श्री सुधीर करंदीकर
☆ “आपली दिवाळी आणि पशुपक्षांचा शिमगा…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
यावर्षीची दिवाळी आपण सगळ्यांनीच खूप उत्साहात आणि आनंदात साजरी केली असणार. फटाक्यांचे कर्कश आवाज आणि धुरांचे लोट यांना यापुढे दिवाळीचाच एक भाग असे मनाने मानले तर त्यांचा त्रास होत नाही.
या दिवाळी मधला माझा एक अनुभव —
आज नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो. फिरण्याच्या रस्त्यावर बरीच मंदिरे आहेत, त्यामुळे अनायसेच सर्व देवी – देवतांचे रोजच दर्शन घडते आणि पुण्य पदरात पडते. आज दीवाळी मधले दर्शन, म्हणजे नक्कीच भरभरून पुण्य मिळत असणार, हे नक्की.
फिरण्याच्या रस्त्यावर मारुतीचे एक देऊळ आहे. मंदिराच्या दाराजवळच, बाहेर एक मोठा फळा लावलेला आहे. त्यावर नेहेमी सुविचार लिहिलेले असतात. मला सुविचार वाचायला नेहेमीच आवडते. मी अगदी रोज फळ्यावरचा सुविचार वाचायला हमखास तिथे थांबतो. काही काही सुविचार, खरंच सुंदर असतात आणि हमखास ते मनात मुरतात आणि मग आपोआप आचरणात उतरतात, हा माझा अनुभव.
आज फळ्यावर बघितलं तर चक्क इंग्रजीत लिहिलेले होते —
# Please Save us from loud noise and smoke.
We can not tolerate it. Please help us!!
खाली काही पक्षी, प्राणी यांची चित्रे होती.
बहुदा या पक्षांनी आणि प्राण्यांनी काल रात्री हे फळ्यावर हे लिहिले असावे. आणि सगळ्यांनाच वाचता यावे, म्हणून कदाचित, आपली व्यथा त्यांनी इंग्रजीत लिहिली असावी.
चित्रांच्या खाली निरनिराळ्या अक्षरात उत्तरादाखल बरेच संदेश लिहिलेले होते. सुविचार लिहिण्याच्या फळ्यावर हा प्रकार नविनच होता. हे काय नवीन आहे, म्हणून मी खालचे वाचायला सुरवात केली —-
काही वाचकांनी आज सकाळीच आपली मते मांडली होती —
# Dear birds and animals –
sorry to say that your request will remain on this board only. सणासुदीच्या दिवसात, कुणीही कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. आम्ही हा त्रास सहन करतो, तसा तुम्ही पण सहन करायला शिका. We have no choice and you too are sailing in the same boat. Your helpless friend – मनवा
# Dear birds and animals – sorry to learn your pains. मनवा यांनी लिहिले आहे, ते बरोबरच आहे. कुणाला काही सांगणे, म्हणजे ‘पालथ्या घड्यावर पाणी ओतणे’ असा प्रकार आहे. हेल्पलेस परिस्थितीतून जेव्हा आपल्याला जावे लागते, तेव्हा संतांचे वचन आठवून शांत रहावे, “जे जे होईलं ते ते पाहावे (म्हणजे कानठळ्या सोसाव्या, धुराचा श्वास घ्यावा), पण चित्ती असू द्यावे समाधान”. आम्ही हेच करतो.
Your friend – मेघना
# Dear birds and animals –
मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. खरंतर तुमच्या मदतीकरता प्राणी मित्र, पक्षी मित्र, वृक्ष मित्र अशा खूप संस्था आहेत. पण कान बधिर करणाऱ्या आवाजांमुळे आणि विषारी धुरामुळे, त्यांचे सदस्यच परेशान आहेत, त्यामुळे अशावेळेस त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचेच वाटते. पण काहीतरी मार्ग तर काढायलाच पाहिजे. संध्यातरी मला दोनच पर्याय दिसत आहेत —
१) आलीया भोगासी असावे सादरं, चित्ती असू द्यावे समाधानं. अशी मनाची तयारी करायला सुरुवात करा.
