सौ. उज्ज्वला केळकर
☆ चित्राचे अंगण…. – भाग – २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले– १७ ऑक्टोबर , वसुबारसेचा दिवस. संध्याकाळी शुभदाचा फोन आला, ‘एक गुड न्यूज आहे.’ मी म्हंटलं ‘काय?’ मला वाटलं, एखादा, तिची कथा असलेला दिवाळी अंक आला असणार. पण नाही. न्यूज भलतीच ‘गुड… गुड… गुड… ‘ होती. तिला प्रा.ताम्हनकर सरांचा फोन आला होता, ‘परिषदेतर्फे आचार्य अत्रे पुरस्कारासाठी तुमची निवड झाली आहे. तुम्ही तो स्वीकाराल ना!’ आता इतका चांगला सन्मान कोण नाकारणार? मला मोबाईलवर हे ऐकल्यावर वाटलं, की सांगलीत असते, तर तिच्या घरी गेले असते. तिला घट्ट मिठी मारली असती आणि गरागरा फिरवलं असतं. आता मुंबईत आहे. नाईलाज आहे. पण मन मागोवा घेऊ लागलं इतकी आमची घट्ट मैत्री कधी आणि कशी झाली? आता इथून पुढे )
घटना खूप जुनी. ३५-३६ वर्षे होऊन गेली असतील. सांगली नगरवाचनालयातर्फे जिल्हा साहित्य संमेलन करायचे ठरले. वसंत कानेटकर अध्यक्ष म्हणून निश्चित झाले. कार्यक्रम नेहमीचेच. कविता वाचन, कथाकथन, परिसंवाद वगैरे…… कार्याध्यक्ष होत्या, डॉ. तारा भवाळकर. त्या शुभदाच्या बंगल्यासमोर रहायच्या. त्यांनी शुभदाला येऊन कार्यक्रमाची माहिती दिली आणि सांगितले, ‘या संमेलनात तू कथाकथन करायचे आहेस.’ ती म्हणाली, ‘मी आजपर्यंत कधीच कथाकथन केले नाही. मी फक्त कथालेखन करते.’ त्या म्हणाल्या, ‘ ते काहीही असो, तू या संमेलनात कथाकथन करणार म्हणजे करणार आणि तुझीच कथा सांगणार.’ ते तिचे पहिले कथाकथन. कथा ऐकताना ती नवखी कथनकार आहे, असे मुळीच वाटले नाही. तिची कथा रंगली. तिने टाळ्या-बिळ्या घेतल्या. यानंतर तिचे कथाकथनाचे खूप कार्यक्रम झाले.
— पूर्वाश्रमीची चित्रा म्हणजेच आत्ताच्या सुप्रसिद्ध लेखिका सुश्री शुभदा साने.
…… शुभदा साने हे नाव त्या दिवशी मी प्रथम ऐकलं. मला वाचायची आवड आहे खरी, पण, घर-संसार, नोकरी यामुळे मासिक वाचनाला मर्यादा पडतात. त्या दिवशी माझ्या मनात आलं , सांगलीत असून इतकी चांगली लेखिका मला कशी माहीत नाही? मग मी तिच्याकडे गेले आणि तिची ओळख करून घेतली. त्या सुमाराला मी नव्याने कथा लिहू लागले होते, तर ती प्रथितयश होण्याच्या मार्गावर होती. परिचय झाला. तिचं मनमोकळं बोलणं यामुळे तो वाढत गेला. मग नुकत्याच लिहिलेल्या किंवा लिहू घातलेल्या कथांविषयी ती बोलायची. मीही माझ्या कथांच्या कल्पनेवर चर्चा करायची. अर्थात तिच्या तुलनेत माझा वेग अतिशय मंद होता. हळू हळू परिचय…. मैत्री…… घनिष्ठ मैत्री….. सख्खी मैत्रीण असा आमचा प्रवास होत गेला.
आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली, एकदा सांगली आकाशवाणीचे प्रख्यात निवेदक वामन काळे शुभदाला भेटले. ते म्हणाले, ‘तुम्ही ‘युवावाणी’साठी कथावाचन कराल का?’ त्यानंतर तिचे कथावाचन आकाशवाणीवरून प्रसारित झाले. त्यानंतर ‘साहित्य सौरभ’, ‘सये साजणी’ इ. विभागातून तिचे लेख, कविता, संवाद प्रसारित झाले. ‘प्रतिबिंब’ या कौटुंबिक श्रुतिका मालेतील काही श्रुतिका तिने लिहिल्या. आकाशवाणीवरील लेखनात सर्वात महत्वाचं आणि कस पहाणारं लेखन म्हणजे ‘रघुनाथाची बखर ‘ या तिच्या वडलांनीच लिहिलेल्या कादंबरीचे नाट्यरुपांतर . त्यावेळचे नाट्यविभागाचे प्रोग्रॅम इन्चार्ज, श्री. शशी पटवर्धन यांनी तिच्यावर ही जबाबदारी सोपवली. काहीशा साशंक मन:स्थितीतच तिने ही जबाबदारी स्वीकारली आणि उत्तमपणे पार पाडली. ही कादंबरी १३ भागात, नाट्यरूपात सांगली आकाशवाणीवरून प्रसारित झाली आणि श्रोत्यांनी त्याला मनापासून दाद दिली.
