सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “वर्ल्ड कप” च्या निमित्ताने…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
रात्रीचे बारा वाजलेले.. स्टेडियम खचाखच भरलेले.. शेवटचा कॅच तिने घेतला आणि मैदानात एकच जल्लोष… फक्त विजय आणि विजय!! जगत जेता विजय!!! …
झुंजार होऊन लढलेल्या त्या सगळ्या लढवय्या मुली रडतानाही खूप सुंदर दिसत होत्या. त्यांच्या वाहणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबात मला शंभर वर्षाच्या स्त्रिया दिसत होत्या…
– – मी मनामध्येच राजा राममोहन राय, सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले, रमाबाई रानडे, धोंडो केशव कर्वे… या सगळ्यांना मनापासून नमस्कार केला.. म्हणाले.. “पुरुषप्रधान संस्कृतीतल्या विकृत मनोवृत्तीमधून तुम्ही आम्हा स्त्रियांना बाहेर काढलं, शिक्षणाचे महत्त्व पटवलं, हळूहळू समाज मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत सतर्क होऊ लागला. आठ नऊ वर्षाची मुलगी झाली की तिचं लग्न 40 वर्षाच्या माणसाशी करणारी तत्कालीन समाजव्यवस्था.. नऊ दहा वर्षाच्या परकरी पोरीला नऊवार लुगड नेसून एका गुलामगिरीच्या जोखड्यात बांधून ठेवणारा समाज.. त्यांनी तिला कधी अंगणात खेळू दिले नाही.. मनमुराद नाचू दिलं नाही.. काही शिकू दिले नाही.. अक्षर वाचशील तर नवरा मरेल… असले धाक घातले… नवरा म्हणजे काय हे माहीत नसणाऱ्या त्या मुलीला नाहक भीती घातली आणि तिचं बालपणच हिरावून घेतले. आठ नऊ वर्षाच्या पोरीला सातत्याने ‘आता मोठी झालीस उड्या मारणे बंद कर. नाचण बंद कर.. खेळणं बंद कर’… त्या लेकराचे लहानपणच हिसकावून घेतलं.. 30 30 वर्षाच अंतर असलेल्या पुरुषाशी विवाह लावून दिला.. तो मेला की तिचं केशवपन केलं… तिला तिचं आयुष्य जगू दिलं नाही. खऱ्या अर्थानं जगातल्या अर्ध्या पुरुषी संख्येने अर्ध्या महिला संख्येचा छळवाद मांडला होता. ही पुरुषी मानसिकता आजही बदलली नाहीच आहे…
… पण म्हणून स्त्रियांना दाबून ठेवणं हे योग्य नव्हतं. शंभर दीडशे वर्षांपासून बाई शिक्षणासाठी धडपडली, चोरून शिकली… तर समाजातून तिला बहिष्कृत करण्यात आलं… शिकवणाऱ्या शिक्षकांना चिखल शेणाचा मारा सहन करावा लागला! तत्कालीन समाजासमोर एकच गोष्ट होती की… स्त्री ही भोग्य वस्तू आहे. तिने घरात राबावं.. आम्हाला व्यवस्थित जेवायला घालावं.. प्रसंगी तिला दागिने घालून नटवलं जायचं… पुढे पुढे देवी म्हणून तिचे गोडवे गायले जायला लागले …
… पण या सगळ्यामागे एक कट होता.. तो म्हणजे स्त्रीला कुठल्यातरी एका चौकटीत दाबून ठेवायचं होतं. पण अनेक थोर समंजस समाजसेवकांनी या असल्या रुढीच्या चौकटीतून स्त्रियांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे स्त्री-जातीवर अनंत उपकार आहेत. स्त्रिया शिकल्या.. स्वतंत्र विचार करू लागल्या. युद्धही जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री त्यांच्यासाठी गुरु ठरल्या आणि महाराष्ट्र घडला.
… शिवाजी महाराज म्हणजे धैर्य शौर्य आणि चातुर्य आणि व्यवस्थापन कौशल्य असलेला हिंदू धर्माचा रक्षण करणारा राजा.. हा असा राजा होता की ज्याने बलाढ्य मोगल सत्तेला जेरीस आणले. आज महाराष्ट्राचे नव्हे तर सगळ्या जगाचे ते दैवत आहे.
… अशा अनेक थोर पुरुषांच्या मार्गदर्शिका या स्त्रिया होत्या. पुरुषांना हे ठाऊक होतं की स्त्रिया विलक्षण बुद्धिमान आहेत आणि म्हणूनच त्यांना पुढे येऊ दिलं गेलं नाही. अंगणात मनमोकळ खेळू दिले नाही… आणि आज… आज त्याच मुलीने जगज्जेतेपद मिळवलं. पण शिक्षणानं खऱ्या अर्थाने बाई घडली सगळी कवाडे तिला खुली झाली ती अभिनयात पुढे गेली स्वयंपाकात पुढे गेली. अन्नपूर्णा तर तिच्यात होतीच.. विमान चालवणे, वाहन चालवणे, अवकाशात संचार करणे, संशोधन, मेडिकल- – अर्थ – कोणतंही क्षेत्र तिला वर्ज्य नव्हतं.. हाती धुपाटणं घेऊन धुणं बडवत बसलेल्या असंख्य स्त्रियांचा सुद्धा आज विजय झाला.. त्याच धुपाटण्याची चेंडू फळी करून पोरीने जग जिंकलं त्यांच्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाबरोबर एक एक गोष्ट मला आठवत होती…
… खरंच पोरींनो तुम्ही खूप झुंजलात.. विजयी झालात आणि बाईसारख्या हळव्या होऊन रडलात सुद्धा… रडतानाही तुम्ही फार सुंदर दिसत होता… आज जगातल्या सगळ्यात देखण्या मुली तुम्ही होता.. तुमच्या मनगटात दम होता आणि तुमच्या अश्रूत ऋजुता होती. तिथेही बाईपण जपलंत. आज तुमचा आम्हाला अभिमान वाटला. स्त्री जगज्जेता झाली होतीच पण तिला ते सिद्ध करता आलं…!
… अगदी रामायण काळापासून आपण पाहतोय, बाईला सगळं सिद्ध करावंच लागलं, पण त्यात ती कुठेही कमी पडली नाही. माझ्या भारतीय लेकीनो.. तुमचं मनापासून अभिनंदन!!! … आणि आपल्या संस्कृती आणि संस्काराप्रमाणे तुम्हा सगळ्यांना ओवाळून तुमची दृष्ट मनातच मी काढली.
.. “खूप लडी मर्दानी.. अरे तुम तो झाशीवाली रानी हो”.. हे शब्द सहज ओठी आले. काल सगळ्या जगाला कळलं …
बाईपण भारी देवा! बाई पण भारी देवा!! – –
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





