ‘माणूस’, ‘तुमचं आमचं’ , ‘आणि म्हणूनच’, ‘आणि किती तरी…’ दिलासा, मुक्ती, वजीर, सारखे ३८ कथासंग्रह, सुवर्णमध्य, सारखे ललित लेख संग्रह रंग -बेरंगी, धम्माल गोष्टीसारखे बालकविता आणि बालकथा संग्रह अशी सगळी मिळून तिची आता ५० पुस्तके आहेत. ‘आणि किती तरी’ला ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा शंकर खंडू पाटील पुरस्कार मिळाला. याशिवाय, श्री. दा. पानवलकर, राजेंद्र बनहट्टी, अनंत फंदी असे काही महत्वाचे आणि इतर अनेक छोटे-मोठे पुरस्कार तिला मिळाले आहेत. या सर्वांवर कळस म्हणजे तिला नुकताच, ४ नोहेंबरला, रंगभूमी दिनाच्या आदल्या दिवशी मिळालेला आचार्य अत्रे पुरस्कार. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सांगली शाखेतर्फे, ‘रंगभूमी दिनाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गतच’ तिला हा पुरस्कार देण्यात आला.
१७ ऑक्टोबर , वसुबारसेचा दिवस. संध्याकाळी शुभदाचा फोन आला, ‘एक गुड न्यूज आहे.’ मी म्हंटलं ‘काय?’ मला वाटलं, एखादा, तिची कथा असलेला दिवाळी अंक आला असणार. पण नाही. न्यूज भलतीच ‘गुड… गुड… गुड… ‘ होती. तिला प्रा.ताम्हनकर सरांचा फोन आला होता, ‘परिषदेतर्फे आचार्य अत्रे पुरस्कारासाठी तुमची निवड झाली आहे. तुम्ही तो स्वीकाराल ना!’ आता इतका चांगला सन्मान कोण नाकारणार? मला मोबाईलवर हे ऐकल्यावर वाटलं, की सांगलीत असते, तर तिच्या घरी गेले असते. तिला घट्ट मिठी मारली असती आणि गरागरा फिरवलं असतं. आता मुंबईत आहे. नाईलाज आहे. पण मन मागोवा घेऊ लागलं इतकी आमची घट्ट मैत्री कधी आणि कशी झाली?
– क्रमश: भाग १
© सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








उज्ज्वला ताई खूपच सुंदर लिहिलाय तुम्ही शुभदा सानेवरील लेख!