तिने काही वृत्तपत्रातून आणि मासिकांमधून सदर स्वरूपही लेखन केले. त्यात आवर्जून उल्लेख करावा अशी दोन सदरे, म्हणजे ‘सुवासिनी’मधून गेल्या दोन वर्षात आलेली सदरे. केल्या वर्षी तिने ‘कथेची कथा’ हे सदर लिहिले होते. कोणती घटना-प्रसंग, त्यातील व्यक्ती अनुभवल्यावर आपल्याला कथा सुचली, आणि कथा म्हणून आपण त्यात काय बदल केले, हे सांगणारे ते सदर . हे सदर वाचकांना खूप आवडले. त्याची दाद फोनवरून तिला मिळत गेली. तसेच यंदाच्या वर्षी ‘सुवासिनी’ मध्येच तिने ‘आठवणीच्या हिंदोळ्यावर ‘ हे आपल्या साहित्यिक प्रवासाचे, त्यातील कटू-गोड आठवणींचे वर्णन करणारे सदर लिहिले आहे. तेही लोकप्रिय झाले आहे .
शुभदाच्या लेखनाबद्दल ‘सुवासिनी’च्या संपादिका ‘आसावरी केळकर’ म्हणतात. ‘त्या कथा खूप छान लिहितात. वाचकांनाही त्या आवडतात. तशी त्यांची पत्रे येतात. जे लेख त्या लिहितात, ते पूर्ण अभ्यास करून, रंजक होईल, अशा पद्धतीने आणि मनापासून लिहितात.’ तिचे कथासंग्रह वाचलेल्या ‘गौरी गाडेकर’ म्हणतात, ‘शुभदा साने आपल्या ओघवत्या शैलीत व्यक्तिरेखा आणि त्यांच्या आजूबाजूचं वातावरण उत्तम प्रकरे साकार करतात. त्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, अनपेक्षित शेवट . त्या कथानकाला आशी काही कलाटणी देतात, की वाचकाला वाटतं, ‘अरेच्चा! आपल्याला तर वाटलं होतं… त्यांनी आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम कथा लिहिल्या आहेत. भविष्यातही त्यांच्या हातून आणखी उत्तमोत्तम कथा लिहिल्या जातील, याची खात्री आहे.’ सातत्याने ‘सह्याद्री’च्या दिवाळी अंकात कथा लिहिणार्या शुभदाबद्दल ‘सह्याद्री’चे संपदक ‘स्वप्नील पोरे’ म्हणतात, ‘ शुभदा साने यांच्या कथा मनाला स्पर्श करतात, याचे कारण कथा विषयाची त्यांच्याकडून होणारी हळुवार हाताळणी. ही हाताळणी हळुवार असली, तरी तेवढ्याच ताकदीची असते. त्यांच्या कथा कौटुंबिक असल्या, तरी पारंपारिक साच्यातल्या नाहीत. नव्या काळातील घराघरातील रंगभूमी दिनाच्या स्पंदने टिपण्यात त्यांची कथा यशस्वी झाली आहे. अनेक गुंतागुंतीचे विषय, त्यांची लेखणी एकेक पापुद्रा उलगडावा, तशी उलगडून सांगते. त्यांच्या कथांमध्ये नैसर्गिक ओघ आहे, तशीच उत्कंठाही आहे. ‘ती आणि तिची आई’, ‘संधी’, ‘त्या दिवसापासून’ या सह्याद्रीत प्रसिद्ध झालेल्या कथा वाचकांना खूप आवडल्या होत्या.’
शुभदाच्या लेखन कमाईतले आणखी एक श्रेयश म्हणजे, चोखंदळ आणि उत्तम कथावाचक, श्री. दीपक रेगे यांनी तिच्या काही कथा यू ट्यूबवर वाचल्या आहेत. आशा या माझ्या, विविध माध्यमातून वाचक-श्रोत्यांपर्यंत पोचलेल्या मैत्रिणीच्या हातांना आणि लेखणीला राज्य पुरस्काराचे भाग्य लाभू दे , अशी सदिच्छा व्यक्त करत मी थांबते.
– समाप्त –
© सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