२) आपल्याला इथे नोकरी मिळू शकत नाही, हे समजल्यावर जसे बरेच जण परदेशात पलायन करतात, तसेच इथून स्थलांतरित होण्याचे काहीतरी बघा. परदेशात जाता आले तर उत्तम, कारण तिथे प्राणी आणि पक्षी यांची कदर केली जाते. निसर्गाचा समतोल, पशु / पक्षी / कीटक यांच्यामुळेच साधतो, हे त्यांना समजते व त्याप्रमाणे ते वागतात. Very very sorry.
तुमची मैत्रीण – वसुंधरा
हे सगळे वाचून, आपण सगळेच किती हेल्पलेस आहोत, याची जाणीव झाली. पूर्वी दिवाळीत फटाके उडायचे, पण ते आजच्या तुलनेत अगदी साधे असायचे. थोडासा आवाज / थोडासा धूर / थोडासा रंगीबेरंगी प्रकाश, हे सगळे डोळ्यांना आणि कानाला मजा देऊन जायचे. मजा यायची.
जमाना बदलतोय, फटाक्यांची विक्री आता वर्षभर सुरु असते. पूर्वी दिवाळीत फटाके असायचे, नंतर लग्नात सुरु झाले, नंतर वाढदिवसांना सुरु झाले, नंतर दहीहंडीला सुरु झाले, नंतर नवरात्रात सुरु झाले, नंतर शिवरात्रीला सुरु झाले, नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरु झाले. कुठल्या ना कुठल्या निवडणुका तर वर्षभर सुरुच असतात, निवडणूक म्हटलं, कि कुणीतरी जिंकणारच आणि आनंद साजरा करायचा, म्हणजे मोठमोठे फटाके आलेच. अशी ही यादी वाढतच चालली आहे. काहीतरी कारण शोधायचं आणि फटाके फोडायचे, हेच सत्र सध्या सुरु आहे.
आपण हेल्पलेस झालो, कि नेहेमी देवाकडे धाव घेतो. मी विचार केला, इथे तर देव अगदीच समोर आहे, म्हणजे त्याच्याकडे पोहोचायला, धाव घेण्याची पण जरूर नाही. मी आत मंदिरात गेलो, हात जोडले आणि देवाला म्हणालो – माणसानी असे वेडेवाकडे फटाके बनवणे, ते वर्षभर उडवणे, याची बिचाऱ्या पक्षांना / पशूंना शिक्षा मिळायला नको? त्यांच्याकरता काही तरी कर, ही मनापासून तुला प्रार्थना आहे. वयस्कर मंडळी, आजारी मंडळी, लहान बालके, आणि फटाके उडवणाऱ्यांसकट सगळेजण, यांना पण ही शिक्षाच आहे. काहीतरी उपाययोजना कर आणि हे थांबव, कमी कर.
प्रार्थना करून मी बाहेर पडलो. असं म्हणतात, कि पशु पक्षांना थर्ड सेन्स असतो. त्यांचे हितचिंतक कोण आहेत, वगैरे त्यांना कळतं. आपल्या हितचिंतकाला ते धन्यवाद देण्याचा नेहेमीच प्रयत्न करतात.
मी मंदिराच्या बाहेर पडलो. फुटपाथ वरची २-३ कुत्री माझ्या पाया – पायाशी करायला लागली. आणि नाजूक आवाजात भुंकायला लागली. बहुदा त्यांना मला थँक्स म्हणायचे असावे. मी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि पुढे निघालो.
घरापर्यंत पोहोचलो. केंव्हातरी दर्शन देणारा भारद्वाज पक्षी, चक्क गेटवर बसून धन्यवाद देण्याकरता माझी वाटच बघत असावा. मला बघताच तो उडून गेला. मी मनापासून नमस्कार केला.
हे सगळं वाचून, आपण सगळ्यांनीच, या संदर्भात काहीतरी सकारात्मक करायचंच, असं मनाशी ठरवलं, तर देवाच्या कृपेने, आपल्याला अशक्य असे काहीच नाही, आणि कुठलाही बदल हा आपण नक्कीच घडवू शकतो.
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